(आत्मचरित्र लिहिण्याइतकी उंची नाही गाठली पण सहजच लिहून बघितलं आणि अनुभवांचा ठेवा मिळाला. म्हटलं वाचकांसोबत शेयर केला तर होउ शकते त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणून ही उठाठेव.)
तशी लहानपणापासूनच थोडी सटकलेल्या दिमाखाची आणि कोणी कितीही बोंबललं तरी ऐकावं जनाचं करावं मनाचं अशी मी. आजोबानी मंगळवारचा जन्म म्हणून मोठया लाडानं माझं नाव ठेवलं मंगला. पण कधी प्रेमानं तर कधी मुद्दाम सर्व चिडवायचे,
"अगं अगं मंगला तुझ्या नवऱ्यानं बांधला का बंगला?"
"अगं अगं मंगला कधी बांधेल तुझा नवरा बंगला."
मी जाम चिडायची. खूप राग राग व्हायचा. हे मंगला बंगला समीकरण काही खरं नाही. म्हणून कि काय पहिल्या वर्गात पहिला दिवस, (आम्ही टीचरला मास्तरीणबाई किंवा फक्त बाई म्हणायचो) बाईंनी हजेरीत एकेका विद्यार्थ्याला नावं विचारून लिहिणं सुरु केलं. माझा नंबर आला आणि मी माझं नाव चक्क,
"अर्चना कैलास सोनाग्रे" असं सांगितलं. तेव्हा काही पेरेंट्स मिटिंग होत नव्हत्या. जिल्हापरिषदची सरकारी शाळा. माझं नाव मी बदललं हे घरी माहित झालं तोपर्यंत खूप वेळ झाला होता.
ऐन दहावीत मी एकता कपूरच्या नाटकांनी ग्रस्त झाली.🤦 आमची आई खतरनाक. डायरेक्ट धमकी मिळाली, नापास झाली तर लग्न लावून दिल्या जाईल. पण इंग्लिश मला शत्रू वाटे. तरीही थोडा अभ्यास करून आम्ही इंग्रजीत 36 मार्क घेऊन बॉर्डर वर वाचलो. देव पावला! पण खरंच मन नव्हतं लागत अभ्यासात. वयाचा दोष कि काय मी माझ्या डायरीत अगदीच रोमँटिक कविता लिहू लागली. आईच्या हातात डायरी पडली. तिनं खूप रागावलं. कारण तिला वाटलं माझं एखाद्या मुलासोबत 'लफडं' सुरु आहे. मग मी कविता लिहिल्या तरी लपवून ठेऊ लागली.
तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं 1984-85 दरम्यान सरकारचा आलेला झिरो बजेट ज्यात बाबाला काही कारण नसतांना नोकरीवरून कमी गेलं. पुणे सोडून आईबाबाचं 9-10 महिन्याच्या पोराला घेऊन घरी, खामगाव तालुक्यातील एका छोट्या खेड्यात राहायला येणं. चिडलेल्या आणि ललिता पवारचा अवतार असलेल्या सासूनं माझ्या आईबाबाचा रागराग करणं.नातू अन पोराला दूर आई पासून दूर ठेवणं. दोनजीवाची असतांना आईला भर उन्हात पराटी कापायला शेतात पाठवणं. तिथं वाईट नजर असलेल्या नराधमांचं एकटं पाहुन आईच्या मागे लागणं. तिचं जिवाच्या आकांतानं घराकडे धाव घेणं. पण सासूचं आळशी म्हणून पराटीनं झोडपून काढणं. उपाशी अंधाऱ्या धान्याच्या कोठरीत डांबून ठेवणं. मग पोटाला, गर्भाला लागलेल्या भुकेला शांत करण्यासाठी आईचं कच्चीच ज्वारी, मुंग तुरीची डाळ खाऊन पाणी पिऊन झोपून जाणं. खेड्याच्या कोणाचं आजोबाला आईची स्थिती कळवणं आणि आजोबा म्हणजे आईच्या बाबाचं पोलिसांना घेऊन येणं. कोर्टात खटला जाणं. अशातच झालेला माझा जन्म. बाबाची आईला घेऊन अकोल्यात वेगळं राहायची तयारी दाखवणं. माझी नाजूक प्रकृती पाहून आजोबा आजीजवळ शेगावला ठेवणं. एखाद्या राजकुमारी सारखा तिथला थाट,
पण आईची आठवण येई. म्हणून माझी रवानगी आईजवळ होणं. अकोल्याच्या लक्ष्मी नगर झोपडपट्टीजवळ कुडाच्या एका खोलीत आईचा संसार मांडलेला. पाऊस आला कि पावसाचं पाणी कुडातुन आत येई. पाण्यासोबत साप, विंचू, गांडूळ, गोम हे जीव जंतूही आत येत. मग आई आम्हा भावंडांना पोटुशी घेऊन बाजीवर बसे अन बाबा बाहेरच असत.
मी दिसायला सडपातळ, नाकीडोळी नीटस, गौरवर्णीय. एकदा मला पाहायला आलेल्या पटवारी मुलाला मी आवडली. उलट त्यानंच विचारलं मध्यस्थीला कि मुलीला मी आवडलो कि नाही विचारा. बस आता इथंच आपलं दानापाणी असं वाटलं. पण त्याच्या बाबाची हुंडा मागणी 3 लाखाच्या वर. माझी सटकली. एकतर ते हुंडा घेणार. लग्नाचा खर्च माझे आईबाबा करणार आणि उद्या मी नोकरीला लागली तर माझ्याकडून पाई पाई चा हिशोब घेणार. वरून माय बापाला काही देत तं नाही म्हणून लक्षही ठेवणार. मी त्या पोराला मेसेज केला, "इतका हुंडा माझे बाबा नाही देऊ शकत. खरं म्हणजे हुंडा घेणाऱ्या मुलगाच नको मला. तुम्ही बाबासोबत बोला तुमच्या."
मोठ्यांचे बोलून झाल्यावर मी म्हटलं मला एकट्यात बोलायचं आहे. मामाचा लहान मुलगा पाळण्यात झोपला होता आणि आम्ही दोघं.
"मला इतक्या लवकर लग्न नाही करायचं. कारण 8 हजार पगार आहे. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर वाढणार आहे. मी आईबाबाला नाहीच म्हटलं होतं इथे येण्यासाठी. पण त्यांच्यापुढे माझं चाललं नाही. ही मुलगी पाहायची माझी पहिलीच वेळ आहे." साहेब सांगून मोकळे झाले. खूपच इनोसेंट वाटले. वाटणारंच 24 वर्षाचे होते त्यावेळी ते.
"मग काय विचार आहे?" मी विचारलं, "लग्न करणार कि नाही."
"तुम्हाला कोण नाही म्हणणार लग्नाला. फक्त पुढल्या वर्षी करु."
"बरं तंबाखू, बिडी, गुटखा खाता का?" माझा प्रश्न
"नाही, पण तुम्ही म्हणणार तर खायला सुरवात करतो." नावाप्रमाणेच विनोदचं विनोदी उत्तर.
"दारू पीता?"
"न्यु इयर आणि मित्रांसोबत कधीतरी."
मला माझंच हसू येत होतं. "आणखी काही?"
"नको!" अनावधानाने तोंडातून निघालं. एक मन म्हणालं अगं एड्स चाचणी राहिली ना. दुसरं म्हणालं, काही गरज नाही. मुलगा चांगला आहे. गमावू नको.
मला ते बस 9 महिन्यांनी लग्न झालं. पण कसोटी संपली नव्हती. मला दिवस गेले.मला चौथा महिना सुरु असेल साहेबांची नोकरी गेली कारण कंपनी डुबली. जवळ जमवलेला सगळा पैसा साहेबांनी लग्नात खर्च केलेला. कठीण काळ. ह्यांचे भाऊ बाबा शेतकरी. त्यांना मागणं बरं नाही वाटलं आणि लग्नानंतर आईबाबाला पैसे मागणं मला ठीक वाटत नव्हतं. माझी खूप चिडचिड व्हायची. कधी कधी नको ते बोलून जायची. पण साहेबांनी निभावून नेलं आणि नोकरी जाऊन 2 महिने पूर्ण होत नाही तो साहेबांना दुसरी नोकरी मिळाली. पण वेगवेगळ्या शहरात जाऊन बोरवेल मशीनची सर्व्हिसिंग करायचं काम म्हणजे यांचा जॉब. मला विचारलं,
नागपूरला ट्रीटमेंट सुरु होती त्याच डॉक्टरला पुण्याच्या आमच्या एरियातल्या डॉक्टरची माहिती मागितली. एकटीच ऑटोने डॉक्टर कडे दाखवायला जायची. मला 8 वा महिना सुरु असतांना साहेब 10 दिवसांसाठी बंगलोरला ट्रेनिंगसाठी गेले. 8 वर्षा सारखे गेले ते दिवस. पण गेले. एक महत्वाची बाब शिकली,
"एकदा आपण असलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला कि सगळं सोपी होतं."
मुलगा होऊन 3-4 महिने झाले. माझ्याकडून घरात बसणं होईना. सरकारी नोकरी मिळवायचा विचारही डोक्यातून काढून टाकला. मिळेल तो जॉब करायचं ठरवलं. एका construction ऑफिसमधे ऍडमिनचं काम मिळालं. पगार अर्थातच खूपच कमी होता. पण अनुभवासाठी मी ते मान्य केलं. दादाची मुलगी लहानच म्हणून आई माझ्याजवळ येऊ शकली नाही आणि जाउचा मुलगा दूधपीता त्यात शेतीची कामं म्हणून सासू नाही येऊ शकल्या. साहेबांशी चर्चा करून मन घट्ट केलं आणि टाकलं पोराला पाळणाघरात. सकाळी लवकर उठून दोघं नवरा बायको मिळून सर्व कामं करुन 9 वाजता आपापल्या ऑफिसला जायचो. सुरवातीला काही दिवस खूप त्रास झाला. कधी कधी भांडणं पण झाली आमची. पण शिकलो हळूहळू एकमेकांना सांभाळायला. प्रत्येक क्षण आनंदात जगायला.
माझं शिक्षण पाहुन ऑफिसमधे सर्व म्हणायचे, तुला हा जॉब शोभत नाही. अभ्यास कर, स्पर्धा परीक्षा दे. मी यांना सांगितलं. हे पण म्हणाले,
"बरोबर बोलतात ते अर्चू. मलाही तसंच वाटतं. पण तुला असं नको वाटायला पाहिजे कि मला पैसे हवेत. म्हणून मी नाही बोललो तुला. (खरंच बोलले साहेब. मला कधी काय उलटं लागेल काही खरंच नाही बाबा. But don worry आता स्वभाव खूप शांत झाला बरं माझा.) बघ तुझ्याकडे शिक्षण आहे आणि वेळ पण आहे. दे तु परीक्षा. मलाही आता चांगला पगार मिळतोय. मी करेल सर्व खर्च."
"हो आणि आपल्याला मस्त फिरता पण येईल. मला काश्मीर पासून कन्याकुमारी सगळं फिरायचं आहे." (मरायच्या आधी जग फिरून घ्यावं ही माझी प्रबळ महत्वाकांक्षा आहे.)
आमच्या नवरोबानं खूप मोठं मन केलं खरंच. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. कारण मला निश्चिन्त होऊन अभ्यास आणि क्लास करता यावा म्हणून आईकडे माहेरी 6 महिने राहू दिलं. तेव्हा आजूबाजूचे आईला विचारायचे सगळं ठीक आहे ना अर्चूचं? पण एक वर्षानंतर जेव्हा आईकडेच ऑफर लेटर आलं तेव्हा सगळ्यांना उत्तर मिळालं आणि माझी जिद्द सफल झाली.
जॉब लागला तेव्हा पासून दर सहा महिन्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे साहेब मला नवीन जागी फिरायला नेतात. आतापर्यंत कोकण, पंचमढी, मैसूर उटी, महाबळेश्वर, शिमला मनाली फिरून झालं. या वर्षी दुबई वारी ठरली होती पण कोरोनामुळे सध्या घरीच सगळ्या वाऱ्या सुरु आहेत.
माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. मला वाटतं आपण जेव्हा स्वतःला आनंदी करतो तेव्हा आपण इतरांना दुपटीनं सुख देऊ शकतो.
आयुष्याला सफल करण्यासाठी मी खूप पुस्तकं वाचते. त्यात दी सिक्रेट, शिव खेडा यांचं यु कॅन विन, रॉबिन शर्माची पुस्तकं विशेष. वाचाल तर वाचाल या उक्तीवर माझा विश्वास आहे.
समाजाला आपलं देणं आहे. म्हणून सामाजिक लेख / कविता लिहून समाजाला, बंधू भगिनींना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करते.
तसं स्वतःबद्दल सांगण्या सारखं खूप आहे. पण ती उंची अजून गाठली नाही असं वाटतं.
माझं शिक्षण : मास्टर ऑफ लेबर स्टडीज, नागपूर
मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, नागपूर
मास्टर ऑफ कॉउंसिलिंग इन मेंटल हेल्थ, महर्षी कर्वे सोसिअल इन्स्टिटयूट,पुणे(स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि गरजूंना चांगल्याने मार्गदर्शन करु शकतो, कॉउंसिलिंग करु शकतो असं मला वाटायचं. म्हणून लग्न झाल्यावर मधल्या काळात सहा महिन्याचा हा कोर्स केला. कोर्स केल्यावर manasvardhan या rehabilitation center मधे ऍडमिन म्हणून रुजू झाली होती. पण एक महिना पूर्ण होत नाही तो आताच्या नोकरीचं ऑफर लेटर आलं. पण तिथंला अनुभव मला खूप काही शिकवून गेला. तेव्हा पासून मी दसरा दिवाळीला अशा रिहॅब सेंटरला तिथल्या माणसांसाठी मिठाई घेऊन जाते. तसेंच कोणी वाईट वागलं तरी त्याचा मानसशास्त्रीय अँगल शोधायचा प्रयत्न करते. हे तुम्हाला माझ्या लेखणीतही दिसून येईल.)
बाकी सद्य परिस्थितीत सगळं अगदी छान आहे. आता साहेब एका नामांकित construction कंपनीमधे मशिनरी ऑफिसर म्हणून जॉब करतात आणि मी सरकारी जॉब करते आणि आमचं एक पिल्लु आहे. वेळातला वेळ काढून लिहिते आणि माझं लेखिका बनायचं स्वप्न पूर्ण करतेय.😇
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
#miarchanasonagre.blogspot.com
(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)
No comments:
Post a Comment