स्वीकार भाग 7
पहाटे पहाटे बेल वाजली. राधाला समजलं की रवी मिनीबस घेऊन आला असेल. तिनं मुद्दाम अरुला दार उघडायला सांगितलं. अरुनं दार उघडलं. समोर रवी ! क्षणभर दोघांनी एकमेकांना पाहिलं. आधी दोघांनी एकमेकांची बोलायची वाट बघितली. मग राधाला हॉल मधे येतांना पाहून अरुच बोलली, "हाय!''
"हाय !"
"कसा आहेस?"
"छान ! तु?"
"मी छान आहे."
"आज सर्व गोष्टी दारातच होणार आहेत वाटतं." राधा म्हणाली.
"अरे सॉरी आत ये."
"नाही आला तरी चालेल. बॅग दारातच ठेवल्या आहेत. जा घेऊन खाली दोघेही."
"मी सुद्धा."
"मला वाटतं तुम्ही दोघंच आहात दारात. आणखी कोणी आहे का तिकडे?" राधा मिश्किलपने बोलली.
"पुरे राधा."अतुल घराची चाबी घेऊन आला, "तिचा म्हणण्याचा अर्थ आहे. गाडीत जाऊन बसा. आम्ही सर्व लॉक करून येतो पाच मिनिटात."
रवी बॅग घेऊन पुढे चालू लागला आणि अरु त्याच्या मागे. "बाकी मंडळ म्हणजे फुलराणी, तिची आई पूर्वा आणि अमन कुठे आहे?"
"ते महेश दादाकडे गेले मॉर्निंग वॉक करत."
"ओके."
"नक्कीच बर्थडे प्लान करायला गेले असतील."रवी स्वतःशीच पुटपुटला.
"काही म्हटलं का?" अरुनं विचारलं.
"नाही, सहजच मनात आलं. सगळं किती बदललं आहे. आपण लहान होतो तेव्हाच जग आणि आताच...."
"तु हा सर्व बदल होतांना बघितला तरी असं म्हणतोय. मग मी काय म्हणावं."
"सॉरी."
"इट्स ओके." अरुच्या डोळ्यात पाणी आलं होतं. रवीला वाटलं जाऊन अरुला मिठीत घ्यावं आणि म्हणावं, मी आहे ना सोबत मग कशाचीच काळजी करु नको. पण तो तसाच तिला डोळ्यांच्या कडा पुसत बघत उभा राहिला.
"सगळं घेतलं ना आठवणीने?" अतुल राधाशी बोलतच खाली आला, "अर्ध्यात गेल्यावर म्हणायचं नाही हे राहिलं ते राहिलं."
"घेतलं ना, असा काय करतोय? इतका त्रास देते का मी?"
"अगं तसं नाही... "
राधा अतुलची चाहूल लागताच अरु गडबडीत मिनीबसमधे जाऊन बसु लागली आणि तिचा पाय मिनीबसच्या पायरीवरून घसरला झाला. ति खाली पडणार तो रवीनं तिला पकडलं. तिनंही रवीचा हात घट्ट पकडला. राधा धावत त्यांच्याजवळ गेली.
"अगं ठीक आहेस ना तु?"
"हो हो." अरुनं रवीचा हात सोडून दिला, "पाय माहित नाही कस काय घसरला."
"जेव्हा घसरायला हवा होता तेव्हा घसरला नाही. म्हणून आता घसरतोय तो." अतुल म्हणाला.
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही. लक्ष नको देऊ त्याच्याकडे." राधा गोड हसत म्हणाली, "चल रवी. ते लोकं वाट पाहत असतील आपली."
बस महेशच्या फ्लॅटसमोर आली. सर्व वाटच पाहत होते.
"हाय रवी. कसा आहेस?" महेशनं रवीला विचारलं.
"छान ! तु कसा आहेस दादा."
"मी छान, पण अरु ठीक होतेय हे पाहून अगदी 101% छान झालोय बघ."
"हो." रवीनं अरुकडे बघितलं. ती आईबाबासोबत गप्पा मारत होती. महेशचा 16 वर्षाचा मुलगा व्हिडीओ शूट करत होता.
"हा माझा मुलगा अर्णव आणि ही माझी पत्नी रिया."
"हाय, हाय" रवीनं दोघांना हाय केलं.
"मग व्यवसाय की नोकरी सुरु आहे." महेशनं विचारलं.
"करिष्मा सोसायटीजवळच्या खाऊगल्लीत एक रेस्टॉरंट रेंटवर घेतलं. 10 तारखेला उदघाट्न करु."
"अरे वा, म्हणजे चारच दिवसांनी."
"हो."
"नाव काय ठेवलं आणि मेनू काय ठेवणार आहेस?"
"पराठा शॉप, 10 प्रकारचे पराठे आणि सकाळी 7 ते 10 उपमा, पोहा, नागपुरी चणा पोहा हे नाश्त्याचे पदार्थ आणि चहा कॉफी."
"छान !'' महेशला खूप आनंद झाला रवीचं पुढलं प्लानिंग ऐकून. राधा आणि अतुलनं जेव्हा महेशला रवी आणि अरुचं लग्न करून द्यायचे आहे हे सांगितलं. तो काळजीत पडला. कारण मागील 8 वर्षापासून रवी जिप्सी सारखा जगतोय हे त्याला त्याच्या मित्रपरिवाराकडून ऐकायला मिळत होतं. म्हणून अरुला सोबत घेऊन जायच्या उद्देशानेच महेश भारतात परतला होता. पण रवीला भेटल्यावर त्याला अरुची काळजी करायची गरज नाही हे समजलं.
"ए चला अंताक्षरी खेळूया का आपण?" अर्णवनं त्याचा विचार मांडला.
"हो हो चला खेळू. सर्व पुरुष मंडळी एक टीम आणि आम्हा बायकांची एक टीम." फुलराणी म्हणाली.
"पण बाबा म्हणतात, लग्न झालेल्या मुलीला बायका असं म्हणतात. तु तर माझ्यापेक्षा लहान दिसते आणि भारतात बालविवाह कधीचा बंद झाला. मग तु बायका कशी?" अर्णवचा प्रश्न.
"चला फुलराणीच्या टक्करचं कोणीतरी भेटलं." अमन फुलराणीला चिडवत म्हणाला.
"ए गप बसा आणि अंताक्षरी खेळा. मी सुरु करते."परत कोणी काही प्रश्न विचारू नये म्हणून ती तिचं आवडतं, हम साथ साथ है सिनेमाचं गाणं म्हणू लागली
,"ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ I LOVE YOU." शेवटचे तीन शब्द ती अमनला पाहून म्हणाली. तसा त्यानं लाजतच हाताने चेहरा झाकला.
अंताक्षरी छान रंगली. इकडे अरु आणि रवीचं एकमेकांना लपून लपून बघणं सुरु होतं. जणू ते दोघंच होते बसमधे. बाकीचे नव्हतेच. गाण्याचा आवाज, गोंधळ कशाचीच त्यांना बाधा नव्हती.
"ए आराधना कुठे लक्ष आहे तुझे?"
"हो ना किती वेळचा आवज देतेय."
"सॉरी काय झालं?"
"आपल्यावर म आला आहे. छानसं गाणं म्हण ना."
"हो का, सांगते." अरुला तिचं आवडतं गाणं आठवलं,
"मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है|पर सामने जब तुम आते हो, कुछ भी केहनेसे डरता है. ओ मेरे साजन, साजन साजन."
रवीनं गुपचूप गाणं मोबाईलमधे रेकॉर्ड करून घेतलं. बस थांबली. "काय झालं ड्रायवर भाऊ?"
"लोणावळा आलं साहेब."
"आलं का? बरं झालं. नाहीतर आज फुलराणीचे गाणे ऐकूनच पोट भरावं लागेल असं वाटलं मला." अमन.
"सासूबाई याला जेवण नाही द्यायचं." फुलराणी चिडली.
"पूर्वा तु आमच्यासोबतच राहायला ये कायमची पुण्याला. ही दोन लेकरं माझ्या कडून सांभाळणं होणे नाही." राधा.
"ए थांबवा तुमचं आणि सांगा आधी जेवण करायचं की पाण्यात मज्जा?"
"जेवणच करु अतुल. औषधं घ्यायची असतील अरुच्या बाबांना." पूर्वाचा इशारा अतुलला समजला. जेवण करून अरुला दुपारचं औषध द्यायचं होतं. अरुचा एकही डोज चुकु नये याची ती पूर्ण काळजी घेत होती.
जेवण झाल्यावर अरुचे आईबाबा सोडून इतर सर्व मंडळ पाण्यात गेलं. फेब्रुवारी महिन्याची दुपार असल्यामुळे इतकं काही ऊन नव्हतं. पण तरीही पाणी मस्त वाटत होतं. अरु मात्र बाहेरूनच सगळ्यांना मजा करतांना बघू लागली. रवी ड्रायवरला काही सूचना देऊन आला. तो अरुला एकटं उभं पाहून म्हणाला,
"तु एकटी काय करतेय इथे. चल पाण्यात. छान वाटेल तुला."
"नको मी इथेच बरी आहे."
"अरु ये रवीसोबत. खूप मज्जा येतेय."
"नाही दादा मला खूप भीती वाटतेय."
"रवी आन तिला हात पकडून."महेशने हुकूम सोडला.
मग काय रवी तिचा हात पकडून तिला पाण्यात घेऊन गेला. अरु त्याला पाहतच राहिली. पाण्यात भिजताच तिच्या अंगातला सगळा त्राण निघून गेला.
पाण्यात खेळल्यावर सगळे खूप थकले आणि बसमधे बसताच झोपीच्या आहारी गेले. संध्याकाळी 4:30 ला मिनीबस नेरळला पोहोचली. नेरळवरून 5 वाजताच्या टॉय ट्रेनने माथेरानला गेले. नेरळ ते माथेरान दोन तासांचा प्रवास नयन रम्य असं निसर्ग सौंदर्य पाहत लवकरच संपला.
"मामाश्री खूप खूप धन्यवाद टॉय ट्रेन साठी." अमन रवीला म्हणाला.
"हो खरंच खूप मज्जा आली." अर्णव म्हणाला.
"हो ना, हे सर्व असं परिवारासोबत अनुभवायला नशीबच लागतं." रिया बोलली.
"अरे बस, अजून दोन दिवस सोबत आहोत. या दोन दिवसांचं नियोजन आवडलं की मग मनभरून एकसाथ तारीफ कराल माझी." रवी म्हणाला.
अरुनं मनोमन रवीला थँक्यू म्हटलं.
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment