स्वीकार भाग 12 इथे वाचा
डॉक्टर जयानं अरुला CBT थेरेपी देणं सुरु केलं. अरुनं पाचव्या महिन्यापासून बालाजी तांबे यांच्या 'गर्भसंस्कार' वर्गाला जाणं सुरु केलं. काही संस्कार वर्ग रवीनंही तिच्यासोबत अटेंड केले. ध्यान आणि गर्भवतीला फायदेशीर ठरतील अशी योगासनं डॉक्टरच्या सल्ल्यानं ती करु लागली. अमननं घर खेळण्यांनी भरून टाकलं. नवीन बेडशीट, परदे घरात आले. गोड गुबगुबीत बाळांचे फोटो आराधनाच्या खोलीत लावले गेले. सगळीकडे आनंदी आनंद झाला.
तिला एकच वाटे आपल्यामुळे यांना जास्त त्रास होऊ नये. पण नववा महिना सुरु झाला तेव्हापासून उठण्या बसण्यात तिला जास्तच त्रास होऊ लागला. झोपतांना तर बाळ छातीशी आल्याचा भास व्हायचा. मग झोप लागत नसे. श्वास घ्यायला त्रास होई. पायाच्या तळव्यांची आग होई. तिच्या मनात येई, 'स्वतःच पोट फाडून बाळाला बाहेर काढून टाकावं.' तिची चीडचीड वाढली. बाळंतपणाच्या आधी येणाऱ्या नैराश्यानं तिला ग्रासलं. अशावेळी आई तिच्या तळपायांना तूप लावून कास्याच्या वाटीनं घासे. तिला झोप लागावी म्हणून रवी डोक्याची मालीश करे. ती झोपे पर्यंत तिच्या केसांमधून हात फिरवी. राधा चंदन सुगंध असलेली मेणबत्ती लावी. त्या मंद प्रकाशानं आणि सुगंधानं तिला बराच आराम मिळायचा. संगीत थेरेपीनंही तिला खूप बरं वाटे. ती हे सगळं डायरीत लिहून ठेवायची.
अशातही अरुचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. सोसायटीच्या बायांनी आपणहुन हजेरी लावली. नायक बाईनं अरुची ओटी भरली,
"जे झालं ते विसर बाई. अशीच निखळ अजून. काही लागलं सावरलं तर आम्ही आहोतच."
नववा महिना पूर्ण झाला त्या दिवशीच अरुचं सिझर करण्यात आलं. मुलगी झाली. अरु आणि रवी सारखीच गोंडस.
"अमन आणि अर्णवला बहीण आली गं अरु!" रियानं अरुला बाळ दाखवत सांगितलं. बाळाला पाहुन अरुच्या डोळ्यात पाणी आलं. आपण आयुष्यात कधी आईपनही जगू शकू असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या मनात काही ओळी तयार झाल्या,
थोडं हसायचं, थोडं रडायचं,
सर्वांना सोबत घेऊन चालायचं,
इच्छापूर्ती होईलच कधीतरी,
थोडया वेळानं झाली म्हणून,
वाईट न मानायचं,
आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला शिकायचं !
अर्थातच रवी आणि घरच्या इतरांची खरी परीक्षा आता सुरु झाली. बाळंतपणानंतर अरुला नैराश्याचे झटके येऊ लागले. पण तिची आई, राधा आणि उषा काकू सगळ्याच परिस्थितीला तोंड द्यायला तयार होत्या. अरुच्या बाळंतपणाआधी डॉक्टर जयानं तिघींचंही समुपदेशन केलं होतं. समुपदेशनची गरज रुग्णासोबत त्याच्या घरच्यांनाही असते. बाळ झाल्यावरही अरुची दिनचर्या तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न होऊ लागला. तिची झोप व्हावी म्हणून बाळाला रात्री अरुची आई जवळ घेऊन झोपत असे. वरचं दुध बाळाला देण्यात येई. ज्यामुळे अरुची छाती भरून येई. रोज सकाळ संध्याकाळी दुध पम्पनं काढून घ्यावं लागे. तेव्हा तिला खूप वाईट वाटे. पण ती स्वतःला समजवायची की हे बाळाच्या भल्यासाठी जरुरी कसे आहे. पूर्ण झोप आणि इतर थेरेपीजनं अरुला बरं वाटे.
बाळ सव्वा महिन्याचं झाल्यावर 20-25 लोकांच्या उपस्थितीत नाव ठेवण्यात आलं. ईरा !
नाव ठेवल्यावर रिया लंडनला परत जाणार होती. पण महेशनं सांगितलं की तो नेहमीसाठी भारतात परतण्याचा विचार करतोय. बंगलोरला एका कंपनीनं त्याला छान जॉब ऑफर दिली आहे. सगळं सावरून यायला 1 महिना लागेल. तिला खूपच आनंद झाला. ती काही दिवसांसाठी माहेरी गेली.
पाहता पाहता सहा महिने लोटले. आपल्यामुळे राधाला प्रायव्हसीच मिळत नाही. हे ठीक नाही. म्हणून रवीनं त्याचा कात्रजचा फ्लॅट विकून राधाच्या शेजारचा फ्लॅट विकत घेतला. अरु घरात राहून बोर झाली आणि तास तास उदास बसू लागली. तिला असं पाहुन रवीनं तिला डॉक्टर जयाकडे नेलं.
"आराधना जॉब करायचा आहे?" डॉक्टर जयानं विचारलं.
"हो." तिचा चेहरा आनंदानं फुलला.
"माझी असिस्टंट म्हणून जॉब करशील?"
"मी आणि तुमची असिस्टंट?"
"हो तुझ्यात ते पोटेंशियल आहे गं."
"सॉरी डॉक्टर मधात बोलतोय. पण अरुला दगदग झेपेल का?"
"रवी बघ सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2 तास माझं हे क्लिनिक उघडं असतं. बाकी वेळ मी दुसऱ्या क्लिनिकमधे असते. अरुचं काम फक्त जे कोणी रुग्ण येतील त्यांची पूर्ण हिस्ट्री घ्यायची आणि माझ्याकडे पाठवायचं इतकंच राहणार. तसंच यामुळे ती माझ्या निगराणीतही राहील."
"ठीक आहे मग."
अरु परत काम करायला लागली, तिचा वेळ छान जाऊ लागला. मनाचा आणखी सखोल अभ्यास करता यावा म्हणून अरुनं माणसशास्त्रात पदव्युत्तर पदवीला दाखला घेतला. ती फक्त प्रॅक्टिकल करायला कॉलेजला जायची. आत्मनिर्भर झाली आणि ईरालाही भरभरून प्रेम देऊ लागली.
समाप्त.
आशा करते वाचकांना माझी ही कथा कादंबरी नक्कीच आवडली असेल.
तशी ही कथा आराधना आणि रवीचं लग्न होतं तिथंच संपवणार होते. पण मला वाटलं की लग्न जुळतांना मोठा प्रश्न असतो तो, मुलीला बायपोलर असो किंवा शुगर बाळ होणार का? आणि झाल्यावरही ते निरोगी होणार की नाही? म्हणून हे दोन भाग लांबवले. बाकी बायपोलर बद्दलही माहिती हवी असेल तर तशी कमेंट करा. मी त्यावरही एक भाग लिहिल.
माझा काही खूप सखोल असा बायपोलरचा अभ्यास नाही. तरीही मी ही कथा कादंबरी फक्त आणि फक्त वाचकांनी मानसिक विकार असलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवावा आणि कोणालाही असा काही त्रास असेल तर त्यानं सायकोलॉजिस्ट किंवा सायकिऍट्रिस्टची मदत घ्यावी या हेतूनं लिहिली आहे.
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment