स्वीकार भाग 4 इथे वाचा
रवी अरुचं हे रूप पाहून भांबावला. त्यानं तिला थांबवायचा प्रयत्न केला, "आराधना शांत बस. घरी जायचं आहे. शांत हो."
"घर...." इतकंच बोलून ती खाली बसून जोर जोरात रडू लागली. तिचं कोणीतरी मेलं अशाप्रकारे आक्रोश करु लागली. रवीला काय करु समजत नव्हतं काय करावं? डॉक्टर लीलानं नर्सला एक इंजेकशन घेऊन यायला सांगितलं. 2 कंपाउंडरनं अरुला पकडलं आणि लीलानं तिला इंजेकशन दिलं. ती हळूहळू शांत झाली. कंपाउंडरनं तिला व्हीलचेयरवर बसवलं. एव्हाना राधा आणि पूर्वा आत आले.
"मी आताही सांगतेय अरुला हाताळणं कठीण आहे. पण तिच्या आईबाबांनी परवानगी दिली (राधानं अरुच्या आईबाबाला फोन करून अरुला घरी घेऊन जाण्याचा निर्णय सांगितला होता. त्यांचीही यायची इच्छा होती. पण अरुच्या बाबाची शुगर जास्त झाल्याने त्यांना काही दिवस तरी रेस्ट करायला सांगितलं होतं.) आणि डॉक्टर पूर्वा सोबत आहेत म्हणून मी तयार झाले. पण तरीही आमच्या पॉलिसीनुसार अरुला घरी नेल्यावर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही."
"तुम्ही त्याची अजिबात चिंता करु नका."
"पूर्वा चिंता वाटते कारण समाज मनोरुग्णांना accept करत नाही. अरु आणि या सर्व पेशंट माझ्या मुली आहेत. त्यांना कोणी हिणवलेलं पाहवणार नाही माझ्याकडून. इतकंच!"
"आम्ही लक्ष ठेऊ त्याबद्दल."रवीनं लीलाला आश्वासन दिलं.
"ते छान आहे. पण मला वाटतं रवीनं काही दिवस आराधनाच्या नजरेस न पडलेलं बरं. तिला त्रास होतो ते सर्व आठवून."
"तुम्ही जसं म्हणणार तसं."
"मी इतकंच म्हणतेय कि तिची मानसिक स्थिती थोडी दृढ होईपर्यंत तिला शॉक बसेल असं काहीच करू नका."
"ओके डॉक्टर."
"My best wishes are with you all."
डॉक्टर लीलाचं बोलणं लक्षात ठेऊन रवीनं त्याच्या पुण्यातच असलेल्या फ्लॅटवर राहायचं ठरवलं. हा फ्लॅट निधी आणि त्यानं लग्न केल्यावर विकत घेतला होता. निधीशी घटस्फोट घेतला तेव्हा रवीने फ्लॅटची अर्धी किंमत रोख तिला परत करून फ्लॅट स्वतःच्या नावाने करून घेतला. तो फ्लॅट तेव्हापासून बंदच पडलेला होता. तिथं एकांतात त्यानं त्याच्या भटकंतीवर लिहिलेलं पुस्तक परत लिहून प्रकाशनाला द्यायचं ठरवलं. आतापर्यंत एकटं राहून राहून त्याच्याजवळ भरपूर पैसे जमले होते. त्यात काही बिजनेस सुरु करून पुण्यातच राहायचं त्यानं ठरवलं.
.....................
अरुला घेऊन सर्व फ्लाईटनं पुण्याला, कोथरूड स्थित 'माधव' सोसायटीत असलेल्या राधाच्या (3BHK फ्लॅट) घरी आले. अरु औषधाच्या गुंगीत होती. राधानं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. "काकू थोडं कोमट पाणी घेऊन या."
"तुम्हीच घेऊन जा वा. मला भीती वाटते त्या पागल बाईची." वयाची पन्नाशी पार केलेल्या आणि राधाकडे मागील 2 वर्षापासून स्वयंपाकासोबतच इतर सगळी घरकामं करणाऱ्या उषा काकू म्हणाल्या.
"काकू पहिली गोष्ट अरुला पागल म्हणायचं नाही," रागाला आवरत राधा बोलली,"दुसरी ति तुम्हाला खाणार नाही. तेव्हा परत तिच्याबद्दल अपशब्द बोलायचं नाही."
"अहो पण बाजूच्या जांभळे मॅडम तर हेच म्हणत होत्या की तुम्ही एका पागल बाईला घरी घेऊन आल्या." ती भीत भीतच बोलली.
राधाला डॉक्टर लीलाचे शब्द आठवले. "तुम्ही फक्त इथल्या गोष्टी तिथं नका करु. सांगितलेलं काम करा." राधा तिच्यावर ओरडली. ती धावतच पाणी घेऊन आली. राधानं अरुचं स्पंजिंग केलं.
"चला जेवायला.उषा काकूंनी गरम गरम स्वयंपाक बनवला." अतुल (राधाचा नवरा) सर्वांना म्हणाला. डॉक्टर पूर्वा, फुलराणी, अतुल सर्व खालीच चटई टाकून जेवायला बसले. राधा अरुला घेऊन आली. एखाद्या निरागस लेकरासारखं तिनं गुपचूप वरण भात खाल्ला.
डॉक्टर पूर्वानं अरुसाठी एक छानसं वेळापत्रक बनवलं.
सकाळी 7 वाजता उठून कोमट पाणी पिऊन फ्रेश व्हायचं.
7:30 ला मॉर्निंग वॉकला जायचं.
8:00 ते 10:00 दरम्यान आंघोळ, नाश्ता, गप्पा.
10 ते 12 आवडतील ते कार्यक्रम टीव्ही वर पाहायचे किंवा काही गेम खेळायचं.
12 ते 1 लंच करायचा.
1 ते 3 झोप घ्यायची.
3 ते 4 चहा घ्यायचं, फ्रेश व्हायचं.
4 ते 6 आवडीचा छन्द जोपासावा, म्हणजे गाणं म्हणणं किंवा चित्र काढणं किंवा पेपर क्राफ्ट तयार करायचं.(जसं प्लेन, जहाज, पेपर बॅग, पेपर रॅबिट वगैरे बनवायचं )
6 ते 7 कॉऊंसिलिंग सेशन.
7 ते 8 तिला आवडेल ते करावं.
8 वाजता जेवण करून झोपणे.
"तु वेळापत्रक छान बनवलं. पण हे पाळल्या जाईल का?"
"ते तर अरुच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आणि पुर्ण वेळापत्रक जसच्या तसं पाळणं नाही झालं तरी काळजी नको करू. आपला हेतू तिच्या विस्कळीत आयुष्याला एक वळण देणं आहे. त्यासाठी अशा व्यवस्थित दिनचर्येची तिला सवय लावणं खूप आवश्यक आहे. बायपोलर आहे हे माहित असूनही खूप पेशंट छान कौटुंबिक आयुष्य जगतात ते अशा दिनचर्येनं आणि कुटुंबाच्या आधाराने."
"फुलराणी खरं बोलत होती तूझ्याबद्दल. आता मला खरंच खूप रिलॅक्स वाटतंय."
पूर्वाने बनवलेलं वेळापत्रक पाळतांना राधा, पूर्वा आणि फुलराणी तिघींची दमछाक होऊ लागली. त्यांची खरी परीक्षा आता सुरु झाली. कधी अरु सकाळी काही केल्या झोपेतून उठेचना तर कधी आंघोळ नाही करायची म्हणून जिद्द करे, कधी crafting चं सगळं सामान फेकून देई, कधी मॉर्निंग वॉकला गेलं कि कुत्र्यांच्या मागे धावत सुटे, कधी तिला जेवणच आवडेना, कधी कॉऊंसिलिंग सेशनमधेच ती झोपून जाइ, कधी सोसायटीतले आजूबाजूचे राधाला पकडून तिचं डोकं खात, सगळा सावळा गोंधळ सुरु होता.
राधाला, अरुला घरी नेऊन 10 च दिवस झाले होते. सोसायटी प्रेसिडेंट मि. प्रथम तिला आणि अतुलला भेटायला आले. 11 वाजले होते. अरु फुलराणीसोबत टीव्ही पाहत होती. पूर्वा पुण्याच्या एका मेंटल हेल्थ ऑर्गनाइझेशनला भेट द्यायला गेली होती. अतुल ऑफिसला गेलेला. राधाने दार उघडलं.
"नमस्कार!"
"नमस्कार, आज सकाळी सकाळी."
"11 वाजलेत राधाजी."
"अरे हो. या बसा आत मि पाणी आणते."
"असू देत. मि फक्त हे द्यायला आलो होतो आपल्याला."
"काय आहे?"
"सोसायटीच्या लोकांनी कम्प्लेंट केली आहे तुमची. तुम्ही एका वेड्या बाईला घरी आणलं आहे म्हणे."
"पण तिचा कोणालाच काही त्रास नाही."
"हो पण त्यांचं म्हणणं आहे कि मुलांवर विपरीत परिणाम होईल आणि ती मॉर्निंग वॉकला जातांना मिसेस नायकच्या मोतीच्या(डॉगीच्या) मागे धावली म्हने. तेव्हापासून तो काहीच खात नाहीये."
"तेव्हा तिला दुसरीकडे शिफ्ट करा नाहीतर तुम्ही ही सोसायटी सोडा. ते तर म्हणत होते 3 दिवसांचाच वेळ द्या. पण मि समजू शकतो तुमची व्यथा म्हणून 7 दिवसांचा वेळ देतोय. जातो आता."
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment