Thursday, 30 April 2020

टेक इट लाईटली

प्रसंग पहिला - ऑफिसचा रिकामा वेळ
"काल सुनबाईला चांगले झापले." ऑफिसचे एक लिपिक काका, दुसऱ्या लिपिक काकांना त्यांच्या नवविवाहित सुनेबद्दल सांगत होते,"अरे तिचे आई बाबा आले की मस्त साडी, मंगळसूत्र, हातभर बांगड्या सगळा श्रृंगार करुन राहते आणि एरवी एखाद्या अविवाहितेसारखी असते."
"हे काही चांगले लक्षण नाही,"दूसरे लिपिक काका,"काय अर्चना बरोबर बोललो ना मि !"
मि स्वताला निरखुन पाहिले आणि त्यांना म्हणाले,"माझ्या ना पायात जोडवी ना हातात बांगड्या ना गळ्यात मंगळसूत्र ना भांगात कुंकु !" हसत मि, "तेव्हा मि तिला जज करने अजिबात योग्य नाही." विषय संपला. दोन्ही रिटायरमेंटवर आलेले काका मीटिंग बर्खास्त करुन आपल्या जागेवर गेले.
प्रसंग दूसरा - रविवारची मोकळी दुपार
"तु किती मोबाईल बघतेस?" आई,"जा कपडे बदल. स्कर्ट आणि टॉप काढ, सलवार घाल. पाहुणे येतीलच थोड्या वेळात घरी."
"बदलते !" आत जाऊन शॉर्ट स्कर्ट काढला आणि लॉन्ग स्कर्ट घातला. पाहुणे आले. आईने माझ्याकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकला. कारण मि सलवार न घालता फक्त स्कर्ट बदलला होता. मि फक्त स्माइल दिली. एंजियोप्लास्टी झालेल्या आईसोबत वाद टळला.
प्रसंग तीसरा - संध्याकाळी चहाची वेळ
"अथर्व 6 वर्षांचा झाला. होउ दे दूसरे मुल. एकाला एक भाऊ बहिन पाहिजेच." सासुबाई अगदी गंभीर होउन...
"हो !" मि अगदी रिलॅक्स होउन,"अथर्व 10वर्षांचा झाल्यावर बघेल. तेव्हापर्यंत बोर झालेली असेल मि पण. मग ठेविन. तुम्ही येणारच बाळंतपन करायला!"
"🙆🤦‍♀️😱" बिचारया सासुबाई !
प्रसंग चौथा - ऑफिसचा लंच टाईम
"आपल्याला अभ्यास केलेच पाहिजे, इथे आपले काहीच खरे नाही."एक सहकर्मी !
"खऱच आता आपले वय आहे. पुढे जबाबदारया वाढतील आणि वय पण!"दूसरा सहकर्मी !
"नाहीतर काय? मुल झाले की काहीच होत नाही. तरीही करतेय मि अभ्यास. पण दूसरे बाळ झाल्यावर नाही होणार. " तीसरी सहकर्मी!
अशा टेंशनच्या वातावरणात मि मस्त चेयरवर रेटून होते.
"अर्चनाला टेंशनच नाही बापा." एक सहकर्मी
"कसे असेल बाबा, चांगला पगार येतो दोघा नवरा बायकोचा मिळून."दूसरा सहकर्मी.
"हो, मि तर 35ची झाल्यावर परत अभ्यास सुरु करणार रे बाबा !" सर्व माझ्याकडे भुवया उंचावून, मि "अरे अभी तो पार्टी शुरू हुई है, सो लेट्स एन्जॉय !" 😉🤣🤣🙏 सर्वांचे चेहरे खुललेले..
प्रसंग पाचवा - मतदानाचा दिवस
माझी पटपट स्वयंपाक करुन मतदानाला जायची घाई. "अग हा फोन घे आणि सांग त्यांना मि औषधि घेऊन झोपलोय म्हणून !"आमचे हे.
पण मि फोन रिसीव करायच्या आधी कट झालेला. म्हणून मग 102 ताप असल्यामुळे घरी राहिलेल्या आमच्या ह्यांनी फरमान सोडला,"एक काम निट होत नाही तुझ्याकडून!"
"नाही होत !" एवढे म्हणून मि परत माझ्या कामाला लागलेली. कारण तब्येत ख़राब असलेल्या आणि खूप कष्टाने सुट्टी घेतलेल्या, कामाच्या टेंशनमधे असलेल्या ह्यांच्याशी वाद करण्यात मला काही अर्थ वाटला नाही. थोड्याच वेळात साहेब हसुन बोलायला तयार.
पाचही प्रसंगात वातावरण टेंशनचे आणि वादविवादावर आलेले. पण केवळ लाइटली घेतल्यामुळे हसण्यावर निवळलेले. तेव्हा,
चला खुलून बोला,
मन स्वच्छ ठेवा !
सोडा मनाचे खेळ खेळने
ह्याचे त्याचे मनाला लावून घेणे!
घेउन लोड हृदयावर,
जाल विकतच्या बिछाण्यावर !(हॉस्पिटल )
कधी कोणी बोलले म्हणून काय झाले?
शरीराला कुठे छिद्र पडले?
मग इतका बाउ का करायचा,
उगाच स्वताला त्रास करुन घ्यायचा,
आणि आपल्याच आप्तांना ताप द्यायचा !
बरोबर ना !
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. शुद्धलेखनाच्या चूका माफ कराव्यात.
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Tuesday, 28 April 2020

माझे सुटलेले पोट अन अफवाच अफवा

तशी मी एकदम सड़सडीत बांध्याची. अथर्व झाल्यावरही माझ्या बांध्यात काही जास्त फरक पड़ला नाही. फक्त पोट थोड़े बाहेर आले. कदाचित सीजर झाल्यामुळे. पुढे मी सरकारी कर्मचारी झाली. लिपिकाचे काम असल्यामुळे 2-3 तास सतत बसून राहावे लागे. त्यात कामात किती वेळ आपण बसूनच होतो हे लक्षात येत नव्हते आणि दिमतिला चपराशी असल्यामुळे पानी घ्यायला सुद्धा उठावे लागत नव्हते. दर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी कोणाचातरी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस,  रिटायरमेंट, प्रमोशन, कशाना कशाबद्दल मिठाई वाटली जायची. एक दिवस तरी स्वयंपाकाला सुट्टी हवि म्हणून रविवारी डिनर बाहेरच व्हायचा, तोही नॉनवेज. चीज आमचे आवडते म्हणून आठवड्यातून दोनदा तरी चीज सैंडविच किंवा बर्गर डिनरमधे असायचे. तर अशी मी थोड़ी फुटली, नको तिथे जास्त सुटली. आणि माझ्याबद्दल सहकर्मींची अंदाज बांधायला सुरवात झाली.
दूसरी गोड बातमी आहे वाटते म्हणून माझी विचारपुस होउ लागली. मी हसुन नकार देत होती. एकदा एका सहकर्मी मुलीला अजीर्ण होउन उलटी झाली. कुणीतरी अफवा उडवली,"अर्चना मैडम प्रेग्नेंट आहेत, त्यांना उलट्या होत आहेत." कारण माझे पुढे आलेले अर्थात सुटलेले पोट ! मी डोक्यावर हाथ मारला. जाऊ दे म्हटले काय बोलणार कोणाला. त्यापेक्षा आपण आपले पोटच कमी करु व्यायाम करुन. पण तेहि सोपे नव्हते. अथर्व शाळेत आणि विनोद ऑफिसला 9वाजता जात असल्यामुळे 9च्या आधीच स्वयंपाक करुन टिफिन भरावे लागत. 9नंतर व्यायाम करावा तर आम्ही भुक्कड़, सकाळी उठल्या बरोबर भूख लागते आम्हाला. म्हणून आधी भांडे घासायला आणि पोळ्या बनवायला बाई शोधली. मग मी व्यायाम करायला सुरवात केली. उठल्या बरोबर कोमट पानी प्यायची. मेटाबोलिज़म वाढावा म्हणून ग्रीन टी प्यायला लागली. गोड आणि चर्बीयुक्त खाने बंद केले. थोड्या दिवसातच मला हलके हलके वाटायला लागले.
पण 14-15 दिवस होत नाही तो माझ्या पायावर एक पांढरा फोड़ आला. भयानक खाज होती त्यात. मी झोपित ते खाजवले. झाले कल्याण माझे. माझा अर्धा पाय काळा निळा पड़ला. विचित्र स्थिति झाली होती. अचानक ताप चढ़त होता आणि अचानक उतरत होता. सुट्टी घेऊन घरी आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपली एम्प्लोयी बीमार आहे म्हणून माझे सर बायको सोबत मला पहायला घरी आले. आणि परत अफवा पसरली की अर्चना मैडम प्रेग्नेंट आहेत.
कड़ाक्याचा हिवाळा होता त्यावेळी. म्हणून मी ऑफिसला छान स्वेटर घालून, डोक्याला मफलर गुंडाळून गेली तर  मैत्रीणि विचारु लागल्या, "तुझ्याकड़े गुड न्यूज़ आहे असे कळले आम्हाला."
"आम्हाला का नाही सांगितले तु?"🤦‍♀️
अशाप्रकारे ऑफिस जॉइन केले तेव्हापासून आतापर्यंत मला 4-5 वेळा प्रेग्नेंट डिक्लेअर केले गेले आहे. कारण माझे सुटलेले पोट. 🙆
आधी खूप टेंशन येत होते. पण आता मी अजिबात या पोटाचे टेंशन घेत नाही. कुणी विचारले प्रेग्नेंट आहे का?  तर काहीच बोलत नाही. ती व्यक्ति आपले उत्तर शोधत बसेल. मी का स्पष्टीकरण देऊ?
लेख आवडल्यास शेयर नक्की करा. धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Sunday, 26 April 2020

स्वीकार भाग 1

स्वीकार भाग 2 इथं वाचा

"मनोविकार समजून घ्या, गैरसमज टाळा आणि उपचारानं आनंदी व्हा !" अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील माझं आवडतं प्रेरणादायी वाक्य.

खरंच आपण शरीराकडे किती लक्ष देतो. थोडं सर्दी पडसं झालं कि डॉक्टर कडे जातो. त्यातही आपल्या प्रत्येक इंद्रिया साठी एक स्पेशियालिस्ट आहे. दात दुखत असेल तर दाताच्या डॉक्टरकडे किंवा डोळ्यांना काही त्रास असेल तर डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे जातो. मग ज्याला आपण आपल्या शरीराचा आत्मा म्हणतो त्या मनाचं संतुलन बिघडलं असता आपण कधीच त्याचे स्पेशालिस्ट असलेल्या माणसशास्त्रज्ञाकडे, सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे का जात नाही? का आपण आपल्या मनाकडेच इतकं दुर्लक्ष करतो? का मनोविकारासाठी उपचार घ्यायला आपला जीव घाबरतो? का एखाद्याला एखादा मनोविकार जडलेला असेल तर आपण त्याला तूच्छ पाहतो, पागल असं म्हणून दूषणं लावतो? त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही होणारा त्रास आपल्याला दिसत नाही? कदाचित म्हणूनच कितीतरी लोकं आतल्या आत कुढतात पण सायकोलॉजिस्टकडे जात नाहीत.
असेच प्रश्न मला पडायचे. म्हणून मी माणसशास्त्रात पदवीधर झाले आणि पुण्याला असतांना महर्षी कर्वे इन्स्टिटयूट मधून, 'मास्टर इन काउंसिलिंग इन मेंटल हेल्थ' हा कोर्स केला. त्यावेळी माझ्या मनात या कथेने जन्म घेतला. आता ही कथा पुस्तक रूपात मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे.
ही कथा कादंबरी लिहायचा माझा मुख्य उद्देश माणसशास्त्राबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांनी माणसशास्त्रज्ञाची मदत जरूर घ्यावी हा आहे. तसेच सामान्य लोकांनी मानसिक रुग्णांना समजून घ्यावं हिच अपेक्षा. आपल्या बंधू भगिनी पैकी कोणाला असा त्रास असेल तर त्यांना वाळीत न टाकता उपचार घेण्यात मदत करावी.
लेखन रोचक असलं की वाचणाऱ्याला ते प्रेरित करतं. म्हणून बायपोलर हा मानसिक रोग असलेल्या एका स्त्रीची प्रेमळ कथा इथे मी रंगवली आहे.
कधी कधी लिहिण्याच्या ओघात भान राहत नाही. त्यामुळे काही चूकभूल झाली असेल तर कमेंट करून सांगा. 

तर ही कथा आहे आराधनाची. आज तिचा सत्तेचाळीसवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि धुमधामीत साजरा करण्यात आला. पहिल्यांदा सत्य हे स्वप्नापेक्षाही कितीतरी सुंदर असु शकतं याची प्रचिती आली. जीवन मनभरून जगल्यासारखं वाटतय तिला तेही तब्बल एकविस वर्षांनी ! गंमतीचीच गोष्ट आहे ना .... एकवीस वर्ष बाहेरच्या जगाचा स्पर्श नाही, अंधार्या कोठडीत राहणं आणि अचानक झोपेतून जाग आली म्हणून उठून बाहेरच्या जगाशी संपर्क साधायचा. किती वेगळं अन् कठीण ! सगळं बदलेलं होतं. वाढलेलं वय, पांढरे झालेले केस, चेहर्यावरची कांती जाउन आलेल्या सुकृत्या ... हे झालं आराधनाचं. पण हे जग ... हेही किती बदलेलं. किती टेक्निकल झालेलं. ते आराधनाला, एका पागलखान्यात एकविस वर्ष पागल म्हणुन वास्तव्य केलेल्या बाईला (नाॅर्मल म्हणून) स्वीकारेल का ? आणि ती सुद्धा ह्या बदललेल्या टेक्नोसॅव्ही झालेल्या जगाला स्वीकारू शकेल का ? दोन्हीही गोष्टी सहजा सहजी होणे फार कठीण. पण ज्याच्याजवळ कोणितरी असतं ना, अगदी आपलं, हृदयापासुन आपल्याला जपणारं, त्याच्यासाठी सगळंच शक्य असतं बघा 😊.
तर अशीच आहे अरुची(आराधनाला प्रेमानी सर्व अरु म्हणायचे) राधा. राधानं सगळं शक्य आणि सोपं केलं अरुसाठी. ति नसती ना तर अरुचा अंत सुद्धा त्या पागलखान्यातच झाला असता. म्हणायला त्यांच्यात रक्ताचं असं काही नातं नाही. पण मनाचं आहे. दोघी मैत्रीणी एकमेकिंच्या, अगदी जिवाभावाच्या.....
अरु एकविस वर्षांनी वेडेपणातुन बाहेर कशी आली ना ती एक गम्मतच आहे. एखाद्या सिनेमासारखी !
तर तिन महीन्या आधी राधेच्या मुलाचा अमनचा साखरपुडा झाला. होणारी सुन खुपच मस्त,'फुलराणी' नाव ऐकुनच मोहरल्यासारखं वाटतं. ती नावाजलेली मुक्त पत्रकार आणि लेखिकाही, तरूणपणी अरुची आयडॉल असलेल्या शोभा डे ची आठवण झाली अरुला फुलराणीला पाहून. पोरीचं वय वर्ष फक्त एकोणविस ? बापरे ? पोटातून पडल्याबरोबर शाळेत गेली की काय ? असं अरुच्या मनात आलं. पण 2019 साल म्हणजे किती पुढारलेलं जग आणि इतक्या लवकर साखरपुडा का ? अमनला आणि फुलराणीला फक्त लिव्हइन मधेच राहायचं होतं. मग ही साखरपुडा, लग्न? झालं असं कि,
अमन नेव्ही इंजीनियरींग काॅलेजमधे पुण्याला पहिल्या वर्षाला असतांना एका डाॅक्युमेंटरी निमित्त फुलराणीचे सतत तिथं येणे जाणे व्हायचे. तेव्हा अमन आणि फुलराणिची मैत्री झाली. फुलराणिची आई एक सिंगल पॅरेंट, एक सायकोलॉजिस्ट. मूळची महाराष्ट्रीयन पण बाबा नोकरीला  दिल्लीला होते. लहानपण, शिक्षण सगळं दिल्लीतच. म्हणून तिथंच स्थायी झाली. तिनं फुलराणीला खुप मोकळं वातावरण दिलं. म्हणून की काय फुलराणी अगदी बिंधास्त झाली. कितीतरी देश एकटीच फिरली. शाळेतच तीने एक पत्रकार आणि टिनेज टॉप ब्लॉग राइटर म्हणून नाव कमवले. तसेच यूथ लव स्टोरीज़, बी लाइक मी, लाइफ इज जिप्सी, ही तिची तीन नॉवेल तरुण मंडलळीने चक्क डोक्यावर घेतली. तिचे टॅलेंट पाहून सिंबाॅइसीस काॅलेजने तिला पत्रकारीतेची पदवी तिच्या अठराव्या वर्षिच बहाल केली. आता तिला आयुष्यात नविन काहीतरी हवे होते.
"मला तुझ्याशी लग्न करायचं आहे."फुलराणीने अमनला प्रपोज केलं.
"काय?" अमनने अंगावर पाल पडल्यापेक्षाही जास्त बेकार रिॲक्शन दिलं,"अग मि काहीच कमवीत नाही."
"मि कमवीत आहे ना." काहीतरी काउंटींग करत,"मि लिहीलेल्या पुस्तकांची राॅयल्टी आणि पत्रकारीतेचे मिळून २५-३० हजार येतात बाकी राहायला आपापली घरं आहेतच आणि काॅंट्रंक्ट मॅरेज करू. पटलं तर राहू सोबत नाही तर नाही."
"??????"
"मला बघायचं आहे लग्न करून!"
''म्हणजे ?''
''अरे मला नवीन काहीतरी लिहायचे आहे आणि लग्न हा विषय खूपच भावला मला आणि बघ विथ एक्सपेरियंस लिहिले तर रियलिटीचा टच मिळेल ना ''
अमन नाही म्हनू नाही शकला. त्यालाही फुलराणी आवडायची. सर्वांनी समजावले. पण फुलराणी म्हणाली,''बघा अजून 2-3 वर्षान्नी काय आणि आज काय, लग्न ते लग्न आणि अमन सोबतच करेल हा ठाम निर्णय.''
राधा काही कमी नाही ती म्हणाली,''ठीक आहे करा लग्न पण आधी साखरपुड़ा करून फुलरानी तीन महीने माझ्यासोबत राहील. आम्ही दोघी एकमेकींना जाणून घेऊ. नंतर लग्न.''
''वाउ ग्रेट ... म्हणजे मला आणखी एक विषय मीळेल लिहायला.'' असे म्हणून तिने राधाला मीठी मारली,''माझी होणारी सासु ... नाही माझ्या होणारया नवरयाची आई.''
राधा विचार करत होती ह्या रोबोट युगात हे काय खुळ माझ्या नशीबी येतेय. एक आमचा काळ होता, लवकर लग्न नाही करायचे म्हणून किती तांडव करावे लागे आणि ही पोरगी एकोणविसाव्या वर्षिच लग्न करतो म्हनतेय. कशाला तर पुस्तक लिहायला अनुभव हवा म्हणून .. असो कमित कमी अमन मुलीशीच लग्न करतोय हेच खूप आहे. नाहीतर त्याचा मित्र केवल, त्याच्या लक्षणावरून तर भीतीच वाटायची की, पोरगं सुनिच्या ऐवजी जावई आणेल अन्'माँ दा लाडला बिघड़ गया' म्हणावे लागेल आपल्याला.
साखरपुड़ा झाल्यावर फुलराणी राधाच्या घरी तिच्यासोबतच राहू लागली. राधाला सकाळी ऑफीसला ड्रॉप करने, संध्याकालळी पीक अप करने. शॉपिंगला घेऊन जाणे. अर्थात राधा जिथे जाईल तिथे फूलरानी तिच्या सोबत असायची. राधा दर एक-दोन महिन्यातुन अरुला भेटायला असायलम मधे यायची. यावेळेस आली तेव्हा फूलरानी सोबतच होती. फुलराणीने खुप विचारले कोणाला भेटु ते ? पण राधानी फक्त एवढंच सांगितलं की तिला पुस्तक लिहायला एक नविन कॅरेक्टर मिळेल. तुझ्यासारखंच आकाशाला मुठीत बंद करू पाहणारं, तुला चान्स मिळाला ग! तिनेच माहीत नाही काय वाईट केलं कोणाचं ?" फुलराणीला राधेच्या असं बोलण्याचा अर्थ अरुला भेटल्यावर कळला.
एका बंद पिंजर्यात अंधारात होती ती. 26 वर्षाची असतांना (म्हणजे 1998-99 साल सुरु होतं) तिला नैराश्यानं जकडले आणि पाहता पाहता ती एक बायपोलरची रूग्ण झाली ! घडीला पाणी तर घडीला आग, असा होता तिचा ताल.
क्रमश:
काही महिन्यांपूर्वी हीच कथा मी, 'मी अमृता' या नावाने मॉम्सप्रेसो वर लिहायला सुरु केली होती. पण मधेच साहित्यचोरी प्रकार पुढे आल्याने मी पुढले भाग इथे टाकलेच नव्हते. आता तीच कथा 'स्वीकार' या नावाने आणि अधिक समर्पकतेने परत एकदा लिहितेय आणि आपल्यासमोर प्रस्तुत करतेय. आशा आहे आपल्याला नक्की आवडेल. आवडल्यास माझ्या नावासोबत शेयर नक्की करा आणि प्लिज मला फाॅलो करा. म्हणजे नंतरचे भाग तुम्हाला शोधत बसावे लागणार नाहीत. तर ते प्रकाशीत होताच तुम्हाला नोटीफीकेशन मिळेल.
फोटो फ्रॉम गुगल🙏.
धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 😊🙏
archusonagre@gmail.com

नको तुला नाही जमायचं

लॉकडाऊन होऊन तीन दिवस झालेले. प्रियाचा सगळा वेळ घरकामात स्वयंपाक करण्यात जायचा. मंदार तिला मदत करु पाही. पण तीच, 'नको तुला नाही जमायचं.' असं बोलून त्याला शाम सोबत खेळायला किंवा कपडे प्रेस करायला वगैरे सांगे. कारण तिला वाटे हा किचन मध्ये एक मदत करेल आणि दहा कामं वाढवेल. घरचं मिळमिळीत खाऊन सगळेच बोर झाले होते. मंदार किराण्याची लिस्ट द्यायला आणि भाजीपाला आणायला बाहेर पडतच होता तो 4 वर्षाचा शाम म्हणाला, "बाबा पाणीपुरी आणा."
"अरे सर्व चाट वाले आणि इतर हॉटेल्स बंद आहेत. पाणीपुरी कशी आणू?"
"अरे पॅकेट आन किराण्यात पाणीपुरीचं, सोबत मसाला पण माग पाण्याचा." प्रियानं आयडिया दिली.
मग काय मंदार एक पाऊल पुढे. तो सॅन्डविच ब्रेडही घेऊन आला. प्रियाने टेस्टी सॅन्डविच बनवले. तिघांनी मस्त पाणीपुरी आणि सॅन्डविचवर ताव मारला. पण पाणीपुरीच्या पाण्यामुळे कि ब्रेडमुळे कि आणखी कशामुळे प्रियाचं दुसऱ्या दिवशी सकाळी पोट बिघडलं. तिला संडास लागली. बाहेर जाण्यासाठी बंदी असल्याने मंदार एकटाच डॉक्टरला भेटून तिच्यासाठी औषधं घेऊन आला. ती पार गळून गेली. तो औषधं घेऊन झोप म्हणाला.
"अरे पण मी झोपली तर स्वयंपाक कोण बनवणार?"
"मी करतो काहीतरी. डॉक्टरने सांगितलं आराम करायला. जास्त खराब झाली तब्येत तर दवाखान्यात भरती करावं लागेल."
"अजिबात नाही. त्यापेक्षा झोपतेच मी." रात्रभर पोटदुखीनं जागी असल्यामुळे तिला लवकर झोप लागली. आता घराची सर्व जबाबदारी मंदारच्या खांद्यावर येऊन पडली. ज्याला साधं तिखट मिठ कुठं आहे ते माहित नव्हतं त्याला स्वयंपाक करायचा होता. इतरवेळी त्यानं हवं ते ऑनलाईन मागवलं असतं. पण आता लॉकडाऊनमुळे तर साधी मॅगी पण कुठे बाहेर मिळणार नव्हती.
"पप्पा भूक लागली." शाम मंदारचा बर्मुडा ओढत म्हणाला.
"मॅगी देतो बनवून पटकन."
"नाही वरण पोली."
"अरे पण मॅगी आवडतं ना तुला.''
"टीचर म्हणते मॅगीनी पोटात किडे होतात."😧
"त्या टिचरची👿... आता कसं बनवू वरण पोळी?" मंदार स्वतःशीच पुटपुटला. मोबाईलवर मेसेज आला. त्यानं बघितला. दाल्गोना कॉफी बनवायची यु ट्यूब लिंक कोणीतरी ग्रुपमध्ये टाकली होती.
"यस 😃! यु ट्यूबवर पाहून बनवतो वरण पोळी."
मंदारने यु ट्यूब सुरु केलं. आधी वरण बनवायला तुरीची डाळ 3 वेळा धुवून कुकर मध्ये चढवायला सांगितली. हा आलमारीत तुरीची डाळ शोधू लागला. त्याला व्हिडीओ मध्ये तुरीची डाळ पिवळी असते हे समजलं. पण अलमारीत दोन डबे दोन पिवळ्या डाळींनी भरलेले दिसले. एक डाळ पातळ आणि एक जाड. तुरीची कोणती? 🙄. मग गुगल वर संशोधन झालं. तेव्हा 40-50 इमेजेस पाहिल्यावर पातळ डाळ तुरीची हे कन्फर्म  झालं. डाळ तीन वेळा धुवून कुकर मधे लावण्यात आली.
आता पोळ्या बनवण्यासाठी कोपरात कणिक घेतली. पाणी टाकलं, जास्त पडलं म्हणून थोडी अजून कणिक घेतली, परत पाणी कमी, जास्त असं करता करता कोपर कणकेने भरून गेला. छोटा शाम 2-3 वेळा वरण पोळी झाली का पाहायला आला. बाबाला असं पाहून आईजवळ गेला.
"आई बघ पप्पाला बग.. उठ, उठ.. " प्रियाला गाढ झोप लागलेली. श्यामने प्रियाला हलवून उठवलं.
"काय रे बाळा?" ती भांबावून जागी झाली.
"भूक लागली."
"का रे पप्पानं काही दिलं नाही का?"
"ना... "
"बरं चल बनवते मी." ती बेडवरुन उठू लागली तो मंदार तिच्याजवळ धावत आला.
"प्रिया कुकर उडणार नाहीतर फुटणार वाटतं आता."
"काय?" प्रियानं एक नजर मंदारवर टाकली. मंदारच्या गालाला, कपाळावर, कपड्यांवर कणिक पीठ लागलेलं होतं. दोन्ही हात उंड्याने बरबटलेले होते. ती तोंडावर हात ठेऊन हसू दाबत किचनमध्ये गेली. कुकर मधलं डाळ असलेलं भांड तडतड वाजत होतं. कारण मंदार साहेबांनी भांड्याखाली रिंग ठेवली नव्हती. आणि पाणीही अगदीच कमी टाकलं होतं. मंदारला वाटलं कुकरचं काहीतरी बिघडलं. तो आता फुटणार.
किचनच्या वट्यावर डाळ पाणी कणिक सगळं सांडलेलं होतं. कोपरात त्यांना 2-3 दिवस पुरेल इतकी कणिक भिजलेली होती. अलमारीतले सर्व डबे बाहेर. इतका पसारा कधी आवरायचा? तिने डोक्याला हात लावला.
"सॉरी. मी आवरून देतो सगळं." मंदार म्हणाला.
तिच्या तोंडाशी आलं कि नको तुला नाही जमायचं वगैरे वगैरे. पण तिने स्वतःला आवरलं. आता तिचं फक्त पोटच खराब झालं होतं. पुढे आणखी काही झालं तर पिल्लू शाम आणि मंदार उपाशीच राहतील. तेव्हा खाण्यापुरती कामं तरी यांना यायलाच हवी म्हणून ती म्हणाली, 
"मला बसायला चेयर दे. मी सांगते काय कसं करायचं!" आणि मंदारकडूनच प्रियाने सर्व कामं करून घेतली. 
धन्यवाद!
तर मैत्रिणींनो वेळ सांगून येत नाही. आपल्या मुलांना तसंच नवऱ्यालाही तो उपाशी राहणार नाही इतकं तरी किचनचं काम करु द्या किंवा गोड बोलून शिकवा. 
माझ्या खुप मैत्रिणींची तक्रार कि नवऱ्याला एक काम सांगितलं कि तो 10 वाढवून ठेवतो. मी म्हणते आवरू द्यायचं कि त्यांचं त्यांना. किंवा काम करायच्या आधीच सांगायचं नीट कर. पसारा झाला तर तुलाच आवरावे लागेल. सुरवातीला करतील थोडा पसारा पण त्यांचा त्यांनाच आवरायला लावायचा. आणि टोमणे न मारता किंवा काव काव न करता प्रेमानं समजावून काम काढून घ्यायचे. आपण बायका ना लवकर संतापतो अन मग नवऱ्यांना संधी मिळते म्हणायची, "तुझी कामं तूच कर!"

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Copyright कायद्याअंतर्गत लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत आणि लेखिकेच्या परवानगी शिवाय लेख कुठेही प्रस्तुत किंवा पब्लिश करणे हा गुन्हा आहे. निषेध साहित्यचोरीला. 

Saturday, 25 April 2020

मी अर्चना (आत्मचरित्र)



(आत्मचरित्र लिहिण्याइतकी उंची नाही गाठली पण सहजच लिहून बघितलं आणि अनुभवांचा ठेवा मिळाला. म्हटलं वाचकांसोबत शेयर केला तर होउ शकते त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणून ही उठाठेव.)

तशी लहानपणापासूनच थोडी सटकलेल्या दिमाखाची आणि कोणी कितीही बोंबललं तरी ऐकावं जनाचं करावं मनाचं अशी मी. आजोबानी मंगळवारचा जन्म म्हणून मोठया लाडानं माझं नाव ठेवलं मंगला. पण कधी प्रेमानं तर कधी मुद्दाम सर्व चिडवायचे,
"अगं अगं मंगला तुझ्या नवऱ्यानं बांधला का बंगला?"
"अगं अगं मंगला कधी बांधेल तुझा नवरा बंगला."
मी जाम चिडायची. खूप राग राग व्हायचा. हे मंगला बंगला समीकरण काही खरं नाही. म्हणून कि काय पहिल्या वर्गात पहिला दिवस, (आम्ही टीचरला मास्तरीणबाई किंवा फक्त बाई म्हणायचो) बाईंनी हजेरीत एकेका विद्यार्थ्याला नावं विचारून लिहिणं सुरु केलं. माझा नंबर आला आणि मी माझं नाव चक्क,
"अर्चना कैलास सोनाग्रे" असं सांगितलं. तेव्हा काही पेरेंट्स मिटिंग होत नव्हत्या. जिल्हापरिषदची सरकारी शाळा. माझं नाव मी बदललं हे घरी माहित झालं तोपर्यंत खूप वेळ झाला होता.
ऐन दहावीत मी एकता कपूरच्या नाटकांनी ग्रस्त झाली.🤦 आमची आई खतरनाक. डायरेक्ट धमकी मिळाली, नापास झाली तर लग्न लावून दिल्या जाईल. पण इंग्लिश मला शत्रू वाटे. तरीही थोडा अभ्यास करून आम्ही इंग्रजीत 36 मार्क घेऊन बॉर्डर वर वाचलो.  देव पावला! पण खरंच मन नव्हतं लागत अभ्यासात. वयाचा दोष कि काय मी माझ्या डायरीत अगदीच रोमँटिक कविता लिहू लागली. आईच्या हातात डायरी पडली. तिनं खूप रागावलं. कारण तिला वाटलं माझं एखाद्या मुलासोबत 'लफडं' सुरु आहे. मग मी कविता लिहिल्या तरी लपवून ठेऊ लागली.
बारावी पास झाली. कॉलेजला गेली. कॉलेजमधे तर कथा कादंबर्यांची खान हातात लागली. शोभा डे च्या पुस्तकांचा परिणाम कि काय मी ठरवलं मी लेखिकाच बनणार. पण आई खूप भावुक होऊन म्हणाली,
"पोरी तु बघत आली आहेस ना किती कष्टातुन पुढे आलो आपण. किती काटकसर करून मी घर चालवते. एक एक रुपया जमा करून तुम्हा भावंडांचे खर्च भागवते. मला फक्त इतकंच वाटतं कि तुला ते सगळं जगायला मिळो जे मी पैशाच्या अभावी नाही जगू शकली. मी असं नाही म्हणत कि लिहिणं सोड. पण आधी आर्थिक पाया भर भक्कम कर. नंतर लिही."
तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं 1984-85 दरम्यान सरकारचा आलेला झिरो बजेट ज्यात बाबाला काही कारण नसतांना नोकरीवरून कमी गेलं. पुणे सोडून आईबाबाचं 9-10 महिन्याच्या पोराला घेऊन घरी, खामगाव तालुक्यातील एका छोट्या खेड्यात राहायला येणं. चिडलेल्या आणि ललिता पवारचा अवतार असलेल्या सासूनं माझ्या आईबाबाचा रागराग करणं.नातू अन पोराला दूर आई पासून दूर ठेवणं. दोनजीवाची असतांना आईला भर उन्हात पराटी कापायला शेतात पाठवणं. तिथं वाईट नजर असलेल्या नराधमांचं एकटं पाहुन आईच्या मागे लागणं. तिचं जिवाच्या आकांतानं घराकडे धाव घेणं. पण सासूचं आळशी म्हणून पराटीनं झोडपून काढणं. उपाशी अंधाऱ्या धान्याच्या कोठरीत डांबून ठेवणं. मग पोटाला, गर्भाला लागलेल्या भुकेला शांत करण्यासाठी आईचं कच्चीच ज्वारी, मुंग तुरीची डाळ खाऊन पाणी पिऊन झोपून जाणं. खेड्याच्या कोणाचं आजोबाला आईची स्थिती कळवणं आणि आजोबा म्हणजे आईच्या बाबाचं पोलिसांना घेऊन येणं. कोर्टात खटला जाणं. अशातच झालेला माझा जन्म. बाबाची आईला घेऊन अकोल्यात वेगळं राहायची तयारी दाखवणं. माझी नाजूक प्रकृती पाहून आजोबा आजीजवळ शेगावला ठेवणं. एखाद्या राजकुमारी सारखा तिथला थाट,
'घरातील पहिलीच नात जणू सगळ्यांच्या डोळ्यांची वात.'
पण आईची आठवण येई. म्हणून माझी रवानगी आईजवळ होणं. अकोल्याच्या लक्ष्मी नगर झोपडपट्टीजवळ कुडाच्या एका खोलीत आईचा संसार मांडलेला. पाऊस आला कि पावसाचं पाणी कुडातुन आत येई. पाण्यासोबत साप, विंचू, गांडूळ, गोम हे जीव जंतूही आत येत. मग आई आम्हा भावंडांना पोटुशी घेऊन बाजीवर बसे अन बाबा बाहेरच असत.
1993 झिरो बजेट मधे कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत घेण्यात आलं. आम्ही नागपूरला राहायला आलो. पण संघर्ष संपला नव्हता. गाठीशी तिन मुलं, त्यांच्या शाळा 'आमदनी अठन्नी खर्च रुपैय्या' अशी परिस्थिती. आम्हा भावंडांचं एकच चप्पल वापरणं. अशात मुलगी परक्याचं धन. तिच्या शिक्षणावर जास्त पैसे खर्च न करता 10वि  बारावी झाली कि लावा लग्न, असे सल्ले आईबाबाला नातेवाईकांचं देणं. मन नसतांना आईबाबाचं मुलगा मुलगी असा भेदभाव करून मुलाला सायंस देणं आणि शिकवणींचा खर्च लागणार नाही म्हणून मुलीला आर्ट देणं. (पण त्यांना मी अजिबात दोष देत नाही. त्या परिस्थितीत त्यांनी केलं ते योग्यच. बाकी सायन्स काय अन आर्ट काय ज्याला पुढे जायचं असतं तो अंगुठा बहाद्दर राहूनही पुढे जातोच. हे सगळं लिहितांना ते दिवस आठवून दिवसभर रडली. वाटतं आईचंच आत्मचरित्र लिहावं. पण ते लिहितांना मी तिचं आयुष्य जगेन तेव्हा खरंच मी ते सहन करु शकेल का? जे तिनं सहन केलं?)
बस मी माझ्या लेखिका व्हायच्या स्वप्नाला तिलांजली दिली. मधली 4-5 वर्ष कविता सोडून मी काहीच लिहीलं नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. मला शिकवणी लावण्यात आली. लग्नाच्या बाजारात उभं करायची तयारी झाली. स्पर्धा परीक्षेसाठी समाज सुधारकांचा अभ्यास करतांना मनावर सुधारक विचारांचा चांगलाच पगडा बसला. मी मनाशी ठरवलं, लग्न त्याच्याशीच करेल जो हुंडा घेणार नाही आणि लग्नाआधी एड्सची चाचणी करायला तयार होईल.
मी दिसायला सडपातळ, नाकीडोळी नीटस, गौरवर्णीय. एकदा मला पाहायला आलेल्या पटवारी मुलाला मी आवडली. उलट त्यानंच विचारलं मध्यस्थीला कि मुलीला मी आवडलो कि नाही विचारा. बस आता इथंच आपलं दानापाणी असं वाटलं. पण त्याच्या बाबाची हुंडा मागणी 3 लाखाच्या वर. माझी सटकली. एकतर ते हुंडा घेणार. लग्नाचा खर्च माझे आईबाबा करणार आणि उद्या मी नोकरीला लागली तर माझ्याकडून पाई पाई चा हिशोब घेणार. वरून माय बापाला काही देत तं नाही म्हणून लक्षही ठेवणार. मी त्या पोराला मेसेज केला, "इतका हुंडा माझे बाबा नाही देऊ शकत. खरं म्हणजे हुंडा घेणाऱ्या मुलगाच नको मला. तुम्ही बाबासोबत बोला तुमच्या."
मग काय लग्नाआधीच असं म्हणणारी बायको करून घ्यायला हवं असलेलं काळीज त्यांच्याकडे नसेल बहुतेक. म्हणून त्यानं त्याच्या बाबाला माझा मेसेज दाखवला. त्यांनी मामाला सांगितलं, "इतकं बोलणारी मुलगी आम्हाला नको." जे होते ते चांगल्यासाठीच असं म्हणून आम्ही पुढे पाऊल टाकलं.
मग आमचे हे, आईच्या आत्याबहिणीचा मुलगा म्हणजे नात्यातच असलेले पण कधी भेट न झालेले, पुण्याला नोकरी सोबतच मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा करत असलेले विनोदराव सहपरिवार मला पाहायला मामाच्या घरी आले. त्यांना फक्त लग्ना नंतरही नोकरी करणारी मुलगी हवी होती. आधल्या दिवशी मित्राचं लव्ह मॅरीएज लावून रात्री उशिरा झोपल्याने लाल झालेले डोळे पाहुन वाटलं, "दारुड्या आहे कि काय?" माझ्या मनातलं हेरून त्यांच्या मामानं मित्राच्या लग्नाबद्दल सांगितलं.
मोठ्यांचे बोलून झाल्यावर मी म्हटलं मला एकट्यात बोलायचं आहे. मामाचा लहान मुलगा पाळण्यात झोपला होता आणि आम्ही दोघं.
"मला इतक्या लवकर लग्न नाही करायचं. कारण 8 हजार पगार आहे. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर वाढणार आहे. मी आईबाबाला नाहीच म्हटलं होतं इथे येण्यासाठी. पण त्यांच्यापुढे माझं चाललं नाही. ही मुलगी पाहायची माझी पहिलीच वेळ आहे." साहेब  सांगून मोकळे झाले. खूपच इनोसेंट वाटले. वाटणारंच 24 वर्षाचे होते त्यावेळी ते.
"मग काय विचार आहे?" मी विचारलं, "लग्न करणार कि नाही."
"तुम्हाला कोण नाही म्हणणार लग्नाला. फक्त पुढल्या वर्षी करु."
"बरं तंबाखू, बिडी, गुटखा खाता का?" माझा प्रश्न
"नाही, पण तुम्ही म्हणणार तर खायला सुरवात करतो." नावाप्रमाणेच विनोदचं विनोदी उत्तर.
"दारू पीता?"
"न्यु इयर आणि मित्रांसोबत कधीतरी."
मला माझंच हसू येत होतं. "आणखी काही?"
"नको!" अनावधानाने तोंडातून निघालं. एक मन म्हणालं अगं एड्स चाचणी राहिली ना. दुसरं म्हणालं, काही गरज नाही. मुलगा चांगला आहे. गमावू नको.
मला ते बस 9 महिन्यांनी लग्न झालं. पण कसोटी संपली नव्हती. मला दिवस गेले.मला चौथा महिना सुरु असेल साहेबांची नोकरी गेली कारण कंपनी डुबली. जवळ जमवलेला सगळा पैसा साहेबांनी लग्नात खर्च केलेला. कठीण काळ. ह्यांचे भाऊ बाबा शेतकरी. त्यांना मागणं बरं नाही वाटलं आणि लग्नानंतर आईबाबाला पैसे मागणं मला ठीक वाटत नव्हतं. माझी खूप चिडचिड व्हायची. कधी कधी नको ते बोलून जायची. पण साहेबांनी निभावून नेलं आणि नोकरी जाऊन 2 महिने पूर्ण होत नाही तो साहेबांना दुसरी नोकरी मिळाली. पण वेगवेगळ्या शहरात जाऊन बोरवेल मशीनची सर्व्हिसिंग करायचं काम म्हणजे यांचा जॉब. मला विचारलं,
"काय करु?"
"मी म्हटलं आलेली संधी गमवू नका. मी माझी काळजी घेईल."
नागपूरला ट्रीटमेंट सुरु होती त्याच डॉक्टरला पुण्याच्या आमच्या एरियातल्या डॉक्टरची माहिती मागितली. एकटीच ऑटोने  डॉक्टर कडे दाखवायला जायची. मला 8 वा महिना सुरु असतांना साहेब 10 दिवसांसाठी बंगलोरला ट्रेनिंगसाठी गेले. 8 वर्षा सारखे गेले ते दिवस. पण गेले. एक महत्वाची बाब शिकली,
"एकदा आपण असलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला कि सगळं सोपी होतं."
मुलगा होऊन 3-4 महिने झाले. माझ्याकडून घरात बसणं होईना. सरकारी नोकरी मिळवायचा विचारही डोक्यातून काढून टाकला. मिळेल तो जॉब करायचं ठरवलं. एका construction ऑफिसमधे ऍडमिनचं काम मिळालं. पगार अर्थातच खूपच कमी होता. पण अनुभवासाठी मी ते मान्य केलं. दादाची मुलगी लहानच म्हणून आई माझ्याजवळ येऊ शकली नाही आणि जाउचा मुलगा दूधपीता त्यात शेतीची कामं म्हणून सासू नाही येऊ शकल्या. साहेबांशी चर्चा करून मन घट्ट केलं आणि टाकलं पोराला पाळणाघरात. सकाळी लवकर उठून दोघं नवरा बायको मिळून सर्व कामं करुन 9 वाजता आपापल्या ऑफिसला जायचो. सुरवातीला काही दिवस खूप त्रास झाला. कधी कधी भांडणं पण झाली आमची. पण शिकलो हळूहळू एकमेकांना सांभाळायला. प्रत्येक क्षण आनंदात जगायला.
माझं शिक्षण पाहुन ऑफिसमधे सर्व म्हणायचे, तुला हा जॉब शोभत नाही. अभ्यास कर, स्पर्धा परीक्षा दे. मी यांना सांगितलं. हे पण म्हणाले,
"बरोबर बोलतात ते अर्चू. मलाही तसंच वाटतं. पण तुला असं नको वाटायला पाहिजे कि मला पैसे हवेत. म्हणून मी नाही बोललो तुला. (खरंच बोलले साहेब. मला कधी काय उलटं लागेल काही खरंच नाही बाबा. But don worry आता स्वभाव खूप शांत झाला बरं माझा.) बघ तुझ्याकडे शिक्षण आहे आणि वेळ पण आहे. दे तु परीक्षा. मलाही आता चांगला पगार मिळतोय. मी करेल सर्व खर्च."
"हो आणि आपल्याला मस्त फिरता पण येईल. मला काश्मीर पासून कन्याकुमारी सगळं फिरायचं आहे." (मरायच्या आधी जग फिरून घ्यावं ही माझी प्रबळ महत्वाकांक्षा आहे.)
"प्रॉमिस, तुला सरकारी जॉब लागल्यावर वर्षातून दोन वेळा फिरायला जायचं."
मी जिद्दीनं अभ्यासाला लागली. खूप कमी लोकांना दुसरी संधी मिळते जी मला मिळाली होती. मला तिचं सोनं करायचंच होतं.
आमच्या नवरोबानं खूप मोठं मन केलं खरंच. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. कारण मला निश्चिन्त होऊन अभ्यास आणि क्लास करता यावा म्हणून आईकडे माहेरी 6 महिने राहू दिलं. तेव्हा आजूबाजूचे आईला विचारायचे सगळं ठीक आहे ना अर्चूचं? पण एक वर्षानंतर जेव्हा आईकडेच ऑफर लेटर आलं तेव्हा सगळ्यांना उत्तर मिळालं आणि माझी जिद्द सफल झाली.
जॉब लागला तेव्हा पासून दर सहा महिन्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे साहेब मला नवीन जागी फिरायला नेतात. आतापर्यंत कोकण, पंचमढी, मैसूर उटी, महाबळेश्वर, शिमला मनाली फिरून झालं. या वर्षी दुबई वारी ठरली होती पण कोरोनामुळे सध्या घरीच सगळ्या वाऱ्या सुरु आहेत.
माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. मला वाटतं आपण जेव्हा स्वतःला आनंदी करतो तेव्हा आपण इतरांना दुपटीनं सुख देऊ शकतो.
आयुष्याला सफल करण्यासाठी मी खूप पुस्तकं वाचते. त्यात दी सिक्रेट, शिव खेडा यांचं यु कॅन विन, रॉबिन शर्माची पुस्तकं विशेष. वाचाल तर वाचाल या उक्तीवर माझा विश्वास आहे.
समाजाला आपलं देणं आहे. म्हणून सामाजिक लेख / कविता लिहून समाजाला, बंधू भगिनींना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करते.
तसं स्वतःबद्दल सांगण्या सारखं खूप आहे. पण ती उंची अजून गाठली नाही असं वाटतं.
माझं शिक्षण : मास्टर ऑफ लेबर स्टडीज, नागपूर
मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, नागपूर
मास्टर ऑफ कॉउंसिलिंग इन मेंटल हेल्थ, महर्षी कर्वे सोसिअल इन्स्टिटयूट,पुणे(स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि गरजूंना चांगल्याने मार्गदर्शन करु शकतो, कॉउंसिलिंग करु शकतो असं मला वाटायचं. म्हणून लग्न झाल्यावर मधल्या काळात सहा महिन्याचा हा कोर्स केला. कोर्स केल्यावर manasvardhan या rehabilitation center मधे ऍडमिन म्हणून रुजू झाली होती. पण एक महिना पूर्ण होत नाही तो आताच्या नोकरीचं ऑफर लेटर आलं. पण तिथंला अनुभव मला खूप काही शिकवून गेला. तेव्हा पासून मी दसरा दिवाळीला अशा रिहॅब सेंटरला तिथल्या माणसांसाठी मिठाई घेऊन जाते. तसेंच कोणी वाईट वागलं तरी त्याचा मानसशास्त्रीय अँगल शोधायचा प्रयत्न करते. हे तुम्हाला माझ्या लेखणीतही दिसून येईल.)
बाकी सद्य परिस्थितीत सगळं अगदी छान आहे. आता साहेब एका नामांकित construction कंपनीमधे मशिनरी  ऑफिसर म्हणून जॉब करतात आणि मी सरकारी जॉब करते आणि आमचं एक पिल्लु आहे. वेळातला वेळ काढून लिहिते आणि माझं लेखिका बनायचं स्वप्न पूर्ण करतेय.😇
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार

#miarchanasonagre.blogspot.com
(सदरचे लेखन  कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून  लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

शहरची सून (भाग 5 आणि सहा )

मिराला अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात एका सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपरचा जॉब मिळाला. ती चेहऱ्यावर दाखवत असली तरी मनातून आनंदी नव्हती. हे तिच्या बाबांना समजत होतं. पण यापुढे मीरालाच तिच्या आयुष्याबाबत निर्णय घेऊ द्यायचं त्यांनी ठरवलं.
इकडे सुधाला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. आनंद रोज आठवणीने तिला फोन करी. ती फक्त हो नाही इतकंच बोलायची. दोघंही मीराचा विषय काढत नव्हते. आनंदला समजलं होतं जे झालं त्यात फक्त सुधाचाच नाहीतर त्याचाही दोष होता. मग एकट्या सुधाला दोषी मानून तिच्याशी अबोला धरण्यात काहीच अर्थ नाही.
एका दुपारी सुधा अंगणात कपडे वाळू घालत असतांना उमा तिथं आली, "मानावं लागल जाऊ बाई तुमाले. त्या शहरच्या पोरीले औकात दाखूली तुमी."
"उमा जा तु."
"आवं म्या तं.... "
"काय म्या तं. लावली तेवढी आग पुरे."
"आवं म्या कई आग लावलिया. आसं काय करतुया? म्या तं आनंद साठी माया बहिणीच्या वन्सच्या पोरीची गोठ सांगाया आली बगा. तुमी म्हणाल तसंच करिन बगा ती. उठ तं उठ अन बस तं बस."
आता मात्र सुधाचं डोकं सरकलं.
"उमे अजून एक शब्द काढला ना तोंडातून जीभ कापून टाकीन पावशी नं तुई. तुले सासूबाईचं शेत पायजे ना वं. बरं हे घरी आले कि वकिलाले बोलावून करून देतो माय." सुधानं तिचे दोन्ही हात जोडले,"पण आता बस कर माय हे आग लावणं. लय मोठा घोळ केला म्या तुय डोक्यात धरून. लय चुकली..... " सुधा दार लावून रडू लागली.
"का वं सुधा काय झालं वं? काऊन रडतं वं तु? आनंद बरा हाय ना? " सुधाच्या सासूनं विचारलं.
"हो बरा हाय तो. असंच जरा माया मायची आठून झाली."
"ये माया मांडीवर डोकं ठेव. दाबून देतो." सासू सुधाचं डोकं मांडीवर घेऊन दाबू लागली,"लय करतं वं तु साऱ्याईच. म्हून तं तुले सून बी लय गुणाची भेटली वं. मा म्हातारीचा गु धुऊन देते तं तुई तं लई सेवा करिन वं ते." सुधा मीराच्या आठवणीनं अजून मुसुमुसु रडत होती आणि सासू बोलतच होती, "लय दिवस झाले नं. बोलावं त्या दोघाईले इकडं. पा वाटत हाय मले. कधी मरीन मा काई भरोसा नाई आता."
सुधाच्या डोक्यात सासूचं बोलणं घुमत होतं. रोजच्या सारखा रात्री आनंदचा फोन आला,
"तब्येत कशी आहे आई."
"चोवीस तासात काय होणार बा माया तब्येतीले. पण मा आईकनार तं चांगलं वाटीन मले."
"बोल."
"तु मीराले परत आन. काय बी कर पण परत आन त्या पोरीले. म्या लय चुकली."
"आई सोड तो विषय. मी माफी मागितली होती. नाही आली ती. तिच्या बाबाशी बोललो. तशीही खूप दूर गेली ती आता."
"म्हणजे? काय झालं, कुठं गेली ती?"
"अमेरिकेत गेली नोकरीसाठी. तिला नाही गं माझी गरज. मग तु का स्वतःला दोष देतेस."
"नाही रं बाळा तशी नाई ति पोर. तिच्या मनात फक्त तुनं तिच्यावर हात उचलल्याचा राग हाय. तो तिले दूर ठेऊन रायला तिले तुयापासून. गरज नसती तुई तं तिकडं जा च्या आंदी घटस्फोट नसता घेतला का तिनं? मोकळी हुन गेली असती नं बा ती. मा साठी एकदा प्रयत्न कर. तिच्या बाबाशी बोल. भेट घरी जाऊन."
आनंद मीराच्या बाबाला भेटायला त्यांच्या घरी गेला. थोडयावेळ आधीच सुधानं विनवणी करून आनंदच्या बाबाला मीराच्या बाबाला फोन लावून मागितला आणि त्यांना मुलाला एक संधी द्यायची याचना केली होती. म्हणून ते आनंदसोबत बोलायला तयार झाले. त्यांनी मीरा कायमची अमेरिकेत स्थायिक व्हायला गेल्याचं आनंदला सांगितलं.
"मीराचा नाद सोड. तिची मनःस्थिती नव्हती म्हणून नाहीतर तिला घटस्फोट घेऊनच पाठवलं असतं अमेरिकेत."
"मान्य आहे मी चुकलो. पण एकच संधी द्या. मीराचा पत्ता सांगा. मी ती म्हणेल तसाच वागेल."
"ठीक आहे. तिच्या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर मॅनेजरची पोस्ट खाली आहे. अप्लाय कर. तुला जॉब मिळून जाईल. पण कंपनीची अट आहे. जॉब लागल्यावर 2 वर्ष तुला भारतात परत येता येणार नाही. अट मान्य असेल तर सांग. कंपनीचा ओनर माझ्या ओळखीत आहे. तुला नोकरी मिळून जाईल."
आनंदला समजलं होतं कि ही 2 वर्षाची अट मुद्दाम ठेवण्यात आली आहे. पण 2 वर्ष आई बाबाला न भेटता जगणं खूपच कठीण होतं त्याच्यासाठी.
आनंदने सुधाला फोन करून अटीबद्दल सांगितलं. "आनंद मरेस्तोवर तु नाई दिसला तरीबी  चालल. बस सुखात असल्याची खबर भेटली मंजी झालं. जा बाबा तु. झालेलं पाप मले झोपु नाई द्यून रायलं."
आनंद अमेरिकेत मीराच्याच ऑफिसमधे रुजू झाला. तिथं त्यांच्याशिवाय आणखी कोणाला त्यांच्या नात्याबद्दल माहिती नव्हतं. पहिल्याच दिवशी आनंदने 2-3 वेळा मीरासोबत बोलायचा प्रयत्न केला. पण तिनं त्याला प्रतिसाद दिला नाही उलट त्यांची कलीग नीया आनंदकडे आकर्षित झाली. त्याच्याशी बोलायचे बहाणे शोधू लागली. आनंदला काय करावं समजेना. लंच करतांना नीया आनंदजवळ येऊन बसे. काही दिवसांनी आनंदला कळलं कि नीया भारतीय कुटुंब पद्धतीचा अभ्यास करत आहे. तिला भारतीय संस्कृतीचे खूप आकर्षण आहे. म्हणून तिला एका भारतीय मुलाशीच लग्न करायचं आहे.
इकडे जिला मानवायला तो 2 वर्षांचा बॉण्ड करून अमेरिकेत आला ती हुंगतही नव्हती आणि दुसरी हात धुवून मागे लागली. शेवटी त्यानं मीराचा पिच्छा सोडला अन नियाशी मैत्री केली. दोघंही मस्त फिरू लागले. ऑफिस मधे जास्तीत जास्त वेळ दोघं सोबत दिसायचे. त्यांना पाहून काहींनी निया लवकरच भारताची सून होणार अशी बातमीही पसरवली. मीराला फरक पडत नाही असंच ती दाखवत होती.
त्या दिवशी नियाचा वाढदिवस होता. ऑफिसमधे केक कापण्यात आला. नियानं पहिला घास आनंदला भरवला आणि म्हणाली, "आय लव्ह यु आनंद, विल यु मॅरी मी?"
आनंदने एक नजर मीरावर टाकली. तिचा चेहरा रागानं लाल झाला होता. पण अजूनही ती काहीच बोलत नव्हती. तिच्याकडे पाहतच तो म्हणाला,
"यस आय विल मॅरी विथ यु."
"हो कर तिच्याशी लग्न. पण आधी माझ्यापासून घटस्फोट तर घे. तुझ्यासारखा नालायक माणुस नाही पाहिला मी. माझ्या बाबांना सांगून आला इथं मला मानवायला आणि पटवलं दुसरीलाच. मी बघतेच तु कसा लग्न करतो हिच्याशी."
सगळे स्तब्ध होऊन पाहू लागले. नियानं इशाऱ्यानं सगळ्यांना हॉल मधून बाहेर पडायला सांगितलं.
"का करु नाही मी दुसरं लग्न? तु अशी अडून बसली. तुला माहितेय दोन वर्ष नाही भेटणार आईला हे माहित असतांना तिनं मला इथं पाठवलं. तुझ्या पुढे हात पाय जोडले. अजून काय पाहिजे यार?" आनंद खाली बसून दोन्ही हाताने चेहरा झाकून रडू लागला.
"सॉरी !" मीरा त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "मी खूप जास्त हर्ट झाली होती. लग्नानंतरची सगळी स्वप्न तुटली आणि त्यात तुझी थापड. हृदय कठोर झालं होतं माझं. मी खूप तडपली तुझ्यासाठी म्हणून तुला तडपतांना पाहिलं कि बरं वाटे. पण आता खरंच पुरे हे सर्व. मी देते तुला घटस्फोट. निया छान मुलगी आहे. तुमचा संसार छान होईल बघ."
"हो का." निया हॉलमधे येऊन म्हणाली, "माझा मुळीच मन नाही हं एका विवाहित माणसाशी लग्न करायचं."
"काय? मग... "
"मग काही नाही. तुझं प्रेम बाहेर यावं म्हणून नाटक केलं आम्ही. मी क्रश झाली होती आनंदवर. पण त्यानं मला स्पष्ट सांगितलं कि मी  सर्वस्वी मीराचा आहे. मी म्हटलं चला मग राम सीतेचं मिलन करून देते."
"थँक्यू निया!" मीरानं तिला मिठी मारली.
"हे असं कोरडं थँक्यू नाही चालणार. मुलगा शोधून दे माझ्यासाठी चांगला, इंडियन."
सर्व हसले. आनंदच्या आयुष्यात आनंदी आनंदगडे झाला. नियाची बर्थडे पार्टी वरून मीरा आणि आनंद घरी जात होते. मीराच्या बाबांचा कॉल आला.
"हा बाबा."
"कुठे आहेस? फोन का नव्हती उचलत."
"आनंद सोबत." मीरा लाजतच उत्तरली.
"बरं झालं. आनंदची आजी सिरीयस आहे. तुम्ही दोघं निघून या. तिकिट्स डिटेल्स पाठवल्या आहेत मेल चेक कर. ओके."
"हो बाबा निघतो आम्ही. आनंदशी बोला."
दोघंही गावाला आले. आजीला खाली टाकलेलं होतं. आनंद आणि मीराला पाहताच आजीच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. बाबानं आनंदला आजीला पंचामृत पाजायला दिलं. पंचामृत पिऊन मीराच्या डोक्यावर हात ठेऊन आजी गतप्राण झाली.
तेरवी वगैरे सगळं पार पडलं. मीरानंही घडलेल्या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडलं. काही दिवस आनंदात राहून दोघंही परत नोकरीसाठी पुण्याला गेले. आताही आनंद सुधाशी एक अर्धा तास बोलायचा. पण हप्त्यातून एकदा. आणि सुधाही त्याला नेहमी नेहमी तेच तेच विचारत बसत नव्हती. तसंच सुधानं स्वतःहुन आजीच्या हिश्याची अर्धी शेती उमाच्या नावावर केली. काही लोकं सुधरत नाहीत. त्यापैकीच एक उमा. ती सुधाला म्हणाली,
"तुया शहरच्या सुनेनं सुधरवलं तुले. नायतं तु कसाची शेत देतं मले."
सुधा फक्त स्वतःशी हसली. बाकी तिनं मनावर काहीच परिणाम होऊ दिला नाही.
समाप्त
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कुठेही प्रस्तुत किंवा प्रकाशित करण्यासाठी लेखिकेची परवानगी अत्यावश्यक आहे. कथा copyright नियमांतर्गत येते. 

शहरची सून (भाग 3 आणि 4)

आनंद आणि मीरा पुण्याला राहायला गेल्यावरही सुधाची त्यांच्या नवीन संसारात लुडबुड सुरूच होती. ती रोज रात्री आनंदला फोन करी अन अर्धा एक तास बोलत बसे. एकच गोष्ट 10 वेळा सांगे आणि एकच गोष्ट 10 वेळा विचारे. बिचारा आनंद दिवसभर ऑफिसवर्कमुळे थकून जाई. 7-8 च्या सुमारास घरी येई. प्रेमाचे दोन शब्द मीरासोबत बोलणार तो सुधाचा फोन येई. अन हा तिला वाईट वाटेल म्हणून बोलतच बसे. मीरा जेवणासाठी वाट पाहत राही. परिणामी त्यांच्यात नीट संवाद होत नसे. त्याला मीराला वेळ नाही देऊ शकत याची जाणीव होती. मानसिक थकव्यामुळे आनंद मीराला हवं तसं सुखही देऊ शकत नव्हता. त्याला खुप गिल्टी फील व्हायचं. एकदा तो मीराला मनालाही,
"माफ कर. तुला नीट वेळ नाही देऊ शकत आहे. एकटाच होतो ना आधी. रोज घरी आलो कि आईला फोन करून गप्पा मारायचो. आता तिला सवय झाली आहे.पण फक्त काही दिवस दे. आईची फोनवर बोलायची सवय कमी होईलच हळू हळू."
मीराने हसून मान हलवून त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पण 15 दिवस झाले, एक महिना झाला. मीरा कंटाळली. एक तर शुभ मुहूर्त नाही अशी सबब सांगून सुधाने आनंदला हनिमूनला जाऊ नाही दिलं आणि आता हे असं रोज रात्रीचं बोलत बसणं. शेवटी मीरानं आनंदला, सुधालाच  पुण्याला घेऊन यायची कल्पना दिली. मीराला वाटलं सुधा सोबत राहायला आली म्हणजे आनंद खुश होईल. सुधा सोबतच राहील तर रात्रीचं फोनवर बोलणं बंद होईल. मीरा आणि आनंदच्या नात्याला फुलायला वेळ मिळेल.
सुधा पुण्याला आली. मीरा आणि आनंद ऑफिस मधून आले कि दोन दिवस तिनं स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून दोघांना खाऊ घातला. आनंद सुधाचं गुणगान करता करता न थके. जेवण झालं कि थोडं बोलून चालून दोघंही आपल्या खोलीत झोपायला जात. दोन रात्री छान गेल्या. तिसऱ्या रात्री मात्र आनंद आणि मीरा झोपायला गेले. 15 मिनिट होत नाही तो दारावर थाप पडली.
"मला झोपच नाही येत आहे आनंद. खुप बेचैन वाटतेय." सुधा अगदी घाबरा घुबरा चेहरा करून म्हणाली. आनंद मीराला लगेच येतो असं सांगून सुधासोबत तिच्या खोलीत गेला. तिचे पाय दाबून दिले, डोकं दाबून दिलं. तिच्याशी बोलता बोलता त्याला तिथंच झोप लागली. मीराने येऊन बघितलं. 4-5 दिवस असंच चाललं. मीराला काही कळत नव्हतं कि सुधा अशी का वागतेय? तिला खूप फ्रस्ट्रेशन येऊ लागलं. पण तरीही तिनं गोडी गुलाबीनेच काटा काढायचं ठरवलं. एका संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मीरा सुधाला म्हणाली,
"आई, बाबा एकटे असतील तिथं. तुम्हालाही आठवण येत असेल ना त्यांची. आम्ही बघू आमचं. तुम्ही निश्चिन्त होऊन जा गावाला."
"काहीही नकोस बरळू मीरा. आई इथंच राहणार आपल्यासोबत जेव्हापर्यंत तिची इच्छा आहे राहायची."
"आरं आनंद नकु बोलू तिले काई. म्या गावंढळ बाय. तिले नाई पटून रायलं मा रायनं त जातो बा म्या. तसं बी लगीन झालं कि पोरगा बायकुचाच हुतो. मायचा नाई रायत हे भुलली व्हती म्या."सुधा शेम्बुड वळू वळू रडत बोलली, "नवरा हाय मले अजून. रायीन होईन तसं त्याले घेऊन. पण बा म्या मेली गेली तुया आठवणींत त डाग द्याले येजो. नाईतं तडपींन रं मा आतमा."
"तुम्ही का असं वागत आहे. पोराला पदराशी बांधूनच ठेवायचं होतं त लग्न का केलं त्याचं? ठेवायचं होतं तसंच." मीरा संतापून बोलू लागली.
"मीरा बस. आई रडत आहे. दिसत नाही तुला? गप्प राहा." आनंद तिला थांबवण्याचा प्रयत्न करु लागला.
पण मीरा शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हती. तिचं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर पडू लागलं, "लग्नाच्या पहिल्या रात्रीच तेच, आताही तेच. असं काय पाप केलं मी कि आपल्या दोघांना यांना वैवाहिक सुख घेऊ द्या वाटत नाही. आनंद नक्की तुमचाच मुलगा आहे ना.. .. " ति बोलली तशी सटकन तिच्या कानाखाली आनंदनं ठेऊन दिली. आता सुधाच्या काळजात आनंदाची लहर आली. पण ओठाशी आलेलं हसू तिनं तोंडावर हात ठेऊन लपवलं.
बिचाऱ्या मीराला विश्वास नव्हता होत कि तिच्यासोबत नक्की काय होतंय. तिनं काय विचार केला होता आणि लग्न झाल्यावर झालं काय? ती रडतच बेडरूम मधे गेली. दार आत मधून लावून घेतलं.
आनंदला त्याची चूक कळून आली. काहीही झालं तरी त्यानं मीरावर हात उचलायला नको होतं. तो मीराची समजूत काढायला जाणार तो सुधानं त्याचा हात पकडला,
"माया जीव लय धडधड करतुया. काय काय बरळली ही पोर? काई जाऊ नको तिच्याकडं. रडीन पडीन येईन धाऱ्यावर सकाळी बग."
रात्रभर आनंदचा जीव लागला नाई. त्यालाही समजत नव्हतं कि आपली इतकी मायाळू आई अशी का वागतेय?
सकाळी मीरा बॅग घेऊनच बेडरूम मधून बाहेर निघाली. चेहरा रडून रडून सुजला होता. डोळे लाल झाले होते.
"मीरा माझं ऐकून तर घे. मला नाही समजलं काय करावं ते. आणि मी तुला.... "
"पण मला समजून आलं आहे कि मी काय करावं."
"मला माफ कर."
"आरं तु काऊन माफी मागतोय. नवरा मारतच असतो बायकोला. तुया बा नं बी लई वेळा मारलं हाय मले."
"कारण मले ज्ञान नव्हतं. अडाणी होतो मी. लहानपणापासून माणसाइले बायकांना मारतांनाच पायलं म्या. पण जवापासून आनंद मोठा झाला कधी हात उचलला मी तुयावर. सांग मले." नवऱ्याला असं समोर पाहून सुधा चकित झाली. सुधा आनंदला बोलत होती तेव्हा दार वाजलं. मीराला माहित होतं कोण असणार ते म्हणून तिनं जाऊन दार उघडलं होतं.
"पण आता खरंच तुले चांगलं सुताचं मन होऊन रायलं मा." नवऱ्याचा संताप पाहून सुधा घाबरली. "आवं!"
"काय आवं? मीरानं सगळं सांगितलं राती फोन करून मले.सांग तु अशी काऊन वागली मीरासोबत. लगीन ठरलं तवा तं मोठी खुस होती तु. मंग हे असं अचानक काय झालं सांग. मा संताप वाढवू नको."
(मीरा तिच्या बाबालाच सांगणार होती. पण त्यांना तिला आपला निर्णय चुकला हा पश्चाताप होऊ द्यायचा नव्हता. म्हणून तिनं सासऱ्याला फोन केला. सासऱ्यात तिला तिच्या बाबाचीच झलक दिसत होती.)
"मले...." सुधाचा चेहरा पार रडावला, " मले वाटलं ती आपल्या गोडगोड वागण्या बोलण्यानं आनंद अन तुमाले मुठीत करिन अन मले एकटं पाडीन." मग तिनं गावात आनंदचं लग्न जुळलं म्हणून गुड वाटला होता त्या दिवशी उमा आणि इतर बायकांनी शहरच्या पोरीबद्दल बोललेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
"वा!" सासऱ्यानं कपाळावर हात मारला, "म्हणजे ती मंथरा काहीही बोलली अन तुनं कैकयीसारखं तिचं ऐकून त्यावर अंमल केलं."
"सासूबाई काही दिवस बघायचं तरी कि ही शहरची सून खरंच तशीच आहे का?"मीरा परत रडू लागली.
"मला माफ कर मीरा." आनंद मीराला कळवळून म्हणाला.
"काही गरज नाही मीरा." सासरा मीराला म्हणाला. मग आनंदचा कान धरून म्हणाला, "काय रे तुले तुई अक्कल नाई. शिकून सवरून वाया गेला."
"मी खूप टेंशनमध्ये आलो होतो बाबा."
"मंग जवा तुई माय हे सगळं करत होती तवाच तुनं मले सांगायचं होतं ना. इतकं महाभारत झालं नसतं."
"मी माफी मागतोय ना बाबा."
"त्यानं काहीच होणार नाही."
"मग सांगा तुम्हीच काय करु?"
"मीरा काय करायचं बाळ?"
"काहीच नाही बाबा. मला फक्त शांती हवी आहे. मी जाते बाबाकडे."
"ठीक आहे. मी तुला बाबाकडे घेऊन जातो. मग गावाला जातो. या दोघांना राहू दे इथंच."
"आवं म्या पापीण हाय. पाय पकडते तुमचे." सुधानं नवऱ्याचे पाय पकडले."म्हणाल तं मीराचे बी पाय पकडते."
"तसलं काहीच करु नका. गावाकडं यायचं असलं तर सांगा फोन करून. येईन म्या घ्याले."
"आनंदचं कसं?"
"तो पाहून घेईन त्याचं. आता लुडबुड बंद करायची त्याच्या संसारात."सासरा बोलला. सुधानं होकारार्थी मान हलवली.
आता आनंद आणि मीराचं काय झालं? तेच जे व्हायचं होतं. आनंदने तिची समजूत घालायचा खुप प्रयत्न केला पण आत्मसन्मानावर झालेला आघात इतक्यानेच मुळीच भरून निघणार नव्हता. आनंदला त्याची चूक कळावी म्हणून मीराने नोकरीसाठी अमेरिकेत जायचं ठरवलं. कारण खूपदा दूर गेल्यावरच व्यक्तीचं आयुष्यातलं महत्व कळतं. जरी आनंदची आई सुधा त्याला मीरापासून दूर ठेवत होती. त्याला स्वतःला योग्य आणि अयोग्य मधला फरक करता यायला हवा होता.
असो मग काय वाटतं आपल्याला काय होईल मीरा आणि आनंदच्या संसाराचं? सुधा काय करेल? आनंद सुधा सोबत आधी सारखाच वागणार कि आता त्याच्या वागण्यात फरक येईल? जे काही घडलं त्यात चूक कोणाची?
कथा इथंच संपवणार होते पण वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढे लिहिणार आहे. कथा कशी वाटली नक्की कळवा.
आता पुढे काय होईल? मीरा काय करेल? 
कथेचे पुढील भाग आणि आधीचे भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा. 
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

शहरची सून (भाग 1आणि 2)


सुधाच्या एकुलत्या एक मुलाचं, आनंदचं लग्न जुळलं. सुधाला गगन ठेंगणं पडल्यासारखं झालं. कारण येणारी सून दिसायला सुंदर,  मोठया घरची होतीच पण चांगली शिकली सवरली अन नोकरदार होती. नातेवाईकांत कोणाचीच अशी सून नव्हती. आनंदचा हट्टच होता, "लग्न करेल तर शिकलेल्या आणि नोकरदार मुलीशी. दिवसभर रिकामटेकडी राहणारी अन मी रात्री घरी परतल्यावर माझं डोकं खाणारी मुलगी मला नको." मीरालाही आनंद सारखा शहरात राहणारा मुलगा हवा होता. त्यांच्या समाजात शिकलेली मुलं कमी असल्यामुळे आनंदकडे पाहून बिन मायच्या मीराचा हात आनंदच्या हातात सोपवून मोकळं व्हायचं मीराच्या बाबांनी ठरवलं. आनंदच्या बाबांनी मीराला आपली मुलगी म्हणूनच वागवू असं आश्वासन दिलं. लग्न पक्क झालं. गावात गुड वाटण्यात आला. तशी आया बायांनी सुधाच्या अंगणात ओट्यावर गर्दी केली.
सुधा मोठया तोऱ्यात होणाऱ्या सुनेचा, मीराचा फोटो सर्व बायकांना दाखवत होती, "हाय ना एकच नंबर !"
"व्हय व्हय लय मस्त हाय." शेजारच्या सखूनं हमी दिली.
"चेहरा बी लय सालस हाय बग." माहेरी आलेली लता फोटो पाहून बोलली.
"म्या ऐकलं लई कमावते वं?" शांतीचा प्रश्न.
"हो." डोक्यावरचा पदर नीट करत सुधा गर्वानं उत्तरली, "मा पोरापरीस 5-6 हजार जास्त."
"मा तुई तं लॉटरिच लागली."
"आवं आपल्याला काय लोभ नाई कशाचा. पण पोरगं सुखात नांदन." सुधा मनोमन सुखावली, "चला द्या वं फोटो इकडे. दिट लावाल पोरीले." सुधा फोटो ठेऊन द्यायला घरात निघाली तो आतापर्यंत पान चघळत असलेली तिची देरानी उमा पचकन नालीत थुकली अन बोलली,
"शहरची सून येणार हाय हे नका विसरू जाऊबाई." सुधाचा पाय दारातच थबकला.
"हाव माय या शहरच्या पोरीं लय चालाक असत्यात बरं." सखूनं उमाच्या बोलण्याला दुजोरा दिला.
"मंग काय माया वन्सचं काय खेळणं केलं तिच्या शहरच्या सुनेनं माहित हाय ना." शांतीनं अजून फाटा फोडला.
"काय वं काय झालं तुया वन्स ले? मले बी सांग." उत्सहात लतानं विचारलं.
"अवं सगळ्या घरावर ताबा केला वन्सच्या शहरच्या सुनेनं. मा वन्सचं कोणी शब्द बी आयकत नाई." शांती सांगू लागली.
सुधाचा पारा चढला,"काही काम धाम हाय कि नाई तुमा पोरीले. चला जा व्हा आपापल्या घरी."
सगळ्या गप गुमान एकमेकींना इशारे करत तिथून उठल्या.
"पान खाता का?" उमानं पान पुढे करत सुधाला विचारलं.
सुधा काहीच न बोलता चरफडत घरात निघून गेली. उमाचं काम झालं. तिला जी आग लावायची होती ती तिनं लावली. आता वाट होती ती तिनं लावलेल्या आगीत कोणकोण कसं जळतं हे दिसायची.
सुधाच्या आनंदात विरजण पडलं. आतापर्यंत दिमाखात मिरवलेला मीराचा फोटो तिनं कपाटात फेकून दिला. तिच्या मनाची घालमेल सुरु झाली. एकुलता एक पोरगा. तो जर बायकोत अडकला तर आपल्याला कोण पाहणार? पोरगी नाही कि जिच्या घरी जाऊन राहू. अन नवरा ज्याला आपलं कधी काही पटलंच नाही तो तर सुनेचंच ऐकेल. पण आता करणार काय? लग्न तर 20-22 दिवसांनीच करायचं म्हणताहेत. शहरची सून आणून पायावर धोंडा मारतोय आपण आपल्या. ती चिंतातुर होऊन बसली नको ते विचार करत.
"सुधा वं ! आज पोराचं लगीन जुळलं तं उपाशीच ठेवणार का? रांधा बाई काई. भूक लागली मले." सुधाची सासू ओरडू लागली. 80 च्या घरात वय, जर्रर्र कांती अन एका हातानं अधू झालेल्या सासूची जबाबदारी सुधाने घेतली होती. म्हणून सासूनं सुधाच्या नावावर तिची 5 एकर जमीन करून दिली. त्याचाच रोष होता उमाच्या मनात. म्हणून कि काय सुधाला मनस्ताप देण्यासाठी ती सतत प्रयत्नशील असे.
"सुधा आवं आई आवाज देऊन रायली तवाची." सुधाचा नवरा तिला हलवून म्हणाला, "सून येईन म्हणून आराम घ्यायची सवय करु नको. ति इथं नाई राहणार हाय आपल्याला आयतं खाऊ घालायला. पाहुण्यासारखी राहीन अन जाईन. उलट तुलेच तिले रांधून खाऊ घाला लागन बग."
सुधा नवऱ्याचं बोलणं ऐकून अवाक झाली. सून आली कि सासूनं आरामात खायचं असतं. असं म्हणणारा अन लग्न झालं तेव्हापासून मायला एकाही कामाला हात न लावू देणारा नवरा तर आताच उलटं बोलायला लागला. अजून तं त्या शहरच्या बयेनं उंबरठा पण ओलांडला नाई.
(हे असं होतं जेव्हा आपण कोणाचं नको ते बोलणं मनावर घेतो. मंथराचं बोलणं मनावर घेऊन कैकयीनं एकाप्रकारे स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेतला होता. इकडे नवरा मेला अन तिकडे पोराचा रोष सहन करावा लागला. इतकं रामायणात दाखवूनही आपल्या हे लक्षातच येत नाही, "कुछ तो लोग कहेंगे, लोगोका काम है केहना!")

आनंदला हळद लागली. त्याचे मित्र त्याला मीराच्या नावाने चिडवू लागले. तोही लाजेनं लाल होऊ लागला. त्याच्या मनातही लड्डू फुटू लागले. सुधाला मात्र हे सर्व पाहून खुप राग आला.
"बस!" ती जोरात ओरडली. सर्व आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागले.  तशी ती भानावर आले. नरमुन म्हणाली, "आरं पोरांनो झोपा तुम्ही अन त्याला बी झोपु द्या. आराम करु द्या माया लेकराला."
"हो रे बाबा उद्या पासून याची नवीन ड्युटी सुरु होणार ना." शरद डोळा मारून म्हणाला. तसा सुधाने एक तीक्ष्ण कटाक्ष त्याच्यावर टाकला. बिचारा उठून सर्व पोरांना झोपायला घेऊन गेला. इतर पाहुणे मंडळीही जागा मिळेल तिथं पेंगली. बाबा गच्चीवर बसून परत एकदा लग्नाच्या सर्व तयारीचा आढावा घेत होते. उरले फक्त आनंद आणि सुधा !
"आई बस इथं माझ्याजवळ."
"नाई बाळ झोप तु. मी आजीले पाऊन येते."
"आई," सुधाचा हात हातात पकडून म्हणाला, "मला समजतेय गं. काहीतरी बिनसलंय तुझं. सांग पाहू काय झालं ते!"
"आरं असंच मनात येतं कि तुया बाबानं माय काई आईकलं नाई कवा. पण तु झाला अन मले आधार मिळाला. मा काई शब्द कईचं पडू नाय देला तुनं. म्हणून काळीज धडधड करतंय कि आता बायको आल्यावर तु तिचंच आईकणार. मी परत एकटी पडून जाईन." सुधाचे डोळे ओलावले.
"बस इतकंच !" तो हळहळला. सुधाचे दोन्ही हात हातात घेऊन तिला म्हणाला, "मी वचन देतो तुला. माझ्या आयुष्यात पहिला मान सदैव तुझाच राहीन." हे ऐकून सुधाच्या अशांत मनाला थोडी शांतता मिळाली.
आनंद आणि मीराचं लग्न मोठया थाटात पार पडलं. आनंदला नोकरीवर लवकर रुजू व्हायचं होतं म्हणून सत्यनारायणही लवकर करण्यात आला.
ती आनंद आणि मीराची पहिली रात्र होती. आनंदची खोली फुलांनी सजवली गेली. मीराला छान तयार करून खोलीत बसवून ठेवले. मग आनंद आला. दोघांची नजरा नजर झाली. आनंद मीराला असं पाहण्यासाठी आतुर झाला होता.
"अजून किती वेळ असा पाहतच उभा राहणार दरवाजात?" मीराने खट्याळ हसून त्याला विचारलं.
"आयुष्यभर!"
"ओके! मग झोपते मी." ती पलंगावर आडवी होत बोलली.
"काय?" तो तिच्याजवळ आला, "हे असं चालणार नाही."
"मग काय चालणार?"
त्यानं अलगद त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. मीराला तो आलिंगणात घेणार तोच खोलीचं दार वाजलं.
"दादा जरा बाहेर ये." आनंदची मामेबहीणने त्याला आवाज  दिला. त्याला वाटलं मुद्दाम त्रास देतेय.
"ए झोप गं. उद्या देतो तुला काय हवं ते." आनंद मोहक नजरेनं मीराला पाहत बोलला.
"अरे आत्या बोलवत आहे. तिला धडधड होतंय." आईची तब्येत ठीक नाही हे ऐकताच तो पलंगावरून उठला. कपडे सावरून दार उघडलं आणि सरळ सुधाजवळ गेला. मागोमाग मीराही गेली. सुधा एक हात डोक्याला, दुसरा हात छात्याला लावून भिंतीला टेकून बसलेली होती.
"आई तु ठीक आहेस ना? बाम देऊ का चोळून? " आनंद नं काळजीनं विचारलं.
"आरं तु काऊन आलास? त्या पोरीले का वाटन?"
"काही नाही वाटणार मला." आनंदकडे पाहून मीरा बोलली, "मी डोकं दाबून देते. छान वाटेल तुम्हाला." मीरा अन आनंदची गोड नजरानजर सुरूच होती.
"मले मा पोरगा पुरे आहे." सुधा तोडून बोलली. मीराला तिचं असं बोलणं खटकलं. पण ती काही बोलायच्या आधीच आनंदनं गोष्ट सावरून घेतली.
"अगं आईच्या म्हणण्याचा अर्थ आहे कि तु नाजूक तब्येतीची. थकली असशील. जाऊन झोप. आईला झोपवून येतो मी." नवऱ्याचं असं लाघवी बोलणं ऐकून मीरा आपल्या खोलीत जाऊन लोटली. पण त्या फुलांनी सजवलेल्या बेडवर तिला (एकटीला ) काही झोप येईना. ती चातकासारखी बेचैन झाली. पण करणार काय? त्यात नवीन जागा. कशीतरी थोडावेळ मोबाईलवर टाईमपास केल्यावर तिला आपोआप झोप लागली. पण लाईट गेल्यानं लवकरच तिला जाग आली. आनंद झोपला का पाहायला खोली बाहेर पडली. सुधाच्या खोलीचं दार लावलेलं होतं. असं रात्री दार वाजवून झोप खराब करणं तिला ठीक वाटलं नाही. ति तिच्या खोलीकडे परत निघाली.
"आवं सुधा वं. संडास झाली वं. धून दे." मीराची आजोळ सासू सुधाला आवाज देत होती. मीरा आवाजाच्या दिशेने गेली. आजोळ सासू संडासात बसून होती. एक हात अधू असल्यानं तिला काही शी धुता येईना. म्हणून ति सुधाच्या नावानं ओरडत होती.
"कोण हाय वं." मीराच्या पावलांचा आवज ऐकून आजीनं विचारलं.
"आजी मी मीरा, आनंदची बायको." साडीचा पदर कमरेला खोचून, दोन्ही पायात मिऱ्या दाबून मीरा बोलली, "मी देते शी धुवून."
मीराने आजीची शी धुतली. हातपाय धुवून दिले. त्यांना बेडवर झोपवलं. मग संडासात चांगलं पाणी टाकलं. स्वतः हातपाय धुतले अन खोलीत जाऊन झोपली.
सकाळी सातच्या सुमारास दारावर थाप पडली. मीरा गडबडीत उठली. "सॉरी आनंद ते पहाटे पहाटेच डोळा लागला माझा. रात्रभर झोपच नाही आली बघ."
"का बरं?"
"तूझ्याशिवाय एकटं वाटत होतं."
"खरंच."
आनंदनी तिला आलिंगणात घेऊन विचारलं.
"इश्श आनंद!"
"आनंद!" आनंदच्या बाबानी त्यांना बोलावलं.
"तु ये तयार होऊन. मी जातो." मीराला सांगून तो बाबाकडे गेला "हो आलो बाबा !"
आजी बाबाजवळच बसून होती. डोळे घळघळ वाहत होते. "आजीची तब्येत नाही का बरोबर."
"आरं नाई. म्हातारी खुश हाय. मले आताच सांगितलं तिनं राती काय झालं ते समदं."
"काय?" आनंदनं गोंधळून विचारलं.
"काय म्हणजे? मीरानं सांगितलं नाई तुले."
"ते रात्री आईला बरं नव्हतं वाटत म्हणून मी आईजवळ आलो होतो झोपायला."
"काय? लगीन झाल्यावर पयली रात आन तु आईकडं येऊन झोपला !" बाबाचं डोकं सरकलं, "आरं काई अक्कल हाय कि नाई तुले आन तुया मायले. तब्येत ठीक नोती तं मले बुलावाचं होतं ना. ति पोर रातभर जागी आसन. तरी तिनं आजीची सेवा केली."
"बाबा रागावू नका. मी फक्त नडलेल्या आजीची मदत केली." मीरानं गोष्ट सावरण्याचा प्रयत्न केला.
पण आनंदच्या बाबानं सुधाला सूने (मीरा) समोर चांगलं झापलं. आजोळ सासूची सेवा केली म्हणून खुप प्रशंसा झाली मीराची. छटाकभर गाव. त्यात कोणतीच गोष्ट पचेना. "पहिल्या रात्री सुधानं पोराला नव्या नवरीसोबत झोपु नाही दिलं अन तरी त्या शहरच्या सुनेनं आजोळ सासूची शी धुवून दिली अर्ध्या रात्री." हे गावभर झालं.  पुढे मीरा आणि आनंद असेपर्यंत हेच चाललं गावात. ज्यानं सुधाचं डोकं आणखी खराब झालं. 
क्रमश:
सुधाचा हा जळफळाट तिला कुठे घेऊन जाईल? अन मीराचा चांगुलपणा केव्हापर्यंत टिकेल? आनंदला सुधामुळे आणखी काय बघावं लागेल? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी नक्कीच वाचा पुढील भाग 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...