Tuesday, 19 May 2020

स्वीकार भाग 12

स्वीकार भाग 11 इथे वाचा
रवीनं राधाला फोन करून अरूबद्दल सांगितलं. तिनं लगेच माधव सोसायटीच्या सिक्योरिटीला कॉल करून अरुबद्दल विचारलं.  तेव्हा कळलं की अरु बस स्टॉपवर गेली तर होती पण लगेच परत आली. राधाने रवीला घरी जायला सांगितलं आणि ती स्वतःही घरी गेली. रवीनं त्याच्याजवळच्या चाबीनं दार उघडलं. त्याला अरु हॉल मधेच सोफ्यावर झोपलेली दिसली.  तिचा पर्समधे असलेला मोबाईल वाजतच होता. त्यानं मोबाईल काढला. राधाचा कॉल होता. रवीनं तिला घरी नाही आली तरी चालेल सांगितलं. थोडयावेळात अरुला जाग आली.
"तु ठीक आहेस ना?" रवीनं तिला विचारलं.
"हो. म्हणजे नाही. मला दोन तीन दिवसांपासून काहीच करा नाही वाटत आहे बघ. फक्त झोपायची इच्छा होतेय."
"उदास वाटतेय का?"
"हो तसंच काही. हुरूप नाही वाटत कशाचाच."
"बरं मग सांगायचं तसं. चल आपण डॉक्टर जयाला भेटून येऊ."
"हो तेच ठीक राहणार."
डॉक्टर जया एक नामवंत सायकिएट्रिस्ट. पूर्वा अरुची केस त्यांनाच सोपवून दिल्लीला गेली होती.
"मला जरा वेगळीच शंका येतेय." डॉक्टर जया अरुला तपासून म्हणाल्या.
"कसली शंका."
"अरु प्रेग्नेंट असल्याची."
"काय." रवी खुर्चीतुन उठून उभा झाला,"अहो मी तेरा वर्ष वैवाहिक आयुष्य जगलो पण मला बाळ नाही झालं."
"म्हणजे तुम्हाला अरुवर संशय आहे."
"नाही मुळीच नाही. पण म्हणून मी अरुसोबत लग्न झाल्यावर या गोष्टीचा विचारच नाही केला इतकंच सांगायचं आहे."
"तुम्ही टेस्ट नव्हत्या केल्या का मग तुम्ही आणि तुमच्या पहिल्या बायकोने?"
"नाही आम्हाला कमी कोणात आहे हे माहित करून कोणालाच हिणवायचं नव्हतं."
"बरं मग तुमच्या पहिल्या बायकोला मुल झालं का दुसऱ्या लग्नानंतर?"
"नाही, तिनं एक मुलगी दत्तक घेतली."
"ओके ! मी नर्ससोबत अरुला पाठवलं आहे युरीन टेस्ट साठी."
"पण डॉक्टर या वयात आणि अशा मानसिक स्थितीत बाळ... "
"मलाही तोच प्रश्न पडला आहे." अरु नर्ससोबत आत येऊन म्हणाली, "टेस्ट पॉझिटिव्ह आहे."
"डॉक्टर हेमा बिनीवाले, ही माझी मैत्रीण आणि चांगली गायनॅक आहे. तिला भेटा. तूझ्या सगळ्या तपासण्या करेल ती आणि बोलेल माझ्याशी. पण महत्वाचे हे आहे की तुमच्या दोघांना बाळ हवं आहे की नाही?"
दोघांनी एकमेकांकडे बघितलं.
"घाई नाही. आरामात घरी जाऊन बोला आणि ठरवा. कारण खरी परीक्षा बाळ झाल्यावर राहील. बाळ झाल्यावर अरुला सतत कोणीतरी मायेचं, तिची आपणहुन काळजी घेणारं सोबत लागेल. ज्याला तिच्या मानसिक परिस्थितीची पूर्ण जाणीव असेल. बाकी मूड डायरी तर तुम्ही ठेवलीय ते छान."
...............
अरुला घेऊन रवी डॉक्टर हेमाकडे गेला. डॉक्टर हेमाने तिच्या सर्व टेस्ट केल्या. सोनोग्राफी केली.
"सोनोग्राफीत बाळाची वाढ योग्य दिसते. बाकी ब्लड रिपोर्ट उद्या मिळतील. ज्यानं आपल्याला आराधनाचं हिमोग्लोबिन, थायरॉईड आणि शुगर कळेल. रिपोर्ट आले की मी बोलते जयासोबत." डॉक्टर हेमा म्हणाली.
रात्री दोघही घरी आले. दोघेही गप्प होते. राधाला वाटलं यांचं काहीतरी बिनसलं वाटतं. ती गरम गरम कांदे भजे घेऊन त्यांच्याजवळ गेली.
"घ्या गरम गरम भजे खा. नाहीतर अतुल एकटा संपवायचा सगळे."
"हो ते मी करु शकतो."
अरुला भज्यांचा तळणाचा वास सहन नाही झाला. तिनं  नाक दाबून घेतलं.
"अगं काय हे?  भजी तर आवडती आहेत ना तुझी?"
"हो पण मला आता मळमळ होतेय त्यांच्या वासानं."
"काय? राधाला अमनच्यावेळी असं व्हायचं. काय रे रवी काही गोड बातमी आहे की काय?"
"अतुल काहीही."
"अतुल बरोबर बोलला." रवी म्हणाला. त्यानी डॉक्टर जयानं बोललेलं सगळं राधा आणि अतुलला सांगितलं.
"मग काय ठरवलं तुम्ही?" राधानं त्याला विचारलं, "मी आहे ना जातीनं सगळं करणार अरुचं. तुम्ही दोघं फक्त हो म्हणा."
"खूप भीती वाटते गं राधा मेनोपॉज यायच्या वयात हे बाळंतपन!"
"असं समज तुला वयाचं 48 वं नाहीतर 28 वं वर्ष सुरु आहे. म्हणजे भीती वाटणार नाही."
"काहीही राधा."
"अगं खरंच. चल तूझ्या आईला ही गोड बातमी सांगू." राधानं फोन हातात घेतला.
"राधा अजून रिपोर्ट नाही आलेत. ते आल्यावर सांग  त्यांना."
"ते काहीच नाही. त्यांचा हक्क आहे हे सगळं माहित असण्याचा."
राधानं महेशला व्हिडीओ कॉल लावला. अरुची बातमी सांगितली. त्यांना खूप आनंद झाला.
"अरु आनंदी दिसत नाही." रियानं तिचा चेहरा वाचला. तेव्हा राधानी इतर गोष्टींची कल्पना त्यांना दिली. बाळ झाल्यावर अरुला पोस्टपार्टमचा (मातृत्वानंतर येणारे नैराश्य) त्रास होऊन तिची मानसिक परिस्थिती बिघडू शकते. तेव्हा अरुजवळ 24 तास कोणीतरी लागेल आणि बाळाला पाहायला एकजण वेगळं लागेल.
"इतकंच ना! मी पुढल्याच महिन्यात येते तिकडे. तु काळजी करु नकोस. आपण मिळून करु सगळं." अरुची आई म्हणाली.
"हो, आम्ही आईला पाठवतो तिकडे आणि बाळ झाल्यावर मी येते 2 महिने नक्कीच राहीन माझ्या नणंदबाईसाठी."
"का इतका त्रास घेताय तुम्ही सर्व." अरु चिडक्या स्वरात म्हणाली. तिचा मूड बदलतोय हे पाहुन रवीनं तिची मूड डायरी तिच्या हातात दिली. अरुला डायरी पाहताच लक्षात आलं आपला मूड बदलतोय. ती शांत झाली.
"काही त्रास वगैरे नाही अरु. तूझ्या हिश्याचंच तुला देत आहोत."
"मग ठरलं आपल्या घरी लवकरच पाळणा हलेल." अतुल म्हणाला, " तोंड गोड करायला हवं होणाऱ्या आई बाबाचं. मी काहीतरी गोड घेऊन येतो."
अरुचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले. अरुला इतर काही त्रासही नव्हता. अरु आणि रवीनं डॉक्टर जयाला ते बाळाला जन्म देणार हा निर्णय सांगितला. त्यांनी दोघांचं अभिनंदन केलं. डॉक्टर हेमासोबत बोलून त्या म्हणाल्या,
"अरु तुझं शारीरिक आरोग्य उत्तम आहे. तरीही बाळंतपण इतकं सोपं होणार नाही. पण जवळ जवळ सगळ्याच मातांना बाळ झाल्यावर नैराश्याला समोर जावं लागतं. तुझी काही औषधं कमी करते, काही बदलते पण औषधं घ्यावीच लागतील. म्हणून बाळाला तुझं दूध पाजता येणार नाही. म्हणजे वरचं दूध देऊ. आता इतकंच. बाकी दर महिन्याला आणि जेव्हाही काही त्रास वाटला फोन करून ये."
"एक शंका आहे."
"बिनधास्त बोल गं."
"माझा हा विकार अनुवांशिक रित्या बाळाला होऊ नये यासाठी काही करता येईल का?"
"खूप महत्वाचा प्रश्न विचारला तु. असं आहे बघ याबाबत मी सुद्धा काहीच कन्फर्मेशन नाही देऊ शकत. कारण खूपदा असं दिसून येतं की आईबाबांची बायपोलरची हिस्ट्री असूनही मुलांना तसला काहीच त्रास नसतो. आणि एकदम सामान्य पारिवारिक इतिहास असूनही काहींना गंभीर मानसिक आजार होतात. त्यातही बाळ पोटात असतांना तुझं मानसिक आरोग्य कसं आहे? त्या गर्भावर तु काय संस्कार करतेस यावर सगळं अवलंबून आहे."
"असं असेल तर मी माझी उत्तम काळजी घेईल."
"घ्यायलाच हवी. काय रवी!"
"हो आम्ही अरुसाठी पूर्ण दिवसाचं वेळापत्रक परत तयार करतोय." रवीनं दाखवलं नाही पण मनातून त्याला अरुची खूप चिंता वाटत होती.
"गूड! पण तिची काळजी घेतांना स्वतःला विसरू नकोस.'' डॉक्टर जया त्याचे भाव टिपून म्हणाली.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...