Tuesday, 5 May 2020

स्वीकार भाग 2


स्वीकार भाग 1 इथे वाचा

"पण आई तर म्हणते की बायपोलर डिसाॅर्डर जरी पुर्णपने बरा होत नसला तरी रूग्ण औषधीने आणि थेरपीजने एक नाॅर्मल लाईफ जगु शकतो." आराधनाला बायपोलर डिसाॅर्डर आहे हे ऐकल्यावर फुलराणीने राधाला सांगितलं.
"अग तुझ्या आईचं म्हणनं अगदी योग्य आहे. मिही खुप अभ्यास केला आहे बायपोलरचा. पण अरूच्या बाबतीत टेन्शन हे आहे की तिला बरं व्हायची ईच्छाच नाही." काहीतरी विचार करून,"चल बसु कुठेतरी. मी अरूची सर्व हिस्ट्री सांगते तुला."
ॲक्चुली अरुची मानसिक स्थिति बिघाडायचं कारण काही नविन नाही. तेच आपलं, प्रेम ! पण एकतर्फी. अरु तशी शिक्षणात खुप हुशार, सायंस तिचा आवडता विषय. पण स्वभावाने खुपच इन्ट्रोव्हर्ट! आईबाबांची लाडकी लेक आणि दादाची लहान परी. अरुला सहजा सहजी कोणाशी बोलणं, मैत्री करणं जमत नव्हतं. त्यामुळे तिच्या मोजक्याच मैत्रिणी होत्या. इतरांना तर अरु शिष्टच वाटायची. राधा अरुची बेस्ट फ्रेंड ! बारावीच पुर्ण वर्ष ती अभ्यास करायला अरुच्या घरीच होती. कारण तिच्या वन RK घरात अभ्यास होत नसे. रात्री ७-८ वाजता तिचा मोठा भाउ, रवि तिला घ्यायला यायचा. तो बारावीत गणितात टाॅपर होता तसेच इंजिनीअरिंग करतानाच बारावीच्या मुलांना कोचिंग पण द्यायचा. म्हणुन मग अरु आणि राधाला जी गणितं आली नाहीत ती तो समजावून सांगायचा. तो असला ना आजुबाजुला की अरुला खुप छान वाटायचं. छान मैत्री झाली होती त्यांच्यात. पण हे सर्व म्हणजे प्रेम, हे कळायला अरुला खूप वेळ लागला. अरु Environmental science मधे गुवाहाटीला MSc करत होती तेव्हाच रविने त्याच्यासोबत काम करणार्या एका मुलीसोबत प्रेमविवाह केला.
MSc झाल्यावर अरुला नोकरी आणि लग्न दोन्हीच्या छान आॅफर आल्या. आईबाबांनी अरुचे निर्णय अरुवर सोडले होते. अरुने खूप प्रयत्न केला रविचा विचार मनातून काढायचा. पण मानसिक बेचैनी तिला पुढे जाऊ देत नव्हती. आपण काही गडबड करु म्हणून राधाच्या लग्नातही गेली नाही अरु. रविशी निगडीत सर्व गोष्टींना दूर करायचं होतं तिला. म्हणून लग्नही करायचं ठरवलं. पत्रीका वाटून झाल्या. आणि एका दुपारी रविचा फोन आला,"सांगा मॅडम काय गिफ्ट देउ तुम्हाला लग्नात?"
"ए काय करतेय तु ? मि येते आज. भांडायचं आहे मला तुझ्याशी." राधानं रवीच्या हातचा फोन घेऊन अरुला सांगितलं. घरी येणार म्हणाली. अरुला तिच्यासोबत खोटं बोलणं अवघड. छात्यावर कोणितरी प्रहार करतं, इतकी धडधड वाढली. डोकं गरगर फिरत होतं. आता आपला जगून उपयोग नाही. सर्वांना ताण देउ आपण. सारखा हा विचार डोक्यात घोळत होता. नैराश्याची परिसीमा गाठली होती अरुने सर्वांच्या नकळत. आणि कधी तिनं स्टुल पायाखाली घेउन गळफास घेतला तिला कळलंच नाही. पण नशिब ! दादा काहीतरी बोलायला तिच्या रूम मधे आला आणि वाचली ती. नंतर एकदा अरुने नस कापली, गोळ्या घेतल्या.... तिच्या डोक्यात एकच यायचे ते म्हणजे आपण सर्वांना त्रास देतोय म्हणून आत्महत्याच करणं योग्य !
अरुला सायकीअॅट्रीस्ट कडे नेण्यात आलं. फॅमिली हिस्ट्री बघितली तेव्हा लक्षात आलं कि अरुच्या बाबाच्या आईला राहून राहून असा त्रास व्हायचा. कधी ती सगळ्यांसोबत खूप छान वागायची तर कधी गलिच्छ शिवीगाळ करायची. म्हणजे अरुच्या आजीला मूड डिसॉर्डर होता. मरेपर्यंत तिला औषधी द्या असं अरु बोलायची पण जुनी म्हातारी लोकं अशीच असतात असं घरातल्या सगळ्यांचं म्हणणं होतं. तसेंच अरुच्या आवडत्या आत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच अरु खूप अंतर्मुख झाली होती.
हे सर्व लक्षात घेऊन सायकियाट्रिस्टने ही अरुची नैराश्याची सुरवात असल्याचे सांगितलं. तसेंच अरुला आनंद वाटेल अशा गोष्टीच घरात होतील यावर भर द्यायलाही सांगितलं. औषधी दिली. पण अरु कशाला प्रतिसाद देत नव्हती. गोळ्या तर अजिबात गिळत नव्हती. कारण तिला बरं व्हायचंच नव्हतं. नैराश्य वाढतच गेलं आणि ती बायपोलरची रूग्ण झाली. कधी रडायची तर रडतच बसायची आणि हसायला लागली की जबडा दुखला तरी हसतच राहायची. आईबाबांना तिचं हे रूप पाहावत नव्हतं. सायकीॲट्रीस्टच्या सल्ल्याने तिला असायलममधे भर्ती करण्यात आलं. शेजारी, नातेवाईक , मित्रमंडळ सर्वांच्या प्रश्नांना आईबाबा कंटाळले होते. बाबांना माइनर अटॅक आला आणि दादा त्यांना नेहमीसाठी लंडनला सोबत घेउन गेला. ते सहा महिने, वर्षातून एकदा अरुला भेटायला नागपूर मानसिक रूग्णालयात यायचे. वयोमानाने ते कमी झाले. उरली फक्त राधा. ति दर महिन्याला मला भेटायला पुण्यावरून नागपूरला यायची.
''मला वाटतं आई नक्कीच आपली काही मदत करेल. आता खूप नव नवीन शोध लागलेत मानसशास्त्रात. अरू नक्कीच ठीक होतील बघा." फुलराणीच्या बोलन्यात आत्मविश्वास झळकत होता. तिनं डाॅ. पुर्वा , तिच्या आईला फोन करून अरुबद्दल सांगितलं. सवड मिळताच त्या अरुला भेटायला शासकीय मेंटल हाॅस्पिलमधे नागपुरला आल्या. अरुबद्दल निवासी डॉक्टर सोबत चर्चा केल्यावर त्यांना जाणवले की अजून होप आहे. तसेच तिला बायपोलर हा मूड डिसॉर्डर होण्यामागे आनुवांशिक (अरुच्या आजीला मूड स्विंग्सचा त्रास होता.) तसेच आणखी काहीतरी कारण आहे. म्हणजे एखादा मानसिक धक्का, एखादी गोष्ट जी खूप दिवसांपासून तिच्या मनात रुजली आणि त्याची उत्पत्ति या डिसोर्डर मधे झाली. काय असू शकते ती गोष्ट ? हे जाणून घेण्यासाठी डॉ पूर्वाने राधा सोबत एकांतात मीटिंग फिक्स केली.
''काय ग राधा, आराधना इतकी हुशार, दिसायला पण छान. तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे नव्हता ? आश्चर्य ?''
''नाही तशी मुलांची भरपूर प्रपोज़ल यायची तिला. पण तिला हवा तसा कोनि भेटतच नाही म्हणे ती ?''
''म्हणजे ?''
''म्हणजे सालस, दिसायला नसला तरी मनाने सुंदर, थोडासा हळवा, तिची बाजुही ऐकून घेईल आणि तीचं अस्तित्व जपेल असा कोणी.''
''तुला काय वाटतं, असा कोणी मीळालाच नसेल का तिला?'' राधा थोड़ी गोंधळली कारण कोणी मीळाला असता तर अरुने  राधाला नक्कीच सांगितलं असत.,''काय आहे ना राधा, आराधनाच्या हिस्ट्रीमधे असा एकही पॉइंट नाही की ज्यामूळे तिच्या मनावर आघात झाला असेल. एका समृद्ध घरातली, आइवड़ीलांची लाड़की, एक हुशार, गुणवान मुलगी, दुखाचा काही लवलेश नाही. आजीची तेवढी मूड स्विंग्जची हिस्ट्री सोडली तर दूसरे काहीच नाही. आणि जो बिहेव तिने केला, म्हणजे औषधि न घेणे, काउंसिलरला कोऑपरेट न करणे, यावरून दिसून येते की तिला मुळी इच्छाच नव्हती बरे व्हायची." डोकं खाजवत, "आपण काहीतरी मिस करतोय राधा." दोघीही बराच वेळ शांत होत्या.
"राधा आराधना अशी वागायला लागली त्या वर्षी कायकाय घडले होते ? सांगु शकतेस का आठवून ?"
"हो सगळं सगळं आठवतं मला. त्या वर्षी अरूचं MSc पुर्ण होउन छान जाॅब लागला होता आणि काका काकुंचा जावईशोध सुरू होता."
"आणखी काही."
"आणखी????? माझ्या दादाचं लग्न जुळलं होतं त्याच्या प्रेयसी सोबत त्यामुळे थोडी व्यस्त होती मि स्वतामधे."
"तुझा दादा!! त्याच्या सोबत कसं नातं होतं आराधनाचं?"
"कसं म्हणजे? जसं माझं होतं अरूसोबत तसंच मैत्रीचं नातं."
"नक्की ?" प्रश्नांकीत नजरेने त्यांनी राधाला विचारलं. राधाला ते अजिबात रूचलं नाही. तिने प्रतिप्रश्न केला,''नक्की म्हणजे ? काय म्हणायचे आहे तुम्हाला ?''
"मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आराधनाला तुझा दादा तर आवडत नव्हता ना? मैत्रीचं रूपांतर खूप वेळा एकतर्फी प्रेमातही होतं." डाॅ. पुर्वाची शंका ऐकुन राधाला ती, अरु आणि रवि सोबत असतांनाचे क्षण आठवले. रवि दिसताच अरुचं ते स्वताला सावरणं, सांभाळून बोलनं, हलकं हलकं स्मित करणं. तो राधाला घ्यायला यायची वेळ होताच घर टापटीप करणं, वेणीफणी करून अभ्यासाला बसनं, तो लवकर जाउ नये म्हणुन एकच गणित परत परत विचारनं. आणि आता अरुला ठेवलेल्या रूमच्या भिंतीवर फक्त R R R लिहिणं.
"ओह गाॅड! तर ती भिंतीवर रवीचा R लिहीते आणि मला वाटलं होतं कि माझी आठवण येते म्हणून राधाचा R लिहिते." राधाने डोक्यावर हात मारला,"मला तिच्या भावना कधी कळल्याच नाही. कारण तिला जसा मुलगा हवा होता तसाच तर होता दादा !" डाॅ. पुर्वाचा हात हातात घेउन,"एकदा माझा हात पकडून म्हणाली होती,'मला तुझं घर, आईबाबा खुप आवडतात. येउ का इथेच राहायला ?' आणि मी म्हटलं होतं नको ग बाई, माझ्या दादाचं घर आहे हे अन त्याला तु अजिबात आवडत नाही." कसं वाटलं असेल तिला ?" राधा मटकन खाली बसली.
"तु ठीक आहेस ना ? उठ पाणी पी!" राधाला सोफ्यावर बसवुन पाणी प्यायला दिले."ताण वाटत असेल तर आपण उद्या बोलु बाकीचं.
"मि ओके आहे. आता जोपर्यंत अरू ठिक होत नाही मला चैन पडणार नाही."
क्रमश:
©®अर्चना सोनाग्रे वसतकार

मृगजळ भाग 1

"माझ्या बायकोला दिवस गेलेत." मनिषने जरा नाराजीनेच रिमाला सांगितलं.
"हो का ?"रिमाला राग आला होता खरा , पण तिनं तसा दाखवला नाही .
"होना ! एकतर किती कमी वेळा जवळ येतो आम्ही, त्यात सरगम पण लहानच आहे आणि ही प्रेग्नेंसी!" मनिष आपलं मन मोकळे करत होता आणि रिमा नाइलाजाने सर्व ऐकत होती, "कळत नाही काय करावं ?"
"मला वाटतं पाडुनच टाका आणि पुढे प्रिकाॅशन घ्या."
"हो तसेच करू. ओके बाय !"
"हो बाय!" फोन ठेवून रिमा मनिषच्या विचारातच कामाला लागली.
दुसर्या दिवशी परत मनीषचा फोन आला.रिमाने मोठ्या उत्साहात फोन उचलला,"बोला!"
"कशी आहेस ?"
"मि एकदम मजेत आहे. तुम्ही सांगा."
"मि पण मजेत आहे. तुला काहीतरी सांगायचं होतं."

"सांगा !"
"आम्ही बाळ ठेवायचे ठरवले आहे."
"अरे वा .." गळ्याशी आलेला आवंढा गिळत रिमा कशीबशी बोलली, "छान !"
"हो आणि दोन्ही मुलं सोबतच वाढतील."
"हुम्म!"
रिमाने तेव्हा मनिषच्या बोलण्याला दुजोरा दिला पण ती खुप दुःखी होती. तिच्या मनांत विचीत्र घालमेल सुरू होती. आज तिला एकस्ट्रा मॅरिटल अफेयरचा अर्थ कळला. मनिष हा विवाहीत एका मुलीचा बाप होता. रिमा एक साधीसुधी स्वःताच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत असलेली , नोकरीच्या शोधात चपला झीजवत असलेली तरूणी. एका काॅमन मित्राने जाॅबसाठी म्हणून त्यांची ओळख करून दिली होती. मनिषने तिची खुप मदत केली. त्याच्या रेफ्रन्सने एक चांगली नोकरी पण मिळाली तिला. त्यादिवशी खुप आनंदी होती ती. मनिष तिला छानशा हाॅटेलमधे जेवायला घेउन गेला. घरी सोडतांना परत एकदा काॅन्ग्रॅट्स म्हणत त्याने हात पुढे केला आणि रिमाने थॅन्क्यु म्हणत त्याच्या हातावर आपले ओठ टेकवले. मनिषच्या चॅर्मिंग व्यक्तिमत्वावर भाळली होती रिमा . अन् त्याच्या इतक्या आहारी गेली की आपण एका एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचा भाग बनलो आहे ह्याची खंतही तिला वाटत नव्हती. पुर्ण आयुष्य आता मनिष सोबतच घालवायचे असा तिने निश्चय केला होता. गेल्या दिड वर्षात रिमाला दोन वेळा मनीषकडून दिवस गेले . पण तिने मन कठोर करून दोन्हीवेळ अबाॅर्शन केले. तिच्या मनात आलं ते गर्भ जर तिच्या नवर्याचे असते तर तिने पाडले असते का ? आणि मनिष ? त्याने तर आधीच रिमाला सांगितलं होतं कि तो त्याच्या बायकोला कधीच सोडणार नाही. कारण रात्री तुम्ही कोणत्या बाईसोबत झोपले हे महत्त्वाचे नाही, पण समाजात वावरताना तुम्ही तुमच्या बायकोसोबतच दिसायला हवे. आणि मनिषला त्याला समाजात असलेली प्रतिष्ठा खुप प्रिय होती.त्यावर एकही डाग तो सहन करू शकत नव्हता.
क्रमश:
नुकत्याच एका मैत्रीणीचा अनुभव म्हणजे हा लेख. विवाहीत पुरूषाच्या आहारी जाउन जे काही तिच्या वाट्याला आले ते दुसर्या कोणा तरुणीच्या वाट्याला येउ नये म्हणून हा लेख लिहीण्याची उठाठेव केली. 
अशाच आशय घन गोष्टी वाचण्यासाठी मला फॉलो करा
Miarchanasonagre.blogspot.com वर. 
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Friday, 1 May 2020

काही आवश्यक गोष्टी. मुलांच्या आत्मनिर्भरतेसाठी

लग्नानंतर आयुष्यात येणारा सर्वात मोठा बदल म्हणजे बाळ होने. संपूर्ण आयुष्य हे त्या बाळा भोवती जाणार असते. म्हणून येणाऱ्या त्याच्यासाठीही आपण आधीपासूनच काही गोष्टी नक्कीच ठरवायला हव्या. कारण बाळ झाल्यावर आपण त्याच्यात इतके गुंतून जातो की इतर कितीतरी गोष्टींचा आपल्याला विसरच पडतो. इतके लाडकोड करतो, इतके पझेसिव होतो की त्याचे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे ह्याचे भान आपल्याला राहत नाही. आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात बाधा आणणारा घटक ठरतो. हे मि आपल्याच अवतीभवतीच्या काही मुलांना अभ्यासून जाणले.
रूही, 7 वर्षांची क्यूट बार्बी डॉल मुलगी. पण तिला जर कुणी जेवन भरवले नाही तर ती खाणारच नाही. घरी ठीक आहे. शाळेत कोण भरवणार तिला?
कार्तिक 6 वर्षांचा गोड मुलगा. पण स्वतःहुन अंडरवियर घालनेही त्याला जमत नाही.
10  वर्षांची मीता, शाळेतून आल्यावर कपडे कुठे तर शूज कुठे फेकून दिलेले. आईला कोणत्याच कामात अजिबात हातभार नाही.
अयान, 22वर्ष वय असलेला पण अजूनही मार्केट मधे जाऊन स्वता काही खरेदी करने त्याला जमेना. आई वडिलांनिहि तो नुकसान करेल म्हणून अशी जबाबदारी कधी त्याच्यावर कुणी टाकलीच नाही.
सिया, 20 वर्षांची, नुकतेच लग्न होउन सासरी आलेली. घरापासून कॉलेज, मार्केट कुठेही जायला तिला कुणीतरी सोबत लागे. म्हणून नवरा कंटाळलेला. सिया तरी काय करणार, मुलीची जात म्हणून माहेरच्यांनी कुठेच तिला एकटे सोडले नव्हते.
म्हणून अथर्व पोटात होता तेव्हाच मि ठरवले होते की येणाऱ्या बाळाला आत्मनिर्भर बनवायचे. त्यासाठी मि लाडकोड आणि पझेसिवनेस एकीकडे ठेवले.
अथर्व अन्न खायला लागला तेव्हापासून त्याच्या हाती तेल मीठ पोळीचा रोल बनवून देते. तो कितीही अन्न खाली सांडो मि त्याला त्याच्या हातानेच खाऊ दिले.
तो 3वर्षाचा झाला, तेव्हापासून त्याला जमेल तसे स्वताच कपडे, शूज घालु दिले, केस करु दिले. विस्कटले तर नंतर मि निट करुन द्यायची. आता तर तो स्वताची तयारी करण्यात अगदी निपुण झालाय. अंघोळ, ब्रश हे तो त्याचेच करतो.
घरातील छोटी छोटी काम मि त्याला तो 4 चा झाला तेव्हापासूनच करायला सांगते. जसे शाळेतून आल्यावर स्वताचे कपडे, पुस्तक, बैग निट जागेवर ठेवने. खेळणी खेळून झाली की आवरुन ठेवने. जेवायला बसायच्या जागी मीठ, पाण्याची बॉटल, पोळी डबा, प्लेट्स सर्व नेऊन ठेवने. आलू, कांदे, टमाटर, भिंडी, मिरच्या वेगळ्या करने अशी काम तो आनंदाने करतो.
अथर्वला इडली खूप आवडते. इडलीवाला आला की (व्यावहारिक ज्ञान यायला हवे म्हणून) इडली घ्यायला मि अथर्वला पाठवते. दुकानात सोबत नेते तेव्हा त्यालाच पैसे मोजुन द्यायला सांगते. काटेकोर नाही जमत त्याला. पण प्रयत्न करतो तो.
तात्पर्य पुढील आयुष्यात त्याला कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही. तो आत्मनिर्भर होईल.
आशा करते की माझे विचार तुम्हाला पटले असतील. लेख वाचल्याबद्दल खूप धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरणे हा साहित्यचोरी गुन्हा आहे.
धन्यवाद !

Thursday, 30 April 2020

टेक इट लाईटली

प्रसंग पहिला - ऑफिसचा रिकामा वेळ
"काल सुनबाईला चांगले झापले." ऑफिसचे एक लिपिक काका, दुसऱ्या लिपिक काकांना त्यांच्या नवविवाहित सुनेबद्दल सांगत होते,"अरे तिचे आई बाबा आले की मस्त साडी, मंगळसूत्र, हातभर बांगड्या सगळा श्रृंगार करुन राहते आणि एरवी एखाद्या अविवाहितेसारखी असते."
"हे काही चांगले लक्षण नाही,"दूसरे लिपिक काका,"काय अर्चना बरोबर बोललो ना मि !"
मि स्वताला निरखुन पाहिले आणि त्यांना म्हणाले,"माझ्या ना पायात जोडवी ना हातात बांगड्या ना गळ्यात मंगळसूत्र ना भांगात कुंकु !" हसत मि, "तेव्हा मि तिला जज करने अजिबात योग्य नाही." विषय संपला. दोन्ही रिटायरमेंटवर आलेले काका मीटिंग बर्खास्त करुन आपल्या जागेवर गेले.
प्रसंग दूसरा - रविवारची मोकळी दुपार
"तु किती मोबाईल बघतेस?" आई,"जा कपडे बदल. स्कर्ट आणि टॉप काढ, सलवार घाल. पाहुणे येतीलच थोड्या वेळात घरी."
"बदलते !" आत जाऊन शॉर्ट स्कर्ट काढला आणि लॉन्ग स्कर्ट घातला. पाहुणे आले. आईने माझ्याकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकला. कारण मि सलवार न घालता फक्त स्कर्ट बदलला होता. मि फक्त स्माइल दिली. एंजियोप्लास्टी झालेल्या आईसोबत वाद टळला.
प्रसंग तीसरा - संध्याकाळी चहाची वेळ
"अथर्व 6 वर्षांचा झाला. होउ दे दूसरे मुल. एकाला एक भाऊ बहिन पाहिजेच." सासुबाई अगदी गंभीर होउन...
"हो !" मि अगदी रिलॅक्स होउन,"अथर्व 10वर्षांचा झाल्यावर बघेल. तेव्हापर्यंत बोर झालेली असेल मि पण. मग ठेविन. तुम्ही येणारच बाळंतपन करायला!"
"🙆🤦‍♀️😱" बिचारया सासुबाई !
प्रसंग चौथा - ऑफिसचा लंच टाईम
"आपल्याला अभ्यास केलेच पाहिजे, इथे आपले काहीच खरे नाही."एक सहकर्मी !
"खऱच आता आपले वय आहे. पुढे जबाबदारया वाढतील आणि वय पण!"दूसरा सहकर्मी !
"नाहीतर काय? मुल झाले की काहीच होत नाही. तरीही करतेय मि अभ्यास. पण दूसरे बाळ झाल्यावर नाही होणार. " तीसरी सहकर्मी!
अशा टेंशनच्या वातावरणात मि मस्त चेयरवर रेटून होते.
"अर्चनाला टेंशनच नाही बापा." एक सहकर्मी
"कसे असेल बाबा, चांगला पगार येतो दोघा नवरा बायकोचा मिळून."दूसरा सहकर्मी.
"हो, मि तर 35ची झाल्यावर परत अभ्यास सुरु करणार रे बाबा !" सर्व माझ्याकडे भुवया उंचावून, मि "अरे अभी तो पार्टी शुरू हुई है, सो लेट्स एन्जॉय !" 😉🤣🤣🙏 सर्वांचे चेहरे खुललेले..
प्रसंग पाचवा - मतदानाचा दिवस
माझी पटपट स्वयंपाक करुन मतदानाला जायची घाई. "अग हा फोन घे आणि सांग त्यांना मि औषधि घेऊन झोपलोय म्हणून !"आमचे हे.
पण मि फोन रिसीव करायच्या आधी कट झालेला. म्हणून मग 102 ताप असल्यामुळे घरी राहिलेल्या आमच्या ह्यांनी फरमान सोडला,"एक काम निट होत नाही तुझ्याकडून!"
"नाही होत !" एवढे म्हणून मि परत माझ्या कामाला लागलेली. कारण तब्येत ख़राब असलेल्या आणि खूप कष्टाने सुट्टी घेतलेल्या, कामाच्या टेंशनमधे असलेल्या ह्यांच्याशी वाद करण्यात मला काही अर्थ वाटला नाही. थोड्याच वेळात साहेब हसुन बोलायला तयार.
पाचही प्रसंगात वातावरण टेंशनचे आणि वादविवादावर आलेले. पण केवळ लाइटली घेतल्यामुळे हसण्यावर निवळलेले. तेव्हा,
चला खुलून बोला,
मन स्वच्छ ठेवा !
सोडा मनाचे खेळ खेळने
ह्याचे त्याचे मनाला लावून घेणे!
घेउन लोड हृदयावर,
जाल विकतच्या बिछाण्यावर !(हॉस्पिटल )
कधी कोणी बोलले म्हणून काय झाले?
शरीराला कुठे छिद्र पडले?
मग इतका बाउ का करायचा,
उगाच स्वताला त्रास करुन घ्यायचा,
आणि आपल्याच आप्तांना ताप द्यायचा !
बरोबर ना !
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. शुद्धलेखनाच्या चूका माफ कराव्यात.
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Tuesday, 28 April 2020

माझे सुटलेले पोट अन अफवाच अफवा

तशी मी एकदम सड़सडीत बांध्याची. अथर्व झाल्यावरही माझ्या बांध्यात काही जास्त फरक पड़ला नाही. फक्त पोट थोड़े बाहेर आले. कदाचित सीजर झाल्यामुळे. पुढे मी सरकारी कर्मचारी झाली. लिपिकाचे काम असल्यामुळे 2-3 तास सतत बसून राहावे लागे. त्यात कामात किती वेळ आपण बसूनच होतो हे लक्षात येत नव्हते आणि दिमतिला चपराशी असल्यामुळे पानी घ्यायला सुद्धा उठावे लागत नव्हते. दर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी कोणाचातरी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस,  रिटायरमेंट, प्रमोशन, कशाना कशाबद्दल मिठाई वाटली जायची. एक दिवस तरी स्वयंपाकाला सुट्टी हवि म्हणून रविवारी डिनर बाहेरच व्हायचा, तोही नॉनवेज. चीज आमचे आवडते म्हणून आठवड्यातून दोनदा तरी चीज सैंडविच किंवा बर्गर डिनरमधे असायचे. तर अशी मी थोड़ी फुटली, नको तिथे जास्त सुटली. आणि माझ्याबद्दल सहकर्मींची अंदाज बांधायला सुरवात झाली.
दूसरी गोड बातमी आहे वाटते म्हणून माझी विचारपुस होउ लागली. मी हसुन नकार देत होती. एकदा एका सहकर्मी मुलीला अजीर्ण होउन उलटी झाली. कुणीतरी अफवा उडवली,"अर्चना मैडम प्रेग्नेंट आहेत, त्यांना उलट्या होत आहेत." कारण माझे पुढे आलेले अर्थात सुटलेले पोट ! मी डोक्यावर हाथ मारला. जाऊ दे म्हटले काय बोलणार कोणाला. त्यापेक्षा आपण आपले पोटच कमी करु व्यायाम करुन. पण तेहि सोपे नव्हते. अथर्व शाळेत आणि विनोद ऑफिसला 9वाजता जात असल्यामुळे 9च्या आधीच स्वयंपाक करुन टिफिन भरावे लागत. 9नंतर व्यायाम करावा तर आम्ही भुक्कड़, सकाळी उठल्या बरोबर भूख लागते आम्हाला. म्हणून आधी भांडे घासायला आणि पोळ्या बनवायला बाई शोधली. मग मी व्यायाम करायला सुरवात केली. उठल्या बरोबर कोमट पानी प्यायची. मेटाबोलिज़म वाढावा म्हणून ग्रीन टी प्यायला लागली. गोड आणि चर्बीयुक्त खाने बंद केले. थोड्या दिवसातच मला हलके हलके वाटायला लागले.
पण 14-15 दिवस होत नाही तो माझ्या पायावर एक पांढरा फोड़ आला. भयानक खाज होती त्यात. मी झोपित ते खाजवले. झाले कल्याण माझे. माझा अर्धा पाय काळा निळा पड़ला. विचित्र स्थिति झाली होती. अचानक ताप चढ़त होता आणि अचानक उतरत होता. सुट्टी घेऊन घरी आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. आपली एम्प्लोयी बीमार आहे म्हणून माझे सर बायको सोबत मला पहायला घरी आले. आणि परत अफवा पसरली की अर्चना मैडम प्रेग्नेंट आहेत.
कड़ाक्याचा हिवाळा होता त्यावेळी. म्हणून मी ऑफिसला छान स्वेटर घालून, डोक्याला मफलर गुंडाळून गेली तर  मैत्रीणि विचारु लागल्या, "तुझ्याकड़े गुड न्यूज़ आहे असे कळले आम्हाला."
"आम्हाला का नाही सांगितले तु?"🤦‍♀️
अशाप्रकारे ऑफिस जॉइन केले तेव्हापासून आतापर्यंत मला 4-5 वेळा प्रेग्नेंट डिक्लेअर केले गेले आहे. कारण माझे सुटलेले पोट. 🙆
आधी खूप टेंशन येत होते. पण आता मी अजिबात या पोटाचे टेंशन घेत नाही. कुणी विचारले प्रेग्नेंट आहे का?  तर काहीच बोलत नाही. ती व्यक्ति आपले उत्तर शोधत बसेल. मी का स्पष्टीकरण देऊ?
लेख आवडल्यास शेयर नक्की करा. धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Sunday, 26 April 2020

स्वीकार भाग 1

स्वीकार भाग 2 इथं वाचा

"मनोविकार समजून घ्या, गैरसमज टाळा आणि उपचारानं आनंदी व्हा !" अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील माझं आवडतं प्रेरणादायी वाक्य.

खरंच आपण शरीराकडे किती लक्ष देतो. थोडं सर्दी पडसं झालं कि डॉक्टर कडे जातो. त्यातही आपल्या प्रत्येक इंद्रिया साठी एक स्पेशियालिस्ट आहे. दात दुखत असेल तर दाताच्या डॉक्टरकडे किंवा डोळ्यांना काही त्रास असेल तर डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे जातो. मग ज्याला आपण आपल्या शरीराचा आत्मा म्हणतो त्या मनाचं संतुलन बिघडलं असता आपण कधीच त्याचे स्पेशालिस्ट असलेल्या माणसशास्त्रज्ञाकडे, सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे का जात नाही? का आपण आपल्या मनाकडेच इतकं दुर्लक्ष करतो? का मनोविकारासाठी उपचार घ्यायला आपला जीव घाबरतो? का एखाद्याला एखादा मनोविकार जडलेला असेल तर आपण त्याला तूच्छ पाहतो, पागल असं म्हणून दूषणं लावतो? त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही होणारा त्रास आपल्याला दिसत नाही? कदाचित म्हणूनच कितीतरी लोकं आतल्या आत कुढतात पण सायकोलॉजिस्टकडे जात नाहीत.
असेच प्रश्न मला पडायचे. म्हणून मी माणसशास्त्रात पदवीधर झाले आणि पुण्याला असतांना महर्षी कर्वे इन्स्टिटयूट मधून, 'मास्टर इन काउंसिलिंग इन मेंटल हेल्थ' हा कोर्स केला. त्यावेळी माझ्या मनात या कथेने जन्म घेतला. आता ही कथा पुस्तक रूपात मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे.
ही कथा कादंबरी लिहायचा माझा मुख्य उद्देश माणसशास्त्राबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांनी माणसशास्त्रज्ञाची मदत जरूर घ्यावी हा आहे. तसेच सामान्य लोकांनी मानसिक रुग्णांना समजून घ्यावं हिच अपेक्षा. आपल्या बंधू भगिनी पैकी कोणाला असा त्रास असेल तर त्यांना वाळीत न टाकता उपचार घेण्यात मदत करावी.
लेखन रोचक असलं की वाचणाऱ्याला ते प्रेरित करतं. म्हणून बायपोलर हा मानसिक रोग असलेल्या एका स्त्रीची प्रेमळ कथा इथे मी रंगवली आहे.
कधी कधी लिहिण्याच्या ओघात भान राहत नाही. त्यामुळे काही चूकभूल झाली असेल तर कमेंट करून सांगा. 

तर ही कथा आहे आराधनाची. आज तिचा सत्तेचाळीसवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि धुमधामीत साजरा करण्यात आला. पहिल्यांदा सत्य हे स्वप्नापेक्षाही कितीतरी सुंदर असु शकतं याची प्रचिती आली. जीवन मनभरून जगल्यासारखं वाटतय तिला तेही तब्बल एकविस वर्षांनी ! गंमतीचीच गोष्ट आहे ना .... एकवीस वर्ष बाहेरच्या जगाचा स्पर्श नाही, अंधार्या कोठडीत राहणं आणि अचानक झोपेतून जाग आली म्हणून उठून बाहेरच्या जगाशी संपर्क साधायचा. किती वेगळं अन् कठीण ! सगळं बदलेलं होतं. वाढलेलं वय, पांढरे झालेले केस, चेहर्यावरची कांती जाउन आलेल्या सुकृत्या ... हे झालं आराधनाचं. पण हे जग ... हेही किती बदलेलं. किती टेक्निकल झालेलं. ते आराधनाला, एका पागलखान्यात एकविस वर्ष पागल म्हणुन वास्तव्य केलेल्या बाईला (नाॅर्मल म्हणून) स्वीकारेल का ? आणि ती सुद्धा ह्या बदललेल्या टेक्नोसॅव्ही झालेल्या जगाला स्वीकारू शकेल का ? दोन्हीही गोष्टी सहजा सहजी होणे फार कठीण. पण ज्याच्याजवळ कोणितरी असतं ना, अगदी आपलं, हृदयापासुन आपल्याला जपणारं, त्याच्यासाठी सगळंच शक्य असतं बघा 😊.
तर अशीच आहे अरुची(आराधनाला प्रेमानी सर्व अरु म्हणायचे) राधा. राधानं सगळं शक्य आणि सोपं केलं अरुसाठी. ति नसती ना तर अरुचा अंत सुद्धा त्या पागलखान्यातच झाला असता. म्हणायला त्यांच्यात रक्ताचं असं काही नातं नाही. पण मनाचं आहे. दोघी मैत्रीणी एकमेकिंच्या, अगदी जिवाभावाच्या.....
अरु एकविस वर्षांनी वेडेपणातुन बाहेर कशी आली ना ती एक गम्मतच आहे. एखाद्या सिनेमासारखी !
तर तिन महीन्या आधी राधेच्या मुलाचा अमनचा साखरपुडा झाला. होणारी सुन खुपच मस्त,'फुलराणी' नाव ऐकुनच मोहरल्यासारखं वाटतं. ती नावाजलेली मुक्त पत्रकार आणि लेखिकाही, तरूणपणी अरुची आयडॉल असलेल्या शोभा डे ची आठवण झाली अरुला फुलराणीला पाहून. पोरीचं वय वर्ष फक्त एकोणविस ? बापरे ? पोटातून पडल्याबरोबर शाळेत गेली की काय ? असं अरुच्या मनात आलं. पण 2019 साल म्हणजे किती पुढारलेलं जग आणि इतक्या लवकर साखरपुडा का ? अमनला आणि फुलराणीला फक्त लिव्हइन मधेच राहायचं होतं. मग ही साखरपुडा, लग्न? झालं असं कि,
अमन नेव्ही इंजीनियरींग काॅलेजमधे पुण्याला पहिल्या वर्षाला असतांना एका डाॅक्युमेंटरी निमित्त फुलराणीचे सतत तिथं येणे जाणे व्हायचे. तेव्हा अमन आणि फुलराणिची मैत्री झाली. फुलराणिची आई एक सिंगल पॅरेंट, एक सायकोलॉजिस्ट. मूळची महाराष्ट्रीयन पण बाबा नोकरीला  दिल्लीला होते. लहानपण, शिक्षण सगळं दिल्लीतच. म्हणून तिथंच स्थायी झाली. तिनं फुलराणीला खुप मोकळं वातावरण दिलं. म्हणून की काय फुलराणी अगदी बिंधास्त झाली. कितीतरी देश एकटीच फिरली. शाळेतच तीने एक पत्रकार आणि टिनेज टॉप ब्लॉग राइटर म्हणून नाव कमवले. तसेच यूथ लव स्टोरीज़, बी लाइक मी, लाइफ इज जिप्सी, ही तिची तीन नॉवेल तरुण मंडलळीने चक्क डोक्यावर घेतली. तिचे टॅलेंट पाहून सिंबाॅइसीस काॅलेजने तिला पत्रकारीतेची पदवी तिच्या अठराव्या वर्षिच बहाल केली. आता तिला आयुष्यात नविन काहीतरी हवे होते.
"मला तुझ्याशी लग्न करायचं आहे."फुलराणीने अमनला प्रपोज केलं.
"काय?" अमनने अंगावर पाल पडल्यापेक्षाही जास्त बेकार रिॲक्शन दिलं,"अग मि काहीच कमवीत नाही."
"मि कमवीत आहे ना." काहीतरी काउंटींग करत,"मि लिहीलेल्या पुस्तकांची राॅयल्टी आणि पत्रकारीतेचे मिळून २५-३० हजार येतात बाकी राहायला आपापली घरं आहेतच आणि काॅंट्रंक्ट मॅरेज करू. पटलं तर राहू सोबत नाही तर नाही."
"??????"
"मला बघायचं आहे लग्न करून!"
''म्हणजे ?''
''अरे मला नवीन काहीतरी लिहायचे आहे आणि लग्न हा विषय खूपच भावला मला आणि बघ विथ एक्सपेरियंस लिहिले तर रियलिटीचा टच मिळेल ना ''
अमन नाही म्हनू नाही शकला. त्यालाही फुलराणी आवडायची. सर्वांनी समजावले. पण फुलराणी म्हणाली,''बघा अजून 2-3 वर्षान्नी काय आणि आज काय, लग्न ते लग्न आणि अमन सोबतच करेल हा ठाम निर्णय.''
राधा काही कमी नाही ती म्हणाली,''ठीक आहे करा लग्न पण आधी साखरपुड़ा करून फुलरानी तीन महीने माझ्यासोबत राहील. आम्ही दोघी एकमेकींना जाणून घेऊ. नंतर लग्न.''
''वाउ ग्रेट ... म्हणजे मला आणखी एक विषय मीळेल लिहायला.'' असे म्हणून तिने राधाला मीठी मारली,''माझी होणारी सासु ... नाही माझ्या होणारया नवरयाची आई.''
राधा विचार करत होती ह्या रोबोट युगात हे काय खुळ माझ्या नशीबी येतेय. एक आमचा काळ होता, लवकर लग्न नाही करायचे म्हणून किती तांडव करावे लागे आणि ही पोरगी एकोणविसाव्या वर्षिच लग्न करतो म्हनतेय. कशाला तर पुस्तक लिहायला अनुभव हवा म्हणून .. असो कमित कमी अमन मुलीशीच लग्न करतोय हेच खूप आहे. नाहीतर त्याचा मित्र केवल, त्याच्या लक्षणावरून तर भीतीच वाटायची की, पोरगं सुनिच्या ऐवजी जावई आणेल अन्'माँ दा लाडला बिघड़ गया' म्हणावे लागेल आपल्याला.
साखरपुड़ा झाल्यावर फुलराणी राधाच्या घरी तिच्यासोबतच राहू लागली. राधाला सकाळी ऑफीसला ड्रॉप करने, संध्याकालळी पीक अप करने. शॉपिंगला घेऊन जाणे. अर्थात राधा जिथे जाईल तिथे फूलरानी तिच्या सोबत असायची. राधा दर एक-दोन महिन्यातुन अरुला भेटायला असायलम मधे यायची. यावेळेस आली तेव्हा फूलरानी सोबतच होती. फुलराणीने खुप विचारले कोणाला भेटु ते ? पण राधानी फक्त एवढंच सांगितलं की तिला पुस्तक लिहायला एक नविन कॅरेक्टर मिळेल. तुझ्यासारखंच आकाशाला मुठीत बंद करू पाहणारं, तुला चान्स मिळाला ग! तिनेच माहीत नाही काय वाईट केलं कोणाचं ?" फुलराणीला राधेच्या असं बोलण्याचा अर्थ अरुला भेटल्यावर कळला.
एका बंद पिंजर्यात अंधारात होती ती. 26 वर्षाची असतांना (म्हणजे 1998-99 साल सुरु होतं) तिला नैराश्यानं जकडले आणि पाहता पाहता ती एक बायपोलरची रूग्ण झाली ! घडीला पाणी तर घडीला आग, असा होता तिचा ताल.
क्रमश:
काही महिन्यांपूर्वी हीच कथा मी, 'मी अमृता' या नावाने मॉम्सप्रेसो वर लिहायला सुरु केली होती. पण मधेच साहित्यचोरी प्रकार पुढे आल्याने मी पुढले भाग इथे टाकलेच नव्हते. आता तीच कथा 'स्वीकार' या नावाने आणि अधिक समर्पकतेने परत एकदा लिहितेय आणि आपल्यासमोर प्रस्तुत करतेय. आशा आहे आपल्याला नक्की आवडेल. आवडल्यास माझ्या नावासोबत शेयर नक्की करा आणि प्लिज मला फाॅलो करा. म्हणजे नंतरचे भाग तुम्हाला शोधत बसावे लागणार नाहीत. तर ते प्रकाशीत होताच तुम्हाला नोटीफीकेशन मिळेल.
फोटो फ्रॉम गुगल🙏.
धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 😊🙏
archusonagre@gmail.com

नको तुला नाही जमायचं

लॉकडाऊन होऊन तीन दिवस झालेले. प्रियाचा सगळा वेळ घरकामात स्वयंपाक करण्यात जायचा. मंदार तिला मदत करु पाही. पण तीच, 'नको तुला नाही जमायचं.' असं बोलून त्याला शाम सोबत खेळायला किंवा कपडे प्रेस करायला वगैरे सांगे. कारण तिला वाटे हा किचन मध्ये एक मदत करेल आणि दहा कामं वाढवेल. घरचं मिळमिळीत खाऊन सगळेच बोर झाले होते. मंदार किराण्याची लिस्ट द्यायला आणि भाजीपाला आणायला बाहेर पडतच होता तो 4 वर्षाचा शाम म्हणाला, "बाबा पाणीपुरी आणा."
"अरे सर्व चाट वाले आणि इतर हॉटेल्स बंद आहेत. पाणीपुरी कशी आणू?"
"अरे पॅकेट आन किराण्यात पाणीपुरीचं, सोबत मसाला पण माग पाण्याचा." प्रियानं आयडिया दिली.
मग काय मंदार एक पाऊल पुढे. तो सॅन्डविच ब्रेडही घेऊन आला. प्रियाने टेस्टी सॅन्डविच बनवले. तिघांनी मस्त पाणीपुरी आणि सॅन्डविचवर ताव मारला. पण पाणीपुरीच्या पाण्यामुळे कि ब्रेडमुळे कि आणखी कशामुळे प्रियाचं दुसऱ्या दिवशी सकाळी पोट बिघडलं. तिला संडास लागली. बाहेर जाण्यासाठी बंदी असल्याने मंदार एकटाच डॉक्टरला भेटून तिच्यासाठी औषधं घेऊन आला. ती पार गळून गेली. तो औषधं घेऊन झोप म्हणाला.
"अरे पण मी झोपली तर स्वयंपाक कोण बनवणार?"
"मी करतो काहीतरी. डॉक्टरने सांगितलं आराम करायला. जास्त खराब झाली तब्येत तर दवाखान्यात भरती करावं लागेल."
"अजिबात नाही. त्यापेक्षा झोपतेच मी." रात्रभर पोटदुखीनं जागी असल्यामुळे तिला लवकर झोप लागली. आता घराची सर्व जबाबदारी मंदारच्या खांद्यावर येऊन पडली. ज्याला साधं तिखट मिठ कुठं आहे ते माहित नव्हतं त्याला स्वयंपाक करायचा होता. इतरवेळी त्यानं हवं ते ऑनलाईन मागवलं असतं. पण आता लॉकडाऊनमुळे तर साधी मॅगी पण कुठे बाहेर मिळणार नव्हती.
"पप्पा भूक लागली." शाम मंदारचा बर्मुडा ओढत म्हणाला.
"मॅगी देतो बनवून पटकन."
"नाही वरण पोली."
"अरे पण मॅगी आवडतं ना तुला.''
"टीचर म्हणते मॅगीनी पोटात किडे होतात."😧
"त्या टिचरची👿... आता कसं बनवू वरण पोळी?" मंदार स्वतःशीच पुटपुटला. मोबाईलवर मेसेज आला. त्यानं बघितला. दाल्गोना कॉफी बनवायची यु ट्यूब लिंक कोणीतरी ग्रुपमध्ये टाकली होती.
"यस 😃! यु ट्यूबवर पाहून बनवतो वरण पोळी."
मंदारने यु ट्यूब सुरु केलं. आधी वरण बनवायला तुरीची डाळ 3 वेळा धुवून कुकर मध्ये चढवायला सांगितली. हा आलमारीत तुरीची डाळ शोधू लागला. त्याला व्हिडीओ मध्ये तुरीची डाळ पिवळी असते हे समजलं. पण अलमारीत दोन डबे दोन पिवळ्या डाळींनी भरलेले दिसले. एक डाळ पातळ आणि एक जाड. तुरीची कोणती? 🙄. मग गुगल वर संशोधन झालं. तेव्हा 40-50 इमेजेस पाहिल्यावर पातळ डाळ तुरीची हे कन्फर्म  झालं. डाळ तीन वेळा धुवून कुकर मधे लावण्यात आली.
आता पोळ्या बनवण्यासाठी कोपरात कणिक घेतली. पाणी टाकलं, जास्त पडलं म्हणून थोडी अजून कणिक घेतली, परत पाणी कमी, जास्त असं करता करता कोपर कणकेने भरून गेला. छोटा शाम 2-3 वेळा वरण पोळी झाली का पाहायला आला. बाबाला असं पाहून आईजवळ गेला.
"आई बघ पप्पाला बग.. उठ, उठ.. " प्रियाला गाढ झोप लागलेली. श्यामने प्रियाला हलवून उठवलं.
"काय रे बाळा?" ती भांबावून जागी झाली.
"भूक लागली."
"का रे पप्पानं काही दिलं नाही का?"
"ना... "
"बरं चल बनवते मी." ती बेडवरुन उठू लागली तो मंदार तिच्याजवळ धावत आला.
"प्रिया कुकर उडणार नाहीतर फुटणार वाटतं आता."
"काय?" प्रियानं एक नजर मंदारवर टाकली. मंदारच्या गालाला, कपाळावर, कपड्यांवर कणिक पीठ लागलेलं होतं. दोन्ही हात उंड्याने बरबटलेले होते. ती तोंडावर हात ठेऊन हसू दाबत किचनमध्ये गेली. कुकर मधलं डाळ असलेलं भांड तडतड वाजत होतं. कारण मंदार साहेबांनी भांड्याखाली रिंग ठेवली नव्हती. आणि पाणीही अगदीच कमी टाकलं होतं. मंदारला वाटलं कुकरचं काहीतरी बिघडलं. तो आता फुटणार.
किचनच्या वट्यावर डाळ पाणी कणिक सगळं सांडलेलं होतं. कोपरात त्यांना 2-3 दिवस पुरेल इतकी कणिक भिजलेली होती. अलमारीतले सर्व डबे बाहेर. इतका पसारा कधी आवरायचा? तिने डोक्याला हात लावला.
"सॉरी. मी आवरून देतो सगळं." मंदार म्हणाला.
तिच्या तोंडाशी आलं कि नको तुला नाही जमायचं वगैरे वगैरे. पण तिने स्वतःला आवरलं. आता तिचं फक्त पोटच खराब झालं होतं. पुढे आणखी काही झालं तर पिल्लू शाम आणि मंदार उपाशीच राहतील. तेव्हा खाण्यापुरती कामं तरी यांना यायलाच हवी म्हणून ती म्हणाली, 
"मला बसायला चेयर दे. मी सांगते काय कसं करायचं!" आणि मंदारकडूनच प्रियाने सर्व कामं करून घेतली. 
धन्यवाद!
तर मैत्रिणींनो वेळ सांगून येत नाही. आपल्या मुलांना तसंच नवऱ्यालाही तो उपाशी राहणार नाही इतकं तरी किचनचं काम करु द्या किंवा गोड बोलून शिकवा. 
माझ्या खुप मैत्रिणींची तक्रार कि नवऱ्याला एक काम सांगितलं कि तो 10 वाढवून ठेवतो. मी म्हणते आवरू द्यायचं कि त्यांचं त्यांना. किंवा काम करायच्या आधीच सांगायचं नीट कर. पसारा झाला तर तुलाच आवरावे लागेल. सुरवातीला करतील थोडा पसारा पण त्यांचा त्यांनाच आवरायला लावायचा. आणि टोमणे न मारता किंवा काव काव न करता प्रेमानं समजावून काम काढून घ्यायचे. आपण बायका ना लवकर संतापतो अन मग नवऱ्यांना संधी मिळते म्हणायची, "तुझी कामं तूच कर!"

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

Copyright कायद्याअंतर्गत लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत आणि लेखिकेच्या परवानगी शिवाय लेख कुठेही प्रस्तुत किंवा पब्लिश करणे हा गुन्हा आहे. निषेध साहित्यचोरीला. 

LRR PART 5 the beginning of love

Ram :- I thought to inform Meera about Aarchee. But first I had to move from highway as the night seems more darken after having a young gir...