रवीनं माथेरानला 2 दिवस राहण्यासाठी रिसॉर्टमधे बंगलो सारखं डुप्लेक्स बुक केलं. रिसॉर्टची बाग सुंदर रंगींबेरंगी फुलांनी जनु नटली होती. सगळ्यांना आवडली जागा. आजूबाजूला पेरूची, आंब्याची झाडं पाहून पोरांनी दुसऱ्या दिवशी पेरूंचा समाचार घ्यायचं ठरवलं. रात्री छान जेवण आणि गप्पा टप्पा झाल्या. जून महिन्याचा पहिलाच आठवडा. रिमझिम पावसाची एक सर आली अन वातावरण प्रफुल्लित करून गेली. यंग जनरेश म्हणजे फुलराणी, अमन आणि अर्णवच मन होतं की रात्री बारा वाजता आराधनाला हॅपी बर्थडे करून सरप्राईज द्यायचं. पण पूर्वानं त्यांना नकार दिला. अरुच्या मानसिक आरोग्यासाठी पूर्ण झोप होणं महत्वाचं होतंच पण तिची दिनचर्या पाळल्या जाणं ही महत्वाचं. म्हणून मग सगळ्यांनी पहाटे लवकर उठून हॉटेलच्या बागेतील फक्त फुलं आणून तिच्या बेडजवळ ठेवायची, आणि माथेरान फिरून आल्यावर संध्याकाळी पार्टी करून वाढदिवस साजरा करायचं असं ठरलं. सर्वांनी तसंच केलं.
सकाळी 6 चा अलार्म वाजला तशी अरु उठून बसली. समोर बघते तर गुलाबाची, चाफ्याची, जाई जुईची, आणि इतर रंगीं बेरंगी फुलंच फुलं. तिला वाटलं आपल्याला भ्रम होतोय म्हणून तिनं डोळे चोळले. तरीही फुलं तिथंच.
"अशी काय बघतेस ! मुलांनी तुझ्यासाठी स्वतः फुलं तोडली आणि बुके बनवले."
"का? "
"आज वाढदिवस आहे तुझा. हॅपी बर्थडे डिअर." राधा तिला ओंजळभर चाफ्याची फुलं देऊन म्हणाली. तिनं त्यांचा सुगंध घेतला.
"thankyou राधा." तिचे डोळे भरून आले, "तु नसती तर माझं काय झालं असतं?"
"तो विचार करायचा आजचा दिवस नाही." पूर्वा म्हणाली, "हॅपी बर्थडे. आज फक्त छान छान विचार करायचा."
"हो गं अरु."
"माझी द्वाड पोर येईलच इतक्यात. फ्रेश व्हा. चहा घेऊन ट्रेकिंगला जाऊ."
ट्रेकिंगसाठी सगळ्यांचा ड्रेसकोड सारखाच ठेवलेला. ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट. अरु तयार होऊन बाहेर आली.
"काय मस्त दिसतेय गं तु." फुलराणीनं लगेच अरूचा फोटो काढला,"तु ना जीन्स टी शर्टच घालत जा."
"हो खरंच की, महेशची बहीण नाही, मुलगी दिसतेय तु."रिया म्हणाली.
"काहीही. मी इतका म्हातारा दिसतो का"
"नाही रे, रिया म्हणतेय की अरु तरुण दिसतेय."आराधनाची आई म्हणाली. अरूचा चेहरा लाजेनं लाल झाला. तिनं आईला मिठी मारली.
"खूप सुंदर दिसतेय माझी पोर. अजूनही लग्नाचा विचार केला तर मुलांची रांग लागेल."
"बस ना गं."
बडबड आणि हसण्याचा आवाज ऐकून रिसॉर्ट मॅनेजरसोबत, 'अरुच्या बर्थडे पार्टी' बाबत चर्चा करत असलेल्या रवीची नजर तिकडे वळली आणि जाऊन अरुवर खिळली. त्याला 21 वर्ष आधीच्या आराधनाची झलक तिच्यात दिसली. आजही तशीच, तीच अंगकाठी... तोच अवखळपणा. त्याच्या मनात वंदना विटणकर यांचं मोह. रफींनी गायलेलं गाणं वाजू लागलं.
"तुझे रूप सखे, गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा गं ध्यास जडे
हा छन्द जीवाला लावी पिसे....."
4 वाजेपर्यंत मंडळ दिवसभर फिरून, हल्ला गुल्ला करून दमून भागून रिसॉर्टमधे परतलं. फ्रेश होऊन जरा पेंगलं. अरुचे आईबाबा तब्येतीमुळे रिसॉर्टमधेच थांबले होते. अरुला आईच्या हातचे बेसनलड्डु खूप आवडायचे. म्हणून आईने रिसॉर्ट मॅनेजरशी बोलून स्वतःच्या हातानं वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून बेसनलड्डू बनवले.
रात्रीचे 7 वाजले. बर्थडे पार्टीची वेळ झाली. सगळे रिसॉर्टच्या पार्टी हॉलमधे जमले. रियाने अरुसाठी वाढदिवसाला घालायला सुंदर अनारकली भेट दिली. राधाने अरुला छान तयार करून आणलं. पिस्ता कलरच्या प्लेन सिल्क अनारकली ड्रेसमधे अरूचा गौर वर्ण अजून निखळला. कानातील खळ्यांचे डूल जणू आकाशातील तारे आणि मानेवरून खाली मोकळे सोडलेले केस म्हणजे आभाळ...रवीच्या मनात आलं. तिला पाहून त्याचं मन परत गाऊ लागलं,
"तुझे रूप सखे, गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा गं ध्यास जडे
हा छन्द जीवाला लावी पिसे....."
"फक्त पाहणारच की काही करणार सुद्धा." महेश रवीला म्हणाला.
"असं काहीच नाही दादा. मी बस... "
"अजूनही लपवशीलच मनातलं. ठीक आहे लपव."
"नाही. मी योग्य वेळेची वाट पाहतोय."
"पाहा पण एक लक्षात ठेव फक्त हे आठच दिवस आहेत तूझ्याजवळ वाट पाहायला. मी लंडनला जातांना अरुला घेऊन जाणार आहे."
केक हॉलमधे आला. कट झाला. अरुनं आईबाबाला केक भरवला. ती राधाला केक भरवायला पुढे झाली. तो रवी तिच्यासमोर एका पायावर बसून तिला म्हणाला,
"एकटा फिरून फिरून थकलोय मी, माझी सहचरणी बनशील?
आयुष्याच्या सेकंड इंनिंगमधे सोबत हवी असतेच, माझी जीवनसंगिनी होशील?
शब्दांनी सगळंच ओळखता येतं, सांगता येतं बोलता येतं, तु त्यांचा आसरा न घेता, माझ्या मनातील गुपित ओळखशील?" रवी काय बोलतोय, ती काय ऐकतेय? अरुला काहीच कळत नव्हतं. तो बोलतच होता, "अरु आपण एकमेकांसाठीच जन्माला आलो. पण आपण आपल्या भावना एकमेकांसमोर कधी व्यक्तच केल्या नाही. कदाचित त्याचीच शिक्षा म्हणून आपलं 21 वर्षांचं आयुष्य आपल्यासाठी एक वाईट स्वप्न बनलं. मी तुला माझ्या भावना वेळेवर सांगितल्या नाहीत. मला माफ कर."
अरुचे डोळे भरून आले. तिला राहवलं नाही. रवीला कडाडून मिठी मारून ती हुंदके देऊन रडू लागली. रवीही तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचं सांत्वन करु लागला. दोघांना जणू जागेचा, त्यांच्या वयाचा, आजूबाजूच्या लोकांचा, सगळ्यांचा विसर पडला. त्यांच्यासोबत इतरही सर्व रडू लागले. हे पाहून अमनचा चेहरा पडला. त्याला सिरीयस वातावरण अजिबात आवडत नव्हते. म्हणून तो मोठ्यानं म्हणाला, "लहानांनी आणि वृद्धांनी आपले डोळे बंद करावे नाहीतर एकमेकांना मिठी मारावी. तसही आज मुन्नाभाईच्या जादूच्या झप्पीचा दिवस आहे."
हे ऐकून सर्वांना हसू आलं. अरु आणि रवीही दूर झाले आणि हसू लागले.
"आयुष्याच्या सेकंड इनिंग बद्दल काय विचार आहे? लग्न करशील माझ्याशी?"रवीनं अरुला विचारलं.
अरुला धडधड होऊ लागलं. हाताला घाम फुटला. हे सर्व किती दिवस टिकेल? आपल्याला परत मॅनियाचा अटॅक आला म्हणजे? आपण डिप्रेशनमधे गेलो तर? तिचं मन तिला प्रश्न करु लागलं. ती काहीच न बोलता बंगलोच्या रूममधे धावत गेली आणि तिनं स्वतःला आत बंद करून घेतलं.
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment