स्वीकार भाग 8 इथे वाचा
अतुल मिटिंगनंतर सरळ ऑफिसला गेला आणि फुलराणी वनश्री सोबत कामाचं बोलायला गेली. राधा आणि पूर्वा अरुला पाहायला घरी गेल्या. ते मिटिंगसाठी आले तेव्हा आराधना झोपून होती. काकू स्वयंपाक करत होत्या. अरु उठली होती. शो केस मधे लावलेले फोटो पाहत होती.
"राधा तु का घरी आणलंस मला?" राधाच्या घरात येण्याची चाहूल लागली.''मी सगळ्यांसाठी फक्त त्रासदायक आहे गं.
"अरु तु ओळखलं मला. म्हणजे तु ठीक होतेय आता. हो ना पूर्वा."
"हो खरंच."
"पण मला नाही व्हायचं ठीक. राधा तु का समजून घेत नाहीस. मला त्या दिवशीच सगळं आठवलं जेव्हा मी पागलखान्यात रवीला पाहिलं. मला वाटलं मी गोंधळ घातलेला पाहून तुम्ही मला घरी आणणार नाही. पण तुम्ही आणलं. इथंही मी किती त्रास दिला, सोसायटीतुन बाहेर पडायची वेळ आली तुमच्यावर पण तुम्ही हार नाही मानली. का?"
"कारण मला तु हवी आहेस. मला माझी 21 वर्ष पूर्वीची मैत्रीण हवी आहे."
"पण माझं मानसिक संतुलन खूप बिघडलं आहे. मी तशी कधीच नाही होऊ शकत आणि झाली तरी हा समाज मला स्वीकार करणार नाही." बेडला टेकून खाली बसून दोन्ही हातात तोंड झाकून ति हमसून हमसून रडू लागली.
"असं काहीच होणार नाही गं. माझ्या पोरीला, फुलराणीला माझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा तूझ्यावर. म्हणून तर माझी सगळी कामं सोडून मी इथं आली. राधा तिचं काम घरून (वर्क फ्रॉम होम) करतेय." पूर्वा अरुच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "पाणी पिणार."
"हो."
"काकू एक गिलास पाणी आणा."
काकूनं भीत भीतच राधाच्या हातात पाणी दिलं. राधानं अगदी रागात तिला पाहिलं.
"पण तुम्ही रवीला का यात ओढताय?"
"कारण मला कळलंय की तुझं... " राधा तिला सांगणारच होती की तिला रवी आवडायचा हे सगळ्यांना कळलं आहे. पण पूर्वाने सांगू नको असा इशारा केला. कारण अरुला हे सगळं तिनं बरं व्हावं म्हणून केलेलं प्लॅनिंग वाटेल. ज्यामुळे तिचं आणखी जास्त मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता होती.
"काय माझं?"अरुनं तिला प्रश्न केला.
"तुझं त्याच्यासाठी ठीक होणं गरजेच आहे. रवीची पहिली चॉईस तु होतीस."
"काय?"
"हो, पण परिस्थितीमुळे तो हे बोलायला धजावला नाही."
"असं का झालं? तो का बोलला नाही मला?"
थोडावेळ शांतता पसरली.
"पण रवीनं तर लव्ह मॅरीएज केलं होतं ना निधीसोबत."
"त्यांचा 8 वर्ष आधी निधी सोबत घटस्फोट झाला."
"काय?"
"मला हे आता आताच निधीकडून माहित झालं. नंतर रवीच्या डोळ्यातही मला ते दिसून आलं. म्हणून म्हटलं माझ्यासाठी माझ्या स्वार्थासाठी, माझ्या दादाला एक नवीन आयुष्य देण्यासाठी मला तु हवी आहेस." अरुला हाताने उभं करत राधा पुढे म्हणाली, "माझी साथ देशील?"
अरुने होकारार्थी मान हलवली आणि राधाला मिठी मारली. पूर्वा मनोमन खूप आनंदीत झाली. कारण आराधनाला आता जगायला एक हेतू मिळाला. माणसशास्त्रीय भाषेत म्हणाल तर motive मिळालं. आता यापुढे ती स्वतः लवकरात लवकर बरं व्हायचा प्रयत्न करेल.
"मला वाटतं बाकी गोष्टी आपण नंतर आरामात बसून करु." पूर्वा दोघींना म्हणाली, "चला फ्रेश व्हा. आराधना अंघोळ कर. आपण छान जेवू. औषधं घेऊ आणि गप्पा मारू."
"हो चल अरु मी गिझर ऑन करून देते." राधा म्हणाली.
"नको, आज माझं सगळं मीच करेल."
"अगं पण."
"राधा, करु दे तिला. जा अरु." पूर्वाने राधाला थांबवलं.
अरुला बाथरूममधे गेल्यावर थोडं भांबावल्यासारखं झालं की काय कसं करायचं? पण 2 मिनिट शांत उभं राहिल्यावर तिनं केलं सगळं मनानंच.
पूर्वाने फुलराणीला फोन करून घरी घडलेलं सांगितलं. ती खूप आनंदी झाली. लवकरच घरी येतो म्हणाली.
जेवण झाल्यावर पूर्वाने अरुला औषधं दिली. त्यांनी काही पेपर crafting केलं. अरुने खूप सुंदर अशी फुलं बनवली.
"अरु तु अशाच फुलांचा बुके रवीला तो बारावी पास झाला होता तेव्हा दिली होतीस ना."
"हो आणि आताही त्याला देण्यासाठीच बनवतेय." अरुच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. पण पूर्वाला माहित होतं की हे सगळं इतकं सोपं नाही. अजून अरुला खूप गोष्टींवर मात करायची आहे. त्यासाठी पूर्वाने वेळापत्रक पूर्णपने पाळायचं ठरवलं. सोबतच सकाळ संध्याकाळी दोन वेळा आराधनाला योगाभ्यास, प्राणायाम करवून घेणं सुरु केलं. प्राणायाम आणि योगाभ्यास मानसिक आरोग्यासाठी उत्तम औषध. तसेच पुण्याच्या एका नामवंत सायकिऍट्रिस्टकडे अरुला घेऊन गेली. हळू हळू अरुमधे फरक दिसू लागला. पण म्हणून औषधं बंद केली नाही. कारण आपल्या मेंदूतील काही केमिकल असंतुलित होतात तेव्हा आपलं मानसिक संतुलन बिघडतं. ते केमिकल औषधं संतुलित करतात. म्हणून गरज असेल तेव्हा सायकिऍट्रिस्टनं लिहून दिलेली औषधं आपण घ्यायलाच हवी.
राधाने अरुला स्मार्टफोनची ओळख करून दिली. व्हाट्सऍप चालवायला शिकवलं. अरुच्या बाबाची तब्येत चांगली होऊ लागली. तिच्या भावानं, महेशनं राधाला कॉन्टॅक्ट केला.
व्हाट्सऍप व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारा अरुचं तिच्या आई बाबांशी आणि भावासोबत बोलणं करून दिलं. त्यांना पाहून अरुला भरून आलं.
"मला माफ कर अरु. एका भावाचं कर्तव्य मी पार नाही पाडलं." महेश म्हणाला.
"प्लीज दादा असं नको म्हणू. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या तेव्हाच घडतात जेव्हा घडायच्या असतात." तिच्या वाढदिवसाला म्हणजे एक महिन्याने ते सर्व भरतात अरूला भेटायला येणार असल्याचं तिच्या भावानी सांगितलं.
15 दिवस गेले. अरुला खूप छान वाटू लागलं. एका संध्याकाळी योगाभ्यास झाल्यावर अरु राधाला म्हणाली,
"मला निधीला भेटायचं आहे. तिच्याशी बोलल्यावरच मी रवीला भेटेल."
राधानं पूर्वाकडे पाहिलं. "हो नक्कीच भेटू आपण तिला." पूर्वा म्हणाली. त्यांनी निधीला कळवलं ज्यासाठी त्या आधीच रेडी होत्या. त्यांची वैशालीत मस्त डोसा पार्टी रंगली. निधीनं तिच्या 15 वर्षाच्या मुलीला, निशाला सोबत आणलं होतं.
"खरं सांगू का अरु तु अगदी तशीच आहेस, जशी जीवनसंगिनी तो माझ्यात शोधत होता." निधी अरुचा हात हातात घेऊन म्हणाली, "कदाचित मी त्याला प्रपोज केलं नसतं तर पुढे चालून त्यानं तुला नक्कीच प्रपोज केलं असतं. त्यामुळे असं वाटतं मी मधात आले तुमच्या. म्हणून आमचा संसार टिकला नाही ना त्या संसार वेलीवर एकही फुल उमललं."
"अगं पण माझ्या मनात तसं काहीच नव्हतं हं रवीबद्दल. पण एक मित्र म्हणून आवडायचा म्हणून मन दुखावलं नसतं त्याचं." अरु खोटं बोलतेय हे सगळ्यांना ओळखू येत होतं.
"असो, त्यानं तरी कुठे त्याचं प्रेम व्यक्त केलं? पुण्यातच असून एकदाही भेटायला आला नाही अरुच्या." अतुल म्हणाला.
अरूचा चेहरा उतरला. राधाने अतुलला नजरेनंच दटावलं.
"तसं काहीच नाही. डॉक्टर लीलानं सांगितलं अरुला जास्त ताण नाही द्यायचा म्हणून तो नाही आला तुला भेटायला."
"असू दे." अरु खोटं खोटं हसून म्हणाली. पण तिलाही मनातून वाटत होतं की, 'रवी का आला नाही भेटायला? पण मीही रवीवरच प्रेम करायची आणि ते मनातल्या मनात दडवून ठेवलं म्हणूनच माझी मानसिक अवस्था बिघडली असं यांना समजलं तर काय वाटेल यांना? नको असं नको व्हायला. म्हणून मला धीरानं काम घ्यायला हवं. मी वाट पाहीन रवीची.' ती स्वतःशीच बोलली.
अमन सुट्टी घेऊन खास अरुला भेटायला आला. राधाचीच झेरॉक्स कॉपी. अरुला त्याला भेटून खूप छान वाटलं. नेव्हीच्या खूप रोमांचित गोष्टी त्यानं अरुला सांगितल्या. अरुला पल्लवी जोशीचं आरोहण सिरीयलची आठवण झाली. ती पाहून अरुनं ठरवलं होतं की ती सुद्धा नेव्ही जॉईन करेल. खूप स्वप्न रंगवली होती नेव्हीबद्दलची तिनं. पण.... असो अमनला नेव्हीत पाहूनच तिला तिचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं झालं.
अरुचे आईबाबा, दादा महेश , त्याची बायको रिया आणि मुलगा अर्णव सर्व पुण्याला आले. राधाच्या सोसायटीजवळच महेशच्या मित्राच्या खाली फ्लॅटवर त्यांची राहायची सोय झाली. आराधनाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी माथेरानला जायचं ठरवलं. सर्व बंदोबस्त रवीनं केला. आराधना पूर्वीसारखं सर्वांना ओळखू लागल्यावर रवी आणि तिची ही पहिली भेट होणार. जी तिच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी ठरेल.
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment