Tuesday, 19 May 2020

स्वीकार भाग 6

स्वीकार भाग 5 इथे वाचा 

स्वीकार भाग 7 इथे वाचा
पूर्वा आणि अतुल घरी येताच राधानं सोसायटीची 7 दिवसात फ्लॅट खाली करायची किंवा आराधनाला दुसरीकडे शिफ्ट करायची नोटीस दाखवली.
"हे काय भलतंच. यांना काही अक्कल आहे कि नाही." पूर्वा.
"मग काय आपल्यासोबत मिटिंग न घेता, आपलं म्हणणं ऐकून न घेता अशी कशी नोटीस देऊ शकतात हे? सोसायटी बांधली तेव्हापासून 9-10 वर्ष झाले राहतोय आपण इथे." सोसायटी प्रेसिडेंट मि प्रथमचा नंबर डायल करत अतुल म्हणाला, "मी बोलतो त्यांच्याशी."
"हॅल्लो!"
"हॅल्लो, मी अतुल नगरकर बोलतोय."
"बोला."
"मला सोसायटीच्या मिटिंगमधे बोलायचं आहे. मिटिंग न घेता अशी नोटीस देणं कायदेशीर नाही. आम्ही शांत असतो याचा अर्थ असा नाही कि तुम्ही आमच्यावर काहीही थोपवणार."
"अतुल माझ्यावर कशाला चिडताय. मोती सोसायटी सेक्रेटरी नायकचा डॉगी. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी नाही जाऊ शकलो त्यांच्यापुढे. तरीही मी प्रयत्न करतो उद्या सकाळी मिटिंग घ्यायचा."
"प्रयत्न नाही. मिटिंग झालीच पाहिजे. नाहीतर मी पोलिसात तक्रार करेल."
मि. प्रथमने फोन ठेवला होता.
.............
सर्वांना आपल्या ऑफिसला जायचं असल्यामुळे सकाळी 8 वाजताच मिटिंग घेण्यात आली. तशी माधव सोसायटी खूप मोठी नव्हती. 3 BHK असलेले 150 फ्लॅट त्या सोसायटीत होते. त्यातल्या 80-90 जवळपास फ्लॅट धारकांना तर सोसायटीत काय आणि का चाललं याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. उरलेले हे सेक्रेटरी आणि प्रेसिडेंटला फॉलो करत होते. तेवढेच काय 60-70 फ्लॅटधारक मिटिंगला उपस्थित होते.
मिटिंग सुरु झाली. सेक्रेटरीनं मिटिंगचं कारण सांगितलं,
"तसं तर आम्ही नोटीस दिली पण मि. अतुल नगरकर ऐकायला तयार नाहीत. म्हणून इथेच आपण लाईव्ह वोटिंग करु आणि ठरवू कि पागलखाण्यात 21 वर्ष राहिलेल्या बाईला आपल्या सोसायटीत ठेवायचं नाही."
"हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट पागलखाना हा शब्द आपल्यासारख्या सुशिक्षित पुणेकरांना शोभत नाही. असायलम म्हणा. दुसरी गोष्ट ती वेडी नाही. फक्त मानसिक रित्या खचली आहे."
"जे असेल ते. आम्हाला अशी स्त्री आमच्या सोसायटीत नको आहे."
"कशी स्त्री? असायलमच्या सिनियर सायकिऍट्रिस्टची परवानगी घेऊनच आम्ही आराधनाला घरी आणलं आहे. आणि मि स्वतः ही एक सायकोलॉजिस्ट, PHd सायकोलॉजि   आहे. 24 तास तिच्यावर नजर ठेऊन असते. आज 10 दिवस झालेत. कधीतरी तुम्हा लोकांना तिनं काही त्रास दिला का?"
"अरे वा !" मिसेस शालिनी म्हणाल्या, "आज तुम्ही आणलं एका पागलला सोसायटीत, उद्या आणखी कोणी कोणाला घेऊन येईल. आम्हाला आमची सोसायटी माणसांचीच ठेवायची आहे. पागलांची नाही."
"तुमच्या मैत्रिणी सारख्या पेशंटसाठी पुण्यात खूप संस्था आहेत. हवं तर पत्ते मि देतो."मि. केवल म्हणाले.
अतुलनं डोक्याला हात लावला. राधाला सर्वांचा खूप राग आला. खूप काही ऐकवायचं मन होतं तिचं. पण ते समजून घेणार असले तर उपयोग. डॉक्टर पूर्वालाही कसं समजावू असं झालं. लाईव्ह वोटिंग झाली. अर्थातच जमलेले अर्ध्यापेक्षा जास्त सेक्रेटरीच्या प्रभावात होते. त्यांनी आराधनाला सोसायटीत जागा नाही असंच वोटिंग दिलं. फुलराणीनं सगळं व्हिडीओ रेकॉर्ड केलं.
"तर वोटिंग नुसार मिसेस राधा नगरकर आपल्या मैत्रिणीला इथे ठेवू शकणार नाही."
"नक्की?" फुलराणीनं एन्ट्री घेतली, "एकदा फेरविचार करा."
"तु कोण?"
"मी फुलराणी मुक्त पत्रकार आणि लेखिका आहे आणि मी इथं चाललेलं सगळं माजण रेकॉर्ड केलं आहे. काय आहे ना यु ट्यूब वर माझे जवळपास 5 लाख स्बस्क्रायबर आहेत आणि फेसबुकवर 6 लाखाच्यावर फॉलोवर आहेत. मी तुमचा व्हिडीओ फेसबुक आणि यु ट्यूबवर वायरल केला तर इथं पाय ठेवायला जागा उरणार नाही इतकी मंडळी जमेल. तुम्हीच सांगा मी काय करु?"
"आजकालच्या पोरींना काही कामधंदे उरले नाहीत. बसतात युट्यूब  फेसबुक खेळत." केवल काका फुलराणीला रागात म्हणाले.
"काका मी आताच फेसबुकवर नाव शोधलं. ही मुलगी खरंच बोलतेय."
तोच 2 मुली तिथे येऊन धडकल्या. एकीच्या हातात माईक आणि एकीच्या हातात कॅमेरा. "नमस्कार मी वनश्री मोठे कॅमेरा मॅन बिनीसोबत माधव सोसायटी, कोथरूड इथून रिपोर्टींग करतेय."
"तर मि. सेक्रेटरी मी असं ऐकलं कि आपण एका शुल्लक कारणासाठी मि. आणि मिसेस नगरकरला सोसायटी सोडायची नोटीस दिली म्हणून."
"आधी तुम्ही सांगा तुम्हाला इथे कोणी बोलावलं."
"सर आपण लाईव्ह आहात टीव्ही 10 वर."
"बाबा नीट बोला. खरंच लाईव्ह आहात तुम्ही."त्यांचा मुलगा त्यांना सांगू लागला.
"नाही म्हणजे यांनी सोसायटीची परवानगी न घेता एका मानसिक रुग्णाला घरी ठेवलं आहे. 3 दिवस आधी ती बाई माझ्या मोतीच्या मागे धावली होती. तेव्हापासून जेवण सोडलं त्यानं."
"पण हा व्हेटर्नरी डॉक्टरचा रिपोर्ट तर म्हणतोय कि त्याचं पोट फुगलं आणि पोटात इन्फेकशन झालं आहे म्हणून त्याला जेवण नाही जात आहे." हातातला रिपोर्ट सगळ्यांना दाखवत फुलराणी म्हणाली.
"आणखी काही त्रास दिला का आराधनानं तुम्हाला कधी?"वनश्रीचा प्रश्न.
"नाही पण प्रिकौशन घ्यायला हवं ना. म्हणून आम्ही नगरकर कुटुंबाला नोटीस दिली."
"मग आता काय विचार आहे?"
"हे बघा सेक्रेटरी साहेब चूक झाली आमची. आम्ही खरंच तुम्हाला विचारून नंतरच आराधनाला घरी आणायला हवं होतं. पण इतकं घाईत ठरलं सगळं कि वेळच मिळाला नाही.
आम्ही पूर्ण काळजी घेतोय कोणाला काही त्रास होऊ नये याची. फक्त थोडं समजून घ्या प्लीज." अतुल म्हणाला. त्याला समजलं होतं कि सेक्रेटरीला विचारलं नाही म्हणून त्याचा अहम दुखावला गेला. म्हणून अतुलनं वाद न घालता समजूतदारपणा दाखवला.
"ठीक आहे अतुल. या सोसायटीचा सेक्रेटरी आहे मी. म्हणून सर्व शहानिशा करणं जबाबदारी आहे माझी. चला मग भेटू नंतर. मला एका मिटिंगला जायचं आहे."
फुलराणीनं वनश्रीला मिठी मारली, "थँक्यू डियर!''
"वेलकम !"
"द्वाड आहे माझी पोर." पूर्वा.
"म्हणून तर आवडली मला." राधा म्हणाली.
"प्रत्येक समस्येवर उपाय आहे हिच्याकडे. पण अमनचं काही खरं नाही."अतुल हसला.

क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...