स्वीकार भाग 9 इथे वाचा
"अरु दार उघड." राधानं आराधनाला आवज दिला.
"अरु मावशी बाहेर ये प्लिज."
"बाळा असं नको करु."
"अरु प्लिज ऐक आमचं."
सगळे बोलले पण अरुने दार उघडले नाही. तिनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करु नये हिच भीती सगळ्यांच मन खात होती. अर्णव रेस्टॉरंट रिसेप्शन वर रूमची डुप्लिकेट चाबी घ्यायला गेला.
"मी गॅलरीतुन आत जातो आणि दार उघडतो."अमन म्हणाला.
"अमन तु जा. दार उघडू नकोस. लपून फक्त अरुवर लक्ष ठेव."
"का?"
"मला वाटतं की दार तिनं स्वतः तिच्या इच्छेनं उघडावं. अन बघ ती उघडनार दार. ती स्वतःच येईल बाहेर. तिला थोडा वेळ हवा." पूर्वा म्हणाली.
"अरु का गं अशी वागतेस? तु यांचं दिवसाची वाट पाहत होतीस ना. रवी बोलला आज त्याच्या मनातलं. तुही बोल. मोकळी हो." राधा अरुला म्हणाली.
रवीला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, "मला वाटतं मी खूप दुखावलं तुला अरु. मोठी चूक केली. मला माफ कर. मी परत कधीच तूझ्या समोर नाही येणार. जातो मी." तो तिथून जाऊ लागला. तोच अरुनं दार उघडलं.
"रवी थांब." अरु म्हणाली, "मला काही कळत नाही काय होतंय? खूप भीती वाटतेय. हे सगळं स्वप्न आहे. मी जागी होईल अन स्वप्न भंगून जाईल." अरु खाली बसून रडू लागली.
"अरु रडायचं आहे रड. त्यात काहीच गैर नाही."पूर्वा तिला म्हणाली, "रवी आराधनाला आत ने." रवी आणि राधा अरुला हात धरून आत घेऊन गेले.
"तुम्ही लोकं जा बर्थडे पार्टीला."
"आई असं कसं म्हणतेय तु? आराधनाला सोडून नाही जाणार आम्ही."
"अरे तिला शांततेची गरज आहे. समजून घे फुलराणी. आम्ही येतोच थोडयावेळात अरुला घेऊन."
"ओके आम्ही बागेत बसतो मग. तुझं झालं की सांग. मॅनेजरला बाहेरच डिनर लावायला सांगेल."
"गूड."
पूर्वानं रूम सर्व्हिसला फोन करून निंबू शरबत आणायला सांगितलं. ती आराधना जवळ गेली. "अरु तुला जे योग्य वाटेल ते कर. कोणाचीही जोर जबरदस्ती नाही. फक्त ताण घेऊ नकोस." वेटर निंबूशरबत घेऊन आला, "हे शरबत घे आणि आराम कर. तु म्हणशील तर इथे बसतो आम्ही नाहीतर बाहेर जातो."
"नाही इथेच बसा माझ्याजवळ." निंबूशरबत पिऊन ती शांत बसली.
"मी येतो बाहेर काय चाललं ते पाहून." रवी बाहेर जायला उठला.
"थांब." अरुनं त्याला थांबवलं," मला बोलायचं आहे तूझ्याशी."
"हो तुम्ही बोला. मी आणि राधा बघते बाकीच्यांच काय सुरु आहे ते." पूर्वा आणि राधा बाहेर गेल्या.
"सॉरी."
"कशाला."
"मी असं रिऍक्ट केलं म्हणून."अरु रवीला म्हणाली, "पण हेच माझं सत्य आहे. हे माझे बदलते मूड्स माझ्या मृत्यूसोबतच संपतील."
"अरु प्लिज असं बोलू नकोस."
"हो पण हे खरं आहे. होऊ शकतं पुढे चालून तुला माझ्या अशा मूड स्विंग्जचा कंटाळा येईल. जेव्हा आजूबाजूची लोकं माझा अस्वीकार करतील, तुला एका असायलम मधून आलेल्या बाईचा नवरा म्हणतील, तेव्हा तु मला सोडून देशील."
"हे काय बोलतेय तु?"
"जे घडू शकतं ते बोलतेय. म्हणून मला वाटतं की तु आधी काही दिवस माझी वागणूक बघ. मला चार लोकात तुझी होणारी बायको म्हणून मिरव आणि नंतरच काय तो निर्णय घे. उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस."
"ठीक आहे तु जे म्हणशील ते."मग थोडा विचार करून तो म्हणाला, " तु माझ्या रेस्टॉरंट मधे काम करशील, माझ्यासोबत दिवसभर राहा म्हणजे तुलाही मला समजून घेता येईल आणि मला तुला... हवं तर काही दिवस मी राधाकडेच राहायला येतो. म्हणजे तुझी संपूर्ण दिनचर्या मला समजेल."
"चालेल."
"Done." रवीनं हात पुढे केला.
"Done." अरुने त्याच्या हातात हात दिला.
फ्रेश होऊन ते दोघं बागेत गेले. डिनर लावलेला होता. रोमँटिक मधुर संगीत सुरु होतं. कोणीही काहीही प्रश्न विचारणार नाही, हे पूर्वानं आधीच सगळ्यांना सांगितलं होतं. त्यामुळे कोणीच काही विचारलं नाही. टेबलवर मेनबत्त्या लावण्यात आल्या. कॅण्डल लाईट डिनर असाच असतो ना. हसत बोलत जेवण झालं.
ट्रिपवरून सर्व आनंदात पुण्याला परतले. अरुनं तिचा पुण्यातच राधासोबत राहायचा आणि रवीबाबतचा निर्णय महेशला सांगितला.
"तुझ्यावर मी माझं मत लादणार नाही. पण प्लिज यावेळी निराश होऊन परत काही उलट सुलट करु नकोस. मी माफ नाही करु शकणार स्वतःला."
"नाही दादा. तसं होणार नाही. काही असलंच तर मी सांगेल तुला आणि हा स्मार्ट फोन आहेच ना. मी रोज व्हाट्सऍप व्हिडीओ कॉल करून बोर करत जाईल तुला."
"चालेल गं अरु." रिया म्हणाली, "महेशचा खूप जीव आहे तूझ्यात. काळजी घे स्वतःची."
"हो." अरुनं रियाला मिठी मारली, "तु दिलेला ड्रेस खूप सुंदर आहे. थँक्यू."
"तुझा हक्क आहे तो. अजून खूप काही द्यायचं आहे तुला. चल लंडनला आमच्याकडे."
"आता नको."
"ठीक आहे."
10 तारखेला रवीच्या रेस्टॉरंटच उदघाट्न झालं. महेश, रिया, अर्णव आणि अरुचे आईबाबा लंडनला परत गेले. अमनची सुट्टी संपली. तो कॉलेजला परत गेला. त्यानी आणि फुलराणीनं बोलून ठरवलं की लग्न तो नेव्ही ऑफिसर झाल्यावरच करेल. जे योग्यच आहे आणि फुलराणीला पुस्तक लिहायला नवीन विषय सुद्धा मिळाला होता, "मनोरुग्णाचा स्वीकार!" पूर्वानं अरुची सगळी जबाबदारी पुण्याच्या एका सायकीऍट्रीस्टला सोपवली आणि ती फुलराणीसोबत दिल्लीला परत गेली.
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment