Tuesday, 5 May 2020

स्वीकार भाग 2


स्वीकार भाग 1 इथे वाचा

"पण आई तर म्हणते की बायपोलर डिसाॅर्डर जरी पुर्णपने बरा होत नसला तरी रूग्ण औषधीने आणि थेरपीजने एक नाॅर्मल लाईफ जगु शकतो." आराधनाला बायपोलर डिसाॅर्डर आहे हे ऐकल्यावर फुलराणीने राधाला सांगितलं.
"अग तुझ्या आईचं म्हणनं अगदी योग्य आहे. मिही खुप अभ्यास केला आहे बायपोलरचा. पण अरूच्या बाबतीत टेन्शन हे आहे की तिला बरं व्हायची ईच्छाच नाही." काहीतरी विचार करून,"चल बसु कुठेतरी. मी अरूची सर्व हिस्ट्री सांगते तुला."
ॲक्चुली अरुची मानसिक स्थिति बिघाडायचं कारण काही नविन नाही. तेच आपलं, प्रेम ! पण एकतर्फी. अरु तशी शिक्षणात खुप हुशार, सायंस तिचा आवडता विषय. पण स्वभावाने खुपच इन्ट्रोव्हर्ट! आईबाबांची लाडकी लेक आणि दादाची लहान परी. अरुला सहजा सहजी कोणाशी बोलणं, मैत्री करणं जमत नव्हतं. त्यामुळे तिच्या मोजक्याच मैत्रिणी होत्या. इतरांना तर अरु शिष्टच वाटायची. राधा अरुची बेस्ट फ्रेंड ! बारावीच पुर्ण वर्ष ती अभ्यास करायला अरुच्या घरीच होती. कारण तिच्या वन RK घरात अभ्यास होत नसे. रात्री ७-८ वाजता तिचा मोठा भाउ, रवि तिला घ्यायला यायचा. तो बारावीत गणितात टाॅपर होता तसेच इंजिनीअरिंग करतानाच बारावीच्या मुलांना कोचिंग पण द्यायचा. म्हणुन मग अरु आणि राधाला जी गणितं आली नाहीत ती तो समजावून सांगायचा. तो असला ना आजुबाजुला की अरुला खुप छान वाटायचं. छान मैत्री झाली होती त्यांच्यात. पण हे सर्व म्हणजे प्रेम, हे कळायला अरुला खूप वेळ लागला. अरु Environmental science मधे गुवाहाटीला MSc करत होती तेव्हाच रविने त्याच्यासोबत काम करणार्या एका मुलीसोबत प्रेमविवाह केला.
MSc झाल्यावर अरुला नोकरी आणि लग्न दोन्हीच्या छान आॅफर आल्या. आईबाबांनी अरुचे निर्णय अरुवर सोडले होते. अरुने खूप प्रयत्न केला रविचा विचार मनातून काढायचा. पण मानसिक बेचैनी तिला पुढे जाऊ देत नव्हती. आपण काही गडबड करु म्हणून राधाच्या लग्नातही गेली नाही अरु. रविशी निगडीत सर्व गोष्टींना दूर करायचं होतं तिला. म्हणून लग्नही करायचं ठरवलं. पत्रीका वाटून झाल्या. आणि एका दुपारी रविचा फोन आला,"सांगा मॅडम काय गिफ्ट देउ तुम्हाला लग्नात?"
"ए काय करतेय तु ? मि येते आज. भांडायचं आहे मला तुझ्याशी." राधानं रवीच्या हातचा फोन घेऊन अरुला सांगितलं. घरी येणार म्हणाली. अरुला तिच्यासोबत खोटं बोलणं अवघड. छात्यावर कोणितरी प्रहार करतं, इतकी धडधड वाढली. डोकं गरगर फिरत होतं. आता आपला जगून उपयोग नाही. सर्वांना ताण देउ आपण. सारखा हा विचार डोक्यात घोळत होता. नैराश्याची परिसीमा गाठली होती अरुने सर्वांच्या नकळत. आणि कधी तिनं स्टुल पायाखाली घेउन गळफास घेतला तिला कळलंच नाही. पण नशिब ! दादा काहीतरी बोलायला तिच्या रूम मधे आला आणि वाचली ती. नंतर एकदा अरुने नस कापली, गोळ्या घेतल्या.... तिच्या डोक्यात एकच यायचे ते म्हणजे आपण सर्वांना त्रास देतोय म्हणून आत्महत्याच करणं योग्य !
अरुला सायकीअॅट्रीस्ट कडे नेण्यात आलं. फॅमिली हिस्ट्री बघितली तेव्हा लक्षात आलं कि अरुच्या बाबाच्या आईला राहून राहून असा त्रास व्हायचा. कधी ती सगळ्यांसोबत खूप छान वागायची तर कधी गलिच्छ शिवीगाळ करायची. म्हणजे अरुच्या आजीला मूड डिसॉर्डर होता. मरेपर्यंत तिला औषधी द्या असं अरु बोलायची पण जुनी म्हातारी लोकं अशीच असतात असं घरातल्या सगळ्यांचं म्हणणं होतं. तसेंच अरुच्या आवडत्या आत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच अरु खूप अंतर्मुख झाली होती.
हे सर्व लक्षात घेऊन सायकियाट्रिस्टने ही अरुची नैराश्याची सुरवात असल्याचे सांगितलं. तसेंच अरुला आनंद वाटेल अशा गोष्टीच घरात होतील यावर भर द्यायलाही सांगितलं. औषधी दिली. पण अरु कशाला प्रतिसाद देत नव्हती. गोळ्या तर अजिबात गिळत नव्हती. कारण तिला बरं व्हायचंच नव्हतं. नैराश्य वाढतच गेलं आणि ती बायपोलरची रूग्ण झाली. कधी रडायची तर रडतच बसायची आणि हसायला लागली की जबडा दुखला तरी हसतच राहायची. आईबाबांना तिचं हे रूप पाहावत नव्हतं. सायकीॲट्रीस्टच्या सल्ल्याने तिला असायलममधे भर्ती करण्यात आलं. शेजारी, नातेवाईक , मित्रमंडळ सर्वांच्या प्रश्नांना आईबाबा कंटाळले होते. बाबांना माइनर अटॅक आला आणि दादा त्यांना नेहमीसाठी लंडनला सोबत घेउन गेला. ते सहा महिने, वर्षातून एकदा अरुला भेटायला नागपूर मानसिक रूग्णालयात यायचे. वयोमानाने ते कमी झाले. उरली फक्त राधा. ति दर महिन्याला मला भेटायला पुण्यावरून नागपूरला यायची.
''मला वाटतं आई नक्कीच आपली काही मदत करेल. आता खूप नव नवीन शोध लागलेत मानसशास्त्रात. अरू नक्कीच ठीक होतील बघा." फुलराणीच्या बोलन्यात आत्मविश्वास झळकत होता. तिनं डाॅ. पुर्वा , तिच्या आईला फोन करून अरुबद्दल सांगितलं. सवड मिळताच त्या अरुला भेटायला शासकीय मेंटल हाॅस्पिलमधे नागपुरला आल्या. अरुबद्दल निवासी डॉक्टर सोबत चर्चा केल्यावर त्यांना जाणवले की अजून होप आहे. तसेच तिला बायपोलर हा मूड डिसॉर्डर होण्यामागे आनुवांशिक (अरुच्या आजीला मूड स्विंग्सचा त्रास होता.) तसेच आणखी काहीतरी कारण आहे. म्हणजे एखादा मानसिक धक्का, एखादी गोष्ट जी खूप दिवसांपासून तिच्या मनात रुजली आणि त्याची उत्पत्ति या डिसोर्डर मधे झाली. काय असू शकते ती गोष्ट ? हे जाणून घेण्यासाठी डॉ पूर्वाने राधा सोबत एकांतात मीटिंग फिक्स केली.
''काय ग राधा, आराधना इतकी हुशार, दिसायला पण छान. तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे नव्हता ? आश्चर्य ?''
''नाही तशी मुलांची भरपूर प्रपोज़ल यायची तिला. पण तिला हवा तसा कोनि भेटतच नाही म्हणे ती ?''
''म्हणजे ?''
''म्हणजे सालस, दिसायला नसला तरी मनाने सुंदर, थोडासा हळवा, तिची बाजुही ऐकून घेईल आणि तीचं अस्तित्व जपेल असा कोणी.''
''तुला काय वाटतं, असा कोणी मीळालाच नसेल का तिला?'' राधा थोड़ी गोंधळली कारण कोणी मीळाला असता तर अरुने  राधाला नक्कीच सांगितलं असत.,''काय आहे ना राधा, आराधनाच्या हिस्ट्रीमधे असा एकही पॉइंट नाही की ज्यामूळे तिच्या मनावर आघात झाला असेल. एका समृद्ध घरातली, आइवड़ीलांची लाड़की, एक हुशार, गुणवान मुलगी, दुखाचा काही लवलेश नाही. आजीची तेवढी मूड स्विंग्जची हिस्ट्री सोडली तर दूसरे काहीच नाही. आणि जो बिहेव तिने केला, म्हणजे औषधि न घेणे, काउंसिलरला कोऑपरेट न करणे, यावरून दिसून येते की तिला मुळी इच्छाच नव्हती बरे व्हायची." डोकं खाजवत, "आपण काहीतरी मिस करतोय राधा." दोघीही बराच वेळ शांत होत्या.
"राधा आराधना अशी वागायला लागली त्या वर्षी कायकाय घडले होते ? सांगु शकतेस का आठवून ?"
"हो सगळं सगळं आठवतं मला. त्या वर्षी अरूचं MSc पुर्ण होउन छान जाॅब लागला होता आणि काका काकुंचा जावईशोध सुरू होता."
"आणखी काही."
"आणखी????? माझ्या दादाचं लग्न जुळलं होतं त्याच्या प्रेयसी सोबत त्यामुळे थोडी व्यस्त होती मि स्वतामधे."
"तुझा दादा!! त्याच्या सोबत कसं नातं होतं आराधनाचं?"
"कसं म्हणजे? जसं माझं होतं अरूसोबत तसंच मैत्रीचं नातं."
"नक्की ?" प्रश्नांकीत नजरेने त्यांनी राधाला विचारलं. राधाला ते अजिबात रूचलं नाही. तिने प्रतिप्रश्न केला,''नक्की म्हणजे ? काय म्हणायचे आहे तुम्हाला ?''
"मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आराधनाला तुझा दादा तर आवडत नव्हता ना? मैत्रीचं रूपांतर खूप वेळा एकतर्फी प्रेमातही होतं." डाॅ. पुर्वाची शंका ऐकुन राधाला ती, अरु आणि रवि सोबत असतांनाचे क्षण आठवले. रवि दिसताच अरुचं ते स्वताला सावरणं, सांभाळून बोलनं, हलकं हलकं स्मित करणं. तो राधाला घ्यायला यायची वेळ होताच घर टापटीप करणं, वेणीफणी करून अभ्यासाला बसनं, तो लवकर जाउ नये म्हणुन एकच गणित परत परत विचारनं. आणि आता अरुला ठेवलेल्या रूमच्या भिंतीवर फक्त R R R लिहिणं.
"ओह गाॅड! तर ती भिंतीवर रवीचा R लिहीते आणि मला वाटलं होतं कि माझी आठवण येते म्हणून राधाचा R लिहिते." राधाने डोक्यावर हात मारला,"मला तिच्या भावना कधी कळल्याच नाही. कारण तिला जसा मुलगा हवा होता तसाच तर होता दादा !" डाॅ. पुर्वाचा हात हातात घेउन,"एकदा माझा हात पकडून म्हणाली होती,'मला तुझं घर, आईबाबा खुप आवडतात. येउ का इथेच राहायला ?' आणि मी म्हटलं होतं नको ग बाई, माझ्या दादाचं घर आहे हे अन त्याला तु अजिबात आवडत नाही." कसं वाटलं असेल तिला ?" राधा मटकन खाली बसली.
"तु ठीक आहेस ना ? उठ पाणी पी!" राधाला सोफ्यावर बसवुन पाणी प्यायला दिले."ताण वाटत असेल तर आपण उद्या बोलु बाकीचं.
"मि ओके आहे. आता जोपर्यंत अरू ठिक होत नाही मला चैन पडणार नाही."
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...