Saturday 25 April 2020

शहरची सून (भाग 3 आणि 4)

आनंद आणि मीरा पुण्याला राहायला गेल्यावरही सुधाची त्यांच्या नवीन संसारात लुडबुड सुरूच होती. ती रोज रात्री आनंदला फोन करी अन अर्धा एक तास बोलत बसे. एकच गोष्ट 10 वेळा सांगे आणि एकच गोष्ट 10 वेळा विचारे. बिचारा आनंद दिवसभर ऑफिसवर्कमुळे थकून जाई. 7-8 च्या सुमारास घरी येई. प्रेमाचे दोन शब्द मीरासोबत बोलणार तो सुधाचा फोन येई. अन हा तिला वाईट वाटेल म्हणून बोलतच बसे. मीरा जेवणासाठी वाट पाहत राही. परिणामी त्यांच्यात नीट संवाद होत नसे. त्याला मीराला वेळ नाही देऊ शकत याची जाणीव होती. मानसिक थकव्यामुळे आनंद मीराला हवं तसं सुखही देऊ शकत नव्हता. त्याला खुप गिल्टी फील व्हायचं. एकदा तो मीराला मनालाही,
"माफ कर. तुला नीट वेळ नाही देऊ शकत आहे. एकटाच होतो ना आधी. रोज घरी आलो कि आईला फोन करून गप्पा मारायचो. आता तिला सवय झाली आहे.पण फक्त काही दिवस दे. आईची फोनवर बोलायची सवय कमी होईलच हळू हळू."
मीराने हसून मान हलवून त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पण 15 दिवस झाले, एक महिना झाला. मीरा कंटाळली. एक तर शुभ मुहूर्त नाही अशी सबब सांगून सुधाने आनंदला हनिमूनला जाऊ नाही दिलं आणि आता हे असं रोज रात्रीचं बोलत बसणं. शेवटी मीरानं आनंदला, सुधालाच  पुण्याला घेऊन यायची कल्पना दिली. मीराला वाटलं सुधा सोबत राहायला आली म्हणजे आनंद खुश होईल. सुधा सोबतच राहील तर रात्रीचं फोनवर बोलणं बंद होईल. मीरा आणि आनंदच्या नात्याला फुलायला वेळ मिळेल.
सुधा पुण्याला आली. मीरा आणि आनंद ऑफिस मधून आले कि दोन दिवस तिनं स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून दोघांना खाऊ घातला. आनंद सुधाचं गुणगान करता करता न थके. जेवण झालं कि थोडं बोलून चालून दोघंही आपल्या खोलीत झोपायला जात. दोन रात्री छान गेल्या. तिसऱ्या रात्री मात्र आनंद आणि मीरा झोपायला गेले. 15 मिनिट होत नाही तो दारावर थाप पडली.
"मला झोपच नाही येत आहे आनंद. खुप बेचैन वाटतेय." सुधा अगदी घाबरा घुबरा चेहरा करून म्हणाली. आनंद मीराला लगेच येतो असं सांगून सुधासोबत तिच्या खोलीत गेला. तिचे पाय दाबून दिले, डोकं दाबून दिलं. तिच्याशी बोलता बोलता त्याला तिथंच झोप लागली. मीराने येऊन बघितलं. 4-5 दिवस असंच चाललं. मीराला काही कळत नव्हतं कि सुधा अशी का वागतेय? तिला खूप फ्रस्ट्रेशन येऊ लागलं. पण तरीही तिनं गोडी गुलाबीनेच काटा काढायचं ठरवलं. एका संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मीरा सुधाला म्हणाली,
"आई, बाबा एकटे असतील तिथं. तुम्हालाही आठवण येत असेल ना त्यांची. आम्ही बघू आमचं. तुम्ही निश्चिन्त होऊन जा गावाला."
"काहीही नकोस बरळू मीरा. आई इथंच राहणार आपल्यासोबत जेव्हापर्यंत तिची इच्छा आहे राहायची."
"आरं आनंद नकु बोलू तिले काई. म्या गावंढळ बाय. तिले नाई पटून रायलं मा रायनं त जातो बा म्या. तसं बी लगीन झालं कि पोरगा बायकुचाच हुतो. मायचा नाई रायत हे भुलली व्हती म्या."सुधा शेम्बुड वळू वळू रडत बोलली, "नवरा हाय मले अजून. रायीन होईन तसं त्याले घेऊन. पण बा म्या मेली गेली तुया आठवणींत त डाग द्याले येजो. नाईतं तडपींन रं मा आतमा."
"तुम्ही का असं वागत आहे. पोराला पदराशी बांधूनच ठेवायचं होतं त लग्न का केलं त्याचं? ठेवायचं होतं तसंच." मीरा संतापून बोलू लागली.
"मीरा बस. आई रडत आहे. दिसत नाही तुला? गप्प राहा." आनंद तिला थांबवण्याचा प्रयत्न करु लागला.
पण मीरा शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हती. तिचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर पडू लागलं, "लग्नाच्या पहिल्या रात्रीच तेच, आताही तेच. असं काय पाप केलं मी कि आपल्या दोघांना यांना वैवाहिक सुख घेऊ द्या वाटत नाही. आनंद नक्की तुमचाच मुलगा आहे ना.. .. " ति बोलली तशी सटकन तिच्या कानाखाली आनंदनं ठेऊन दिली. आता सुधाच्या काळजात आनंदाची लहर आली. पण ओठाशी आलेलं हसू तिनं तोंडावर हात ठेऊन लपवलं.
बिचाऱ्या मीराला विश्वास नव्हता होत कि तिच्यासोबत नक्की काय होतंय. तिनं काय विचार केला होता आणि लग्न झाल्यावर झालं काय? ती रडतच बेडरूम मधे गेली. दार आत मधून लावून घेतलं.
आनंदला त्याची चूक कळून आली. काहीही झालं तरी त्यानं मीरावर हात उचलायला नको होतं. तो मीराची समजूत काढायला जाणार तो सुधानं त्याचा हात पकडला,
"माया जीव लय धडधड करतुया. काय काय बरळली ही पोर? काई जाऊ नको तिच्याकडं. रडीन पडीन येईन धाऱ्यावर सकाळी बग."
रात्रभर आनंदचा जीव लागला नाई. त्यालाही समजत नव्हतं कि आपली इतकी मायाळू आई अशी का वागतेय?
सकाळी मीरा बॅग घेऊनच बेडरूम मधून बाहेर निघाली. चेहरा रडून रडून सुजला होता. डोळे लाल झाले होते.
"मीरा माझं ऐकून तर घे. मला नाही समजलं काय करावं ते. आणि मी तुला.... "
"पण मला समजून आलं आहे कि मी काय करावं."
"मला माफ कर."
"आरं तु काऊन माफी मागतोय. नवरा मारतच असतो बायकोला. तुया बा नं बी लई वेळा मारलं हाय मले."
"कारण मले ज्ञान नव्हतं. अडाणी होतो मी. लहानपणापासून माणसाइले बायकांना मारतांनाच पायलं म्या. पण जवापासून आनंद मोठा झाला कधी हात उचलला मी तुयावर. सांग मले." नवऱ्याला असं समोर पाहून सुधा चकित झाली. सुधा आनंदला बोलत होती तेव्हा दार वाजलं. मीराला माहित होतं कोण असणार ते म्हणून तिनं जाऊन दार उघडलं होतं.
"पण आता खरंच तुले चांगलं सुताचं मन होऊन रायलं मा." नवऱ्याचा संताप पाहून सुधा घाबरली. "आवं!"
"काय आवं? मीरानं सगळं सांगितलं राती फोन करून मले.सांग तु अशी काऊन वागली मीरासोबत. लगीन ठरलं तवा तं मोठी खुस होती तु. मंग हे असं अचानक काय झालं सांग. मा संताप वाढवू नको."
(मीरा तिच्या बाबालाच सांगणार होती. पण त्यांना तिला आपला निर्णय चुकला हा पश्चाताप होऊ द्यायचा नव्हता. म्हणून तिनं सासऱ्याला फोन केला. सासऱ्यात तिला तिच्या बाबाचीच झलक दिसत होती.)
"मले...." सुधाचा चेहरा पार रडावला, " मले वाटलं ती आपल्या गोडगोड वागण्या बोलण्यानं आनंद अन तुमाले मुठीत करिन अन मले एकटं पाडीन." मग तिनं गावात आनंदचं लग्न जुळलं म्हणून गुड वाटला होता त्या दिवशी उमा आणि इतर बायकांनी शहरच्या पोरीबद्दल बोललेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
"वा!" सासऱ्यानं कपाळावर हात मारला, "म्हणजे ती मंथरा काहीही बोलली अन तुनं कैकयीसारखं तिचं ऐकून त्यावर अंमल केलं."
"सासूबाई काही दिवस बघायचं तरी कि ही शहरची सून खरंच तशीच आहे का?"मीरा परत रडू लागली.
"मला माफ कर मीरा." आनंद मीराला कळवळून म्हणाला.
"काही गरज नाही मीरा." सासरा मीराला म्हणाला. मग आनंदचा कान धरून म्हणाला, "काय रे तुले तुई अक्कल नाई. शिकून सवरून वाया गेला."
"मी खूप टेंशनमध्ये आलो होतो बाबा."
"मंग जवा तुई माय हे सगळं करत होती तवाच तुनं मले सांगायचं होतं ना. इतकं महाभारत झालं नसतं."
"मी माफी मागतोय ना बाबा."
"त्यानं काहीच होणार नाही."
"मग सांगा तुम्हीच काय करु?"
"मीरा काय करायचं बाळ?"
"काहीच नाही बाबा. मला फक्त शांती हवी आहे. मी जाते बाबाकडे."
"ठीक आहे. मी तुला बाबाकडे घेऊन जातो. मग गावाला जातो. या दोघांना राहू दे इथंच."
"आवं म्या पापीण हाय. पाय पकडते तुमचे." सुधानं नवऱ्याचे पाय पकडले."म्हणाल तं मीराचे बी पाय पकडते."
"तसलं काहीच करु नका. गावाकडं यायचं असलं तर सांगा फोन करून. येईन म्या घ्याले."
"आनंदचं कसं?"
"तो पाहून घेईन त्याचं. आता लुडबुड बंद करायची त्याच्या संसारात."सासरा बोलला. सुधानं होकारार्थी मान हलवली.
आता आनंद आणि मीराचं काय झालं? तेच जे व्हायचं होतं. आनंदने तिची समजूत घालायचा खुप प्रयत्न केला पण आत्मसन्मानावर झालेला आघात इतक्यानेच मुळीच भरून निघणार नव्हता. आनंदला त्याची चूक कळावी म्हणून मीराने नोकरीसाठी अमेरिकेत जायचं ठरवलं. कारण खूपदा दूर गेल्यावरच व्यक्तीचं आयुष्यातलं महत्व कळतं. जरी आनंदची आई सुधा त्याला मीरापासून दूर ठेवत होती. त्याला स्वतःला योग्य आणि अयोग्य मधला फरक करता यायला हवा होता.
असो मग काय वाटतं आपल्याला काय होईल मीरा आणि आनंदच्या संसाराचं? सुधा काय करेल? आनंद सुधा सोबत आधी सारखाच वागणार कि आता त्याच्या वागण्यात फरक येईल? जे काही घडलं त्यात चूक कोणाची?
कथा इथंच संपवणार होते पण वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढे लिहिणार आहे. कथा कशी वाटली नक्की कळवा.
आता पुढे काय होईल? मीरा काय करेल? 
कथेचे पुढील भाग आणि आधीचे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा. 
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

No comments:

Post a Comment

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...