Saturday, 25 April 2020

शहरची सून (भाग 1आणि 2)


सुधाच्या एकुलत्या एक मुलाचं, आनंदचं लग्न जुळलं. सुधाला गगन ठेंगणं पडल्यासारखं झालं. कारण येणारी सून दिसायला सुंदर,  मोठया घरची होतीच पण चांगली शिकली सवरली अन नोकरदार होती. नातेवाईकांत कोणाचीच अशी सून नव्हती. आनंदचा हट्टच होता, "लग्न करेल तर शिकलेल्या आणि नोकरदार मुलीशी. दिवसभर रिकामटेकडी राहणारी अन मी रात्री घरी परतल्यावर माझं डोकं खाणारी मुलगी मला नको." मीरालाही आनंद सारखा शहरात राहणारा मुलगा हवा होता. त्यांच्या समाजात शिकलेली मुलं कमी असल्यामुळे आनंदकडे पाहून बिन मायच्या मीराचा हात आनंदच्या हातात सोपवून मोकळं व्हायचं मीराच्या बाबांनी ठरवलं. आनंदच्या बाबांनी मीराला आपली मुलगी म्हणूनच वागवू असं आश्वासन दिलं. लग्न पक्क झालं. गावात गुड वाटण्यात आला. तशी आया बायांनी सुधाच्या अंगणात ओट्यावर गर्दी केली.
सुधा मोठया तोऱ्यात होणाऱ्या सुनेचा, मीराचा फोटो सर्व बायकांना दाखवत होती, "हाय ना एकच नंबर !"
"व्हय व्हय लय मस्त हाय." शेजारच्या सखूनं हमी दिली.
"चेहरा बी लय सालस हाय बग." माहेरी आलेली लता फोटो पाहून बोलली.
"म्या ऐकलं लई कमावते वं?" शांतीचा प्रश्न.
"हो." डोक्यावरचा पदर नीट करत सुधा गर्वानं उत्तरली, "मा पोरापरीस 5-6 हजार जास्त."
"मा तुई तं लॉटरिच लागली."
"आवं आपल्याला काय लोभ नाई कशाचा. पण पोरगं सुखात नांदन." सुधा मनोमन सुखावली, "चला द्या वं फोटो इकडे. दिट लावाल पोरीले." सुधा फोटो ठेऊन द्यायला घरात निघाली तो आतापर्यंत पान चघळत असलेली तिची देरानी उमा पचकन नालीत थुकली अन बोलली,
"शहरची सून येणार हाय हे नका विसरू जाऊबाई." सुधाचा पाय दारातच थबकला.
"हाव माय या शहरच्या पोरीं लय चालाक असत्यात बरं." सखूनं उमाच्या बोलण्याला दुजोरा दिला.
"मंग काय माया वन्सचं काय खेळणं केलं तिच्या शहरच्या सुनेनं माहित हाय ना." शांतीनं अजून फाटा फोडला.
"काय वं काय झालं तुया वन्स ले? मले बी सांग." उत्सहात लतानं विचारलं.
"अवं सगळ्या घरावर ताबा केला वन्सच्या शहरच्या सुनेनं. मा वन्सचं कोणी शब्द बी आयकत नाई." शांती सांगू लागली.
सुधाचा पारा चढला,"काही काम धाम हाय कि नाई तुमा पोरीले. चला जा व्हा आपापल्या घरी."
सगळ्या गप गुमान एकमेकींना इशारे करत तिथून उठल्या.
"पान खाता का?" उमानं पान पुढे करत सुधाला विचारलं.
सुधा काहीच न बोलता चरफडत घरात निघून गेली. उमाचं काम झालं. तिला जी आग लावायची होती ती तिनं लावली. आता वाट होती ती तिनं लावलेल्या आगीत कोणकोण कसं जळतं हे दिसायची.
सुधाच्या आनंदात विरजण पडलं. आतापर्यंत दिमाखात मिरवलेला मीराचा फोटो तिनं कपाटात फेकून दिला. तिच्या मनाची घालमेल सुरु झाली. एकुलता एक पोरगा. तो जर बायकोत अडकला तर आपल्याला कोण पाहणार? पोरगी नाही कि जिच्या घरी जाऊन राहू. अन नवरा ज्याला आपलं कधी काही पटलंच नाही तो तर सुनेचंच ऐकेल. पण आता करणार काय? लग्न तर 20-22 दिवसांनीच करायचं म्हणताहेत. शहरची सून आणून पायावर धोंडा मारतोय आपण आपल्या. ती चिंतातुर होऊन बसली नको ते विचार करत.
"सुधा वं ! आज पोराचं लगीन जुळलं तं उपाशीच ठेवणार का? रांधा बाई काई. भूक लागली मले." सुधाची सासू ओरडू लागली. 80 च्या घरात वय, जर्रर्र कांती अन एका हातानं अधू झालेल्या सासूची जबाबदारी सुधाने घेतली होती. म्हणून सासूनं सुधाच्या नावावर तिची 5 एकर जमीन करून दिली. त्याचाच रोष होता उमाच्या मनात. म्हणून कि काय सुधाला मनस्ताप देण्यासाठी ती सतत प्रयत्नशील असे.
"सुधा आवं आई आवाज देऊन रायली तवाची." सुधाचा नवरा तिला हलवून म्हणाला, "सून येईन म्हणून आराम घ्यायची सवय करु नको. ति इथं नाई राहणार हाय आपल्याला आयतं खाऊ घालायला. पाहुण्यासारखी राहीन अन जाईन. उलट तुलेच तिले रांधून खाऊ घाला लागन बग."
सुधा नवऱ्याचं बोलणं ऐकून अवाक झाली. सून आली कि सासूनं आरामात खायचं असतं. असं म्हणणारा अन लग्न झालं तेव्हापासून मायला एकाही कामाला हात न लावू देणारा नवरा तर आताच उलटं बोलायला लागला. अजून तं त्या शहरच्या बयेनं उंबरठा पण ओलांडला नाई.
(हे असं होतं जेव्हा आपण कोणाचं नको ते बोलणं मनावर घेतो. मंथराचं बोलणं मनावर घेऊन कैकयीनं एकाप्रकारे स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेतला होता. इकडे नवरा मेला अन तिकडे पोराचा रोष सहन करावा लागला. इतकं रामायणात दाखवूनही आपल्या हे लक्षातच येत नाही, "कुछ तो लोग कहेंगे, लोगोका काम है केहना!")

आनंदला हळद लागली. त्याचे मित्र त्याला मीराच्या नावाने चिडवू लागले. तोही लाजेनं लाल होऊ लागला. त्याच्या मनातही लड्डू फुटू लागले. सुधाला मात्र हे सर्व पाहून खुप राग आला.
"बस!" ती जोरात ओरडली. सर्व आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागले.  तशी ती भानावर आले. नरमुन म्हणाली, "आरं पोरांनो झोपा तुम्ही अन त्याला बी झोपु द्या. आराम करु द्या माया लेकराला."
"हो रे बाबा उद्या पासून याची नवीन ड्युटी सुरु होणार ना." शरद डोळा मारून म्हणाला. तसा सुधाने एक तीक्ष्ण कटाक्ष त्याच्यावर टाकला. बिचारा उठून सर्व पोरांना झोपायला घेऊन गेला. इतर पाहुणे मंडळीही जागा मिळेल तिथं पेंगली. बाबा गच्चीवर बसून परत एकदा लग्नाच्या सर्व तयारीचा आढावा घेत होते. उरले फक्त आनंद आणि सुधा !
"आई बस इथं माझ्याजवळ."
"नाई बाळ झोप तु. मी आजीले पाऊन येते."
"आई," सुधाचा हात हातात पकडून म्हणाला, "मला समजतेय गं. काहीतरी बिनसलंय तुझं. सांग पाहू काय झालं ते!"
"आरं असंच मनात येतं कि तुया बाबानं माय काई आईकलं नाई कवा. पण तु झाला अन मले आधार मिळाला. मा काई शब्द कईचं पडू नाय देला तुनं. म्हणून काळीज धडधड करतंय कि आता बायको आल्यावर तु तिचंच आईकणार. मी परत एकटी पडून जाईन." सुधाचे डोळे ओलावले.
"बस इतकंच !" तो हळहळला. सुधाचे दोन्ही हात हातात घेऊन तिला म्हणाला, "मी वचन देतो तुला. माझ्या आयुष्यात पहिला मान सदैव तुझाच राहीन." हे ऐकून सुधाच्या अशांत मनाला थोडी शांतता मिळाली.
आनंद आणि मीराचं लग्न मोठया थाटात पार पडलं. आनंदला नोकरीवर लवकर रुजू व्हायचं होतं म्हणून सत्यनारायणही लवकर करण्यात आला.
ती आनंद आणि मीराची पहिली रात्र होती. आनंदची खोली फुलांनी सजवली गेली. मीराला छान तयार करून खोलीत बसवून ठेवले. मग आनंद आला. दोघांची नजरा नजर झाली. आनंद मीराला असं पाहण्यासाठी आतुर झाला होता.
"अजून किती वेळ असा पाहतच उभा राहणार दरवाजात?" मीराने खट्याळ हसून त्याला विचारलं.
"आयुष्यभर!"
"ओके! मग झोपते मी." ती पलंगावर आडवी होत बोलली.
"काय?" तो तिच्याजवळ आला, "हे असं चालणार नाही."
"मग काय चालणार?"
त्यानं अलगद त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. मीराला तो आलिंगणात घेणार तोच खोलीचं दार वाजलं.
"दादा जरा बाहेर ये." आनंदची मामेबहीणने त्याला आवाज  दिला. त्याला वाटलं मुद्दाम त्रास देतेय.
"ए झोप गं. उद्या देतो तुला काय हवं ते." आनंद मोहक नजरेनं मीराला पाहत बोलला.
"अरे आत्या बोलवत आहे. तिला धडधड होतंय." आईची तब्येत ठीक नाही हे ऐकताच तो पलंगावरून उठला. कपडे सावरून दार उघडलं आणि सरळ सुधाजवळ गेला. मागोमाग मीराही गेली. सुधा एक हात डोक्याला, दुसरा हात छात्याला लावून भिंतीला टेकून बसलेली होती.
"आई तु ठीक आहेस ना? बाम देऊ का चोळून? " आनंद नं काळजीनं विचारलं.
"आरं तु काऊन आलास? त्या पोरीले का वाटन?"
"काही नाही वाटणार मला." आनंदकडे पाहून मीरा बोलली, "मी डोकं दाबून देते. छान वाटेल तुम्हाला." मीरा अन आनंदची गोड नजरानजर सुरूच होती.
"मले मा पोरगा पुरे आहे." सुधा तोडून बोलली. मीराला तिचं असं बोलणं खटकलं. पण ती काही बोलायच्या आधीच आनंदनं गोष्ट सावरून घेतली.
"अगं आईच्या म्हणण्याचा अर्थ आहे कि तु नाजूक तब्येतीची. थकली असशील. जाऊन झोप. आईला झोपवून येतो मी." नवऱ्याचं असं लाघवी बोलणं ऐकून मीरा आपल्या खोलीत जाऊन लोटली. पण त्या फुलांनी सजवलेल्या बेडवर तिला (एकटीला ) काही झोप येईना. ती चातकासारखी बेचैन झाली. पण करणार काय? त्यात नवीन जागा. कशीतरी थोडावेळ मोबाईलवर टाईमपास केल्यावर तिला आपोआप झोप लागली. पण लाईट गेल्यानं लवकरच तिला जाग आली. आनंद झोपला का पाहायला खोली बाहेर पडली. सुधाच्या खोलीचं दार लावलेलं होतं. असं रात्री दार वाजवून झोप खराब करणं तिला ठीक वाटलं नाही. ति तिच्या खोलीकडे परत निघाली.
"आवं सुधा वं. संडास झाली वं. धून दे." मीराची आजोळ सासू सुधाला आवाज देत होती. मीरा आवाजाच्या दिशेने गेली. आजोळ सासू संडासात बसून होती. एक हात अधू असल्यानं तिला काही शी धुता येईना. म्हणून ति सुधाच्या नावानं ओरडत होती.
"कोण हाय वं." मीराच्या पावलांचा आवज ऐकून आजीनं विचारलं.
"आजी मी मीरा, आनंदची बायको." साडीचा पदर कमरेला खोचून, दोन्ही पायात मिऱ्या दाबून मीरा बोलली, "मी देते शी धुवून."
मीराने आजीची शी धुतली. हातपाय धुवून दिले. त्यांना बेडवर झोपवलं. मग संडासात चांगलं पाणी टाकलं. स्वतः हातपाय धुतले अन खोलीत जाऊन झोपली.
सकाळी सातच्या सुमारास दारावर थाप पडली. मीरा गडबडीत उठली. "सॉरी आनंद ते पहाटे पहाटेच डोळा लागला माझा. रात्रभर झोपच नाही आली बघ."
"का बरं?"
"तूझ्याशिवाय एकटं वाटत होतं."
"खरंच."
आनंदनी तिला आलिंगणात घेऊन विचारलं.
"इश्श आनंद!"
"आनंद!" आनंदच्या बाबानी त्यांना बोलावलं.
"तु ये तयार होऊन. मी जातो." मीराला सांगून तो बाबाकडे गेला "हो आलो बाबा !"
आजी बाबाजवळच बसून होती. डोळे घळघळ वाहत होते. "आजीची तब्येत नाही का बरोबर."
"आरं नाई. म्हातारी खुश हाय. मले आताच सांगितलं तिनं राती काय झालं ते समदं."
"काय?" आनंदनं गोंधळून विचारलं.
"काय म्हणजे? मीरानं सांगितलं नाई तुले."
"ते रात्री आईला बरं नव्हतं वाटत म्हणून मी आईजवळ आलो होतो झोपायला."
"काय? लगीन झाल्यावर पयली रात आन तु आईकडं येऊन झोपला !" बाबाचं डोकं सरकलं, "आरं काई अक्कल हाय कि नाई तुले आन तुया मायले. तब्येत ठीक नोती तं मले बुलावाचं होतं ना. ति पोर रातभर जागी आसन. तरी तिनं आजीची सेवा केली."
"बाबा रागावू नका. मी फक्त नडलेल्या आजीची मदत केली." मीरानं गोष्ट सावरण्याचा प्रयत्न केला.
पण आनंदच्या बाबानं सुधाला सूने (मीरा) समोर चांगलं झापलं. आजोळ सासूची सेवा केली म्हणून खुप प्रशंसा झाली मीराची. छटाकभर गाव. त्यात कोणतीच गोष्ट पचेना. "पहिल्या रात्री सुधानं पोराला नव्या नवरीसोबत झोपु नाही दिलं अन तरी त्या शहरच्या सुनेनं आजोळ सासूची शी धुवून दिली अर्ध्या रात्री." हे गावभर झालं.  पुढे मीरा आणि आनंद असेपर्यंत हेच चाललं गावात. ज्यानं सुधाचं डोकं आणखी खराब झालं. 
क्रमश:
सुधाचा हा जळफळाट तिला कुठे घेऊन जाईल? अन मीराचा चांगुलपणा केव्हापर्यंत टिकेल? आनंदला सुधामुळे आणखी काय बघावं लागेल? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी नक्कीच वाचा पुढील भाग 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...