Monday 25 May 2020

मीच माझी गुन्हेगार




मीच माझी गुन्हेगार 

"खूपच त्रास होतोय डॉक्टर. यापेक्षा मरण बरं असं झालंय बघा." चाळीशीत असलेली शारदा डॉक्टरला रडकुंडी येऊन सांगु  लागली.
"मूळव्याध व्याधीच अशी आहे बघ." शारदाला तपासात डॉक्टरीनबाई तिची चौकशी करु लागल्या, "कधी पासून आहे हा त्रास? रक्त कधी पासून पडू लागलं? आधी काही औषधं घेतली का?" 
"साधारण 3-4 वर्ष झालीत त्रास वाढून. रक्त पहिल्यांदा 5-6 वर्षांआधी पडलं होतं. खूपच आग झाली होती."शारदा प्रश्नांची उत्तरं आठवून सांगू लागली. 
"मग डॉक्टरला दाखवलं होतं का?"
"छे ! त्यात काय डॉक्टरला दाखवायचं. असं घरचे म्हणाले मग मलाही वाटलं तिखट खाण्याने त्रास होतोय म्हणून साधं खायला लागली."
"खूपच छान ! अती झाल्याशिवाय आपण बायका स्वतःकडे लक्षच देत नाही आणि मग हे असं भोवते."
शारदा गप्प होती. 
"बरं शी आल्यावर लगेच जायची की थांबून ठेवायची?"
आता शारदाला काय उत्तर द्यावं सुचेना.
"काय झालं? विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे शारदा."
"काय उत्तर देऊ डॉक्टर? लग्न झालं तेव्हापासून आयुष्यात कधी शी आल्याबरोबर मी टॉयलेटमधे शिरले ते आठवतच नाही. सकाळी उठल्यावर सगळ्यांचा नाश्ता, चहा, मग यांचा आणि मुलांचा डबा. एकीकडे प्यायचं पाणी भरून ठेवायची धूम. अशात कधी शी आल्याचं मेंदू मनाला सांगे अन कधी आधी हे करू दे, ते आवरू दे यात ती वेळ निघून जायची समजतच नव्हतं."
"मग शी ला केव्हा जायची?" 
"जेव्हा मोकळा वेळ मिळेल."
"आणि तेव्हा शी खूप कडक येत असेल? हो ना?"
"हो !"
"आताही तसंच करतेस?"
"सवय पडली."
"किती मुलं आहेत?"
"एक मुलगा, एक मुलगी."
"शारदा तुला वाईट नको वाटू देऊ." डॉक्टर उठून शारदा जवळ गेली. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाली, "पण हे खूप चुकीचं आहे शारदा. शी थांबवून ठेवणं हे एक मोठ्ठे कारण आहे मुळव्याधीचे. तुझी मुलगी तुझं पाहुन हेच शिकली तर पुढे तिलाही हा असाच त्रास भोगावा लागेल. अगं फक्त चाळीस वर्षांची आहेस तु आणि तुझं ऑपरेशन करावं लागेल असं दिसतंय."
"नाही, ऑपरेशन नको?"
"तुझा मूळव्याध तिसऱ्या स्टेजला आहे. त्यात इंटर्नल आहे. ज्यात ब्लीडींग जास्त होते. म्हणून तु इतकी अशक्त झाली आहेस. मी माझ्या सर्कल मधल्या अनुभवी डॉक्टर्स सोबत तुझी रिपोर्ट दाखवून सांगते ऑपेरेशनबाबत. पण तुलाही तूझ्यासाठी काही करावं लागेल."
"तुम्ही सांगणार ते सगळं करेल."
"पहिलं, सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायचं आणि शी येताच संडासात जायचं."
शारदाने होकारार्थी मान हलवली. 
"दुसरं रोज सकाळी 15 मिनिट तरी व्यायाम करायचा."
"सकाळी... "
"हो. काही प्रॉब्लेम आहे का? तुझे मिस्टर बसले आहेत ना बाहेर. बोलाव त्यांना."
"नको मी लक्ष देईल माझ्याकडे. खरं पाहता मीच गुन्हेगार आहे माझी. मीच दुर्लक्ष केलं स्वतः कडे. स्वतःला नेहमी शेवटी ठेवलं. आता मी तुम्ही सांगितलं तसं सगळं करेल."
"गुड ! घरातील स्त्री ठीक तर सगळं घर ठीक. आठ दिवसांनी ये." डॉक्टर स्मित करून म्हणाली. 

मी कितीतरी आया बायांना म्हणतांना ऐकलंय, "शी ला जायला फुरसत नाही मला." त्या सर्वांसाठी हा लेख आहे. मला माहित आहे आपल्याला खूप कामं असतात सकाळी पण पाच मिनिट आपण आपल्यासाठी काढूच शकतो ना. आपण स्त्रिया खरंच किती दुर्लक्ष करतो स्वतः कडे. घरातल्या सगळ्यांना वेळेवर नाश्ता करायला सांगतो, त्यांच्या हातात देतो आणि स्वतः मात्र तशाच राहतो अन रडतोही की कोणी मला खाल्लं का असं विचारातही नाही. 10 मिनिट बसून योगा करणंही आपल्याला उगी वाटतं. का? मला वाटतं आपण बदलू तेव्हाच इतरांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. 

फोटो साभार गुगल वरून 🙏

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Master of labour studies 

Master diploma of counseling in mental health

archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे गुन्हा आहे.
धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...