स्वीकार भाग 10 इथे वाचा
अरु रोज रवीसोबत पराठा शॉप मधे सकाळी 8 वाजता जाऊ लागली. दोन कुक आणि दोन वेटर असा स्टाफ होता. रवी मार्केटिंग सांभाळायचा आणि अरु कस्टमरला. तिचं लाघवी बोलणं, हसून ऑर्डर घेणं आणि विचारपुस करणं तिथं येणाऱ्यांना भावून जायचं.
एकदा एक पन्नाशीतील स्त्री तिच्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन शॉपमधे आली.
अरुनं त्याला हाय केलं आणि काय खाणार ते विचारलं.
"नमस्कार, पोहा पाहिजे." तो म्हणाला.
"मॅम तुम्ही?"
"मला आलू पराठा."
"ओके."
अरुनं कुकला आलू पराठा आणि पोहा बनवायला सांगितलं. "किती वेळ लागेल?"
"पाच मिनिट फक्त."
"अच्छा. तुम्ही नवीन ना इथे?"
"हो."
"आधी कुठे होतात? आणि हे (रवीकडे बोट दाखवून) तुमचे मिस्टर का?"
"आमचं लग्न होणार आहे. ते आधी लद्दाखला नोकरी करायचे आणि मी नागपूरला असायलम मधे होती. आता 3-4 महिने झाले मला तिथून निघून."
"काय? एक वेडी बाई इथे काम करतेय?" तिनं नातवाला तिच्याजवळ घेतलं जसं काही अरुला काहीतरी संसर्ग झाला अशी ती 2 हात दूर गेली अरुपासून, "तुमचं हे शॉप बंद व्हायला हवं. आमच्या मुलांवर काय संस्कार होतील अशाने?"
काय झालं हे पाहायला रवी त्यांच्याजवळ आला. त्याच्या मनात आलं त्या बाईला खूप खरी खोटी ऐकवावं. पण अरुनं त्याला थांबवलं.
"अरु !"
"असू दे. हे होणारच होतं. हेच मला तुला दाखवायचं होतं. माझा सामान्य म्हणून स्वीकार नाही करणार हा समाज. याची झळ तुला बसेल. जे मला नकोय."
"आम्ही बोलू काही." एक सत्तरीच्या आसपास असलेलं जोडपं उठून त्यांच्याजवळ आलं.
"हा काही हवं का? सॉरी आम्ही आमच्याच गोष्टीत बिझी झालो होतो."
"असू द्या. आम्ही ऐकलं सगळं. त्याबद्दलच मला तुम्हाला काही सुचवायचं आहे." जोडप्यातील काकू प्रसन्न हसून म्हणाल्या.
"काय?"
"तु कर्वे शिक्षण संस्थेत सहा महिने किंवा एक वर्षाचा समुपदेशनाचा कौन्सिलिंग इन मेंटल हेल्थ कोर्स कर. तुला स्वतःला आणखी चांगल्यानं जाणून घेता येईल. तसेच इतर जे रिहॅब सेंटर आहेत त्यांच्या भेटी घे. तिथल्या पेशंटचे व्यक्तीमत्व विकासाचे वर्ग घे. स्वतःच्या अनुभवांची खान उघडी कर त्यांच्यासमोर. होऊ शकतं तुझ्यापासून प्रेरणा घेऊन काही मानसिक रुग्ण त्यांच्या कोशातुन बाहेर पडायचा प्रयत्न करतील."
"अगं बस. तिला तु काय बोलतेय ते समजू तर दे."
"मला फक्त इतकंच सांगायचं आहे की अशी लोकं तुला पदोपदी भेटतिल तेव्हा स्वतःच मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नकोस."
"हो नक्कीच."
"आणि मला तुमची ती कोर्स जॉईन करायची आयडिया आवडली. मी आजच जाऊन माहिती काढतो."
या प्रसंगानं अरुच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं. कोर्स जॉईन केल्यावर ती (मानसिक स्वास्थ्य)मेंटल हेल्थ विषयी जागृती अभियान चालवणाऱ्या काही संस्थांसोबत जुळली. ती आणखी व्यस्त झाली. कोण काय म्हणतं? का म्हणतं? याकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळत नव्हता. रिहॅब सेंटरमधे ती वर्ग घेऊन यायची तेव्हा तिच्याजवळ इतक्या गोष्टी असायच्या सांगायला आणि अर्थातच ऐकायला रवी सज्जच असायचा. तो तिची खूप काळजी घ्यायचा. सकाळी ती कॉलेजला जायची तेव्हा तिचा टिफिन पॅक करून देणं, देण्यापासून ति दुपारी पराठा शॉपमधे परतली की तिला आधी जेवण वाढून देणं. रिहॅब सेंटरला वर्गासाठी घेऊन जाणं. परत आणणं. सगळं तो मनापासून करत होता. पावसाळा सुरु झाला.
"आज मी कॉलेजला जाणार नाही आणि तु शॉपमधे." खिडकीबाहेर बघत अरु म्हणाली.
"काय विचार काय आहे मॅडमचा?"
"बाहेर बघ ना किती मस्त वातावरण झालंय पावसानं. आपण चौघ खडकवासला जाऊ."
"तुम्ही दोघ जा. आम्ही नोकरदार. सुट्टी नाही मिळायची आम्हाला."
"हे तुमचं नेहमीचच." अरुनं जीभ चावली.
"असं?" राधानं तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं.
"सॉरी."
"अगं जा तुम्ही दोघं."राधा तिला लाडात म्हणाली.
मग अरुनं कॉलेजच्या सरांना, तिचं आज यायला जमणार नाही असा मेसेज केला आणि रवीनं पराठा शॉपमधे कळवलं तो उशिरा येईल ते. ते दोघंच बाईकनं निघाले खडकवासल्याला अन जाता जाता सिंहगडवर जाऊन पोहाचलें. अरुला उंचीची भीती वाटत होती. तिनं डोळे घट्ट मिटले आणि रवीला दोन्ही हातांनी पक्क पकडलं.
"मॅडम डोळे उघडा आणि सोडा आम्हांला. आपण आलो गडावर."
"अरे हो. किती सुंदर दिसतंय ना सगळं पावसानं न्हाऊन निघाल्यावर."
"हो."
थोडावेळ फिरल्यावर दोघं एका ठिकाणी चहा प्यायला बसले. अरु मंद मंद स्मित करत रवीला पाहु लागली.
"काय झालं."
"उंहू, झालं नाही होतंय."
"म्हणजे, तब्येत ठीक नाही वाटत का? परत जायचं का आपण?"
"नाही रे." त्याचा हात पकडून ती म्हणाली, "तुला किस करायची इच्छा होतेय.''
"माझी मस्करी करतेयस तु."
"अजिबात नाही. महाराजांच्या गडावर आहेस म्हणून वाचला तु."
"काय?"त्याचा चेहरा अगदी गोरा मोरा झाला.
"आपण उद्याच लग्न करूया."
"ए बस. हार्ट अटॅक येईल मला. पन्नासावा वाढदिवस आहे पुढल्या महिन्यात माझा."
"नाही खरंच आपण उद्या लग्न करु. मी आता मानसिक रित्या त्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे."
राधा आणि अतुलने त्यांचं आदर्श पद्धतीने मंदिरात लग्न लावून दिलं. व्हाट्सअप व्हिडीओ कॉल वरून अरुच्या आईबाबा, महेश, रियानं त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
त्यांचं वैवाहिक जीवन सुरु झालं. कधीकधी अरुला मूडस्विंगचा त्रास व्हायचा. पण आता तिला आणि रवीला हे होईलच आणि तेवढा वेळ गेला की मूडही ठीक होईल हे कळायचं. म्हणून ते फक्त असं झालं की वहीत नोंद करून ठेवायचे. म्हणजे सायकिऍट्रिस्टला भेटायला गेलं की हा डाटा दाखवून त्यानुसार ती ट्रीटमेंट देई. अरुचा समुपदेशनचा अभ्यास वर्ग पूर्ण झाला. परीक्षा झाली. ती चांगल्या मार्कात पास झाली. एका नावाजलेल्या रिहॅब सेंटर मधे अरुनं शिकाऊ समुपदेशक म्हणून काम करणं सुरु केलं. तिकडे रवीचं पराठा शॉपचा चांगला जम बसला. सकाळी 7 ते 9 आणि दुपारी ऑफिसचे लंच ब्रेक झाले की त्याला बसायचीही उसंत मिळत नव्हती. त्याची दगदग पाहुन आता पुढे आपणच आपली जबाबदारी घ्यायचं तिनं ठरवलं.
"यापुढे कुठेही मी एकटीच जात जाईल. तुम्ही आपापली कामं सोडून माझ्या मागे धावायची गरज नाही. जिथं जाईल तिथं जायच्या आधी आणि पोहोचल्यावर तुम्हाला मेसेज करत जाईल." राधा, अतुल आणि रवीला तिनं तिचा निर्णय सांगितला.
"अगं पण... " राधा म्हणाली.
"प्लीज... "
"मला अरुचा निर्णय पटतोय." अतुल म्हणाला.
"मी पण तिच्याशी सहमत आहे."रवी म्हणाला. आणि अरुचं आत्मनिर्भर आयुष्य सुरु झालं. रवीनंही खबरदारी म्हणून अरु समुपदेशन करायला जात असलेल्या रिहॅब सेंटरच्या ऍडमिनला अरु तिथं गेल्यावर आणि तिथून निघाल्यावर कॉल किंवा मेसेज करायला सांगितलं.
"हॅल्लो, आज अरु समुपदेशन करायला सेंटरवर आली नाही. मी कॉल केला तर ती उचलत नाहीये."
"काय?"
"हो, म्हणूनच तुम्हाला कॉल केला."
"थँक्यू ! मी बघतो घरी जाऊन."
रवीनं अरुला फोन लावला. 3-4 वेळा लावला पण तिनं उचलला नाही. आता त्याला तिची खूप काळजी वाटू लागली. थोडया वेळात येतो असं स्टाफला सांगून पराठा शॉपच्या बाहेर पडला. त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं.
"अरुनं तयारी तर केली होती रिहॅबला जायची. मग पोहोचली का नाही? कुठे गेली असेल? काय करत असेल?"
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment