Saturday 30 May 2020

मी अहिल्या होणार गं

आज 31मे 2020 राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीला माझा प्रणाम. राजमातेचा शिवलिंग हाती असलेला हा एकच फोटो मी लहानपणापासून घरी पाहिलेला. त्यामुळे अहिल्यादेवी ह्या खूप धार्मिक असतील असे मला वाटायचे . तसेच त्यांनी महादेवाची जागोजागी मंदिरे बांधल्याचेहि ऐकून होते. 

पण सविस्तर इतिहास संशोधन केले असता असे लक्षात येते कि अहिल्यादेवी ह्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. जशी त्यांची महादेवाच्या ठायी भक्ती होती तशीच त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होती. सर्वधर्म समभाव त्यांच्या हृदयीं होता. म्हणून त्यांच्यावर प्रजेचे प्रेम होते. वेळ पडलि तेव्हा तलवार घेउन रणांगणात उतरल्या . स्त्रियांना शिक्षित केले. त्यांची फौज निर्माण केली. अन बंडखोरांचा बंदोबस्त केला. रामायण किंवा महाभारतात किती युद्ध झाली आणि स्त्रिया विधवा झाल्या पण कोणी विधवा स्त्री सती गेल्याचा कुठेच उल्लेख नाही. अशी उदाहरण देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे माता अहिल्यादेवीने जनतेला पटवून दिलं. विधवांना पतीची मिळकत स्वतः जवळ ठेवता येईल अशी तरतूद केली. तसेच विधवांना मुलं दत्तक घेता येणं सोपं केलं. त्यांनी पडदा पद्धत कधीच पळाली नाही. त्या रोज जनता दरबार भरवीत असत आणि लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास हजर असत. त्यांनी जातपात मानली नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे त्यांच्या कन्येचा विवाह यशवंतराव फणसे या इतर जातीच्या पण गुणी आणि शूर तरुणाशी करून दिला होता. त्या धर्मपारायण होत्या पण केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्नछत्रे उघडली, विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, आश्रमशाळा बांधल्या. लोकं त्यांना तत्वज्ञानाची राणी म्हणून ओळखू लागले. 
पुत्र मालेरावांच्या देहावसना नंतर अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. बाई काय राज्यकारभार करणार? ही दरबारीं मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरवली. 
 अशा कर्तव्यदक्ष स्त्रीच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पुस्तक किती शोभेल ! कल्पना करा अशा त्यांच्या चित्राची खूप छान वाटते. आणि हो मला वसंतराव सोनोने (संदर्भ - 31/05/2016 सकाळ वृत्तपत्रात त्यांच्या लेख) ह्यांनी लिहिलेल्या दोन ओळी खुपच भावल्या . त्या अशा कि , 
सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणाऱ्या टिळकांच्या हातात गणपती किंवा त्यांना गणपतीची पूजा करतांना कोठेही दाखवलेले नाही . परंतु आपल्या तलवारीच्या बळावर व बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाचे राज्य टिकवणारी रणरागिणी अहिल्याबाईंना जाणीवपुर्वक दुर्लक्षित ठेवले . त्यांना त्या फोटोच्या चौकटीत जणु कैद केले. असे मला मनापासुन वाटते. 
इंग्रज लेखक लॉरेन्स यांनी राजमाता अहिल्यादेवीची तुलना रशियन राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. ती अशीच नाही ना....
नुकतंच विजया जहागीरदार यांचं 'कर्मयोगिनी' हे पुस्तक वाचलं. अप्रतिम व्यक्तिमत्व राजमाता अहिल्यादेवीचं डोळ्यांसमोर उभं राहिलं. प्रत्येक स्त्रीनं अंगिकारावं असंच. 
राजमाता अहिल्यादेवीच्या चरणी आपल्या आवाजाची श्रद्धा सुमनं अर्पित करावी म्हणून यु ट्यूब वर गाणं शोधलं. तेव्हा अहिल्याफिल्म्स चं, "मी अहिल्या होणार गं !" हे गाणं मिळालं. खूपच सुंदर शब्दांकन. लेखकाचा आणि गायिकेचा उल्लेख नाही तिथं म्हणून इथेही नावं लिहिली नाहीत.
शेवटी दोन ओळी या गाण्याच्या, 
नारी जातीत जन्म घेतला, अहिल्या होणार गं 
पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊनि भंडारा लेणार गं 
मी अहिल्या होणार गं 
मी अहिल्या होणार गं !
फोटो साभार गुगल वरून 🙏
(नोट : माझा या लेखाद्वारे कोणावर टीका टिपणी करायचा मुळीच उद्देश नाही. तरीही एखाद्याचं मन दुखलं असेल तर क्षमस्व असावे.)

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Master of labour studies 

Master diploma of counseling in mental health

archusonagre@gmail.com

लेखाचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरू नये ही विनंती आहे.
धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...